सोमवार दि. २१ जून २०२१ जागतिक योग दिन!
उद्या विविध ठिकाणी, विविध स्तरावर योग शिबिराचे आयोजन केले जाईल.
योग अभ्यासामुळे शारीरिक तसेच अनेक मानसिक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, परंतु भीक मागणाऱ्या लोकांना या योग अभ्यासाचा लाभ कसा मिळणार? त्यांना कोण शिकवणार?
याच संकल्पनेतुन डॉक्टर मनीषा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण भिक्षेक-यांसाठी नियमित योगासन वर्ग या अगोदरच रस्त्यावर सुरू केले आहेत.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून उद्या, सोमवार दिनांक २१ जून रोजी भिक्षेक-यांसाठी आम्हीही योग शिबिर आयोजित केले आहे. शनिवारवाडा परिसरात (शनिवार वाड्याची डावी बाजू / सकाळ ऑफिस कडून सरळ पुढे आल्यानंतर शनिवारवाड्याचे असणारे प्रवेशद्वार ) इथे रस्त्यावरच सकाळी साडेनऊ वाजता हे शिबिर संपन्न होणार आहे.
श्वास तसेच फुप्फुसाशी निगडित योग आसने भिक्षेक-यांकडुन करवुन घेतल्यामुळे, त्यांना कोरोना पासून आम्ही दूर ठेवू शकलो, याचा आम्हांस निश्चित अभिमान आहे, याचं सर्व श्रेय डॉ. मनिषा हिचं!
याप्रसंगी, शिबिरात सहभागी झालेल्या भिक्षेक-यांना मास्क आणि सॅनिटायझर सह निवडक किराणा ही देणार आहोत. याशिवाय सध्या भिक मागत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर तथा इतर वैद्यकीय साधनं देवुन, त्याद्वारे त्यांना व्यवसायाची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.
भीक मागणाऱ्या या वंचित घटकाकडे तुच्छतेने न बघता, समाजाचाच तो एक भाग आहे, हा संदेश यातुन जावा इतकीच या मागील भावना. हाताला सहावं बोट असेल तर ते काही कामाचं नाही, म्हणुन त्याला कुणी उखडुन फेकत नाही. उलट पाच बोटांनी मिळुन त्यांच्या या “सहाव्या बंधुला” त्यांनी आपल्यात सामावुन घेणं अपेक्षित आहे.
सन्मानाने जगण्याची ‘त्यांना’ एक संधी देणे, हे समाजाचंच कर्तव्य आहे हा विचार यातून रुजावा, “योग” दिनाच्या दिवसापासुन पुढे आयुष्यातले “भोग” संपावेत, या शुभेच्छा!
Leave a Reply