बाळ… उत्तरार्ध!!!

बाळ” या नावाने काही दिवसांपूर्वी एक अनुभव मांडला होता यामध्ये तीन वर्षापासून असहायपणे उकिरड्यात पडलेल्या एका मुलाविषयी लिहिलं होतं.

याच्याविषयी कायमस्वरूपी काहीतरी करायचं होतं आणि आज आपणास सांगायला मला खूप आनंद होतोय की आज, बुधवार दिनांक २३ जून रोजी सकाळी, माझ्या थोरल्या बहिणीसम “डॉ. नंदाताई शिवगुंदे, यांच्या भोगाव, जिल्हा सोलापूर येथील आधार केअर सेंटर या आश्रमात त्याची कायमस्वरूपी सोय करण्यासाठी त्यास रवाना केले आहे.

हा अनुभव लिहिल्यापासून दोन तासाच्या आत मला वेगवेगळ्या माध्यमातून हजारो जणांकडुन विचारणा सुरू झाली..

त्या मुलाचे तुम्ही पुढे काय केले?
त्याची कुठे सोय केली?
त्या मुलाचं डॉक्टर पुढे काय झालं ते पटकन कळवा!
काय करणार आहात त्याचं?
अहो, इतका का वेळ लागत आहे तुम्हाला डॉक्टर?
काय तुम्ही पण डॉक्टर…
अजून पण तो रस्त्यावरच आहे .? अरेरे काय डॉक्टर हे!

Give me updates on that boy Doc fast!
Doc, send me status of that boy, where is he now?
Why you have not done anything for him till date?

अर्रे… मला गंमत वाटते!

विचारणार्‍या लोकांच्या भावना मी समजू शकतो, परंतु ते हे विसरतात की मी सुद्धा माणूस आहे आणि मला सुद्धा काही मर्यादा आहेत! वर्षानुवर्षे रस्त्यावर पडलेल्या एखाद्या व्यक्तीचे पुनर्वसन करायला, मलाही थोडातरी वेळ लागेलच की… शिवाय यात अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. माझ्याकडे कोणताही मंत्र नाही की मी तो टाकला आणि फटकन झालं पुनर्वसन!

मी साधा भिकाऱ्यांचा डॉक्टर आहे…! मी सामान्यातला सामान्य माणूस आहे, माझ्याकडे कोणतीही पॉवर नाही… सत्ता नाही. हे काम करत असताना, कॉमन मॅन म्हणून जगणार्‍या माणसाला काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं… हे वेगळं सांगण्याची मी गरज आहे का?

रस्त्यात वर्षानुवर्षे पडलेल्या एखाद्या व्यक्तीला स्थलांतरित करणे किंवा एखाद्या संस्थेकडे हस्तांतरित करणे म्हणजे रस्त्यावर पडलेला दगड सहज इकडून उचलून तिकडे ठेवणे इतकं सोपं असतं का? यामागे खूप मोठी प्रोसेस असते.

मुद्दाम विषयांतर करुन, थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो…

  1. एकतर ज्या व्यक्तीसाठी आपण काही करत असतो, त्यासाठी त्या व्यक्तीची मनापासून संमती असणं अत्यंत गरजेचं असतं. कोणाच्याही संमती वाचून केलेली गोष्ट म्हणजे बळजबरी! केवळ आपल्याला वाटतंय म्हणून दुसऱ्याच्या पूर्ण संमती शिवाय काहीतरी करणे यात शहाणपण नाही, समोरच्या व्यक्तीलाही ते तसंच वाटायला हवं! आणि म्हणून ज्या व्यक्तीसाठी आपण काही करणार आहोत त्याची मनापासून संमती मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं.

वर्षानुवर्षे रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला, हे मी तुझ्या भल्यासाठीच करत आहे हे पटवून देऊन त्याची मनापासून संमती मिळवणे यात काही दिवस जातात! बऱ्याच वेळेला रस्त्यावर तो फसवलाच गेलेला असतो… आता त्याचा कोणावरही विश्वास नसतो, त्या व्यक्तीचा आधी विश्वास संपादन करायला लागतो… म्हणून ही मनापासूनची संमती मिळायला सुद्धा वेळ लागतो…

यात काही दिवस जातात…

  1. त्याची संमती मिळाल्यानंतर, आता त्या व्यक्तीला, “अशा” अवस्थेत कोण स्वीकारेल, अशा संस्थांचा शोध घेणं सुरू होतं.

अनेक संस्थांचे अनेक नियम असतात, अटी असतात. अनेक संस्थांशी मग संपर्क साधावा लागतो, पत्रव्यवहार करावा लागतो. हजार एक फोन केल्यानंतर एखाद-दुसरी संस्था अशा व्यक्तीला स्वीकारायला तयार होते, तीसुद्धा विशिष्ट अटींसह. या अटींमध्ये त्या व्यक्तीला बसवावं लागतं. यानंतर त्या संस्थेच्या ट्रस्टींमध्ये बैठक होते आणि त्या व्यक्तीला स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होतो… याला काही दिवस जातात… बऱ्याच वेळा सकारात्मक निर्णय मिळतो परंतु बऱ्याच वेळेला तो नकारात्मक सुद्धा असतो.

यात बरेच दिवस गेलेले असतात…

  1. सर्व अटी आणि नियमांचे पालन करून एखादी संस्था जेव्हा त्या व्यक्तीला स्वीकारायला तयार होते त्या वेळेला ते त्या व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करतात. आपल्याला मग त्या व्यक्तीच्या सर्व तपासण्या कराव्या लागतात. तपासण्यांचे रिपोर्ट यायला काही दिवस लागतात. तपासण्यांचे रिपोर्ट जर सकारात्मक असतील तर ठीकच, परंतु जर ते नकारात्मक असतील तर, वैद्यकीय रिपोर्ट नकारात्मक आहेत या कारणांमुळे आधी परवानगी देणारी संस्था ही परवानगी ऐनवेळी नाकारू शकते…

संस्था त्या व्यक्तीला स्वीकारणार की नाही हे कळण्यात काही दिवस जातात…

  1. समजा वरील तीनही बाबी सकारात्मक आहेत आणि एखाद्या संस्थेने या व्यक्तीला स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि आपण त्या व्यक्तीला त्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी सर्व तयारी करून घेऊन निघालो तर, एखादा सोम्या गोम्या मधेच उठतो आणि म्हणतो, “डॉक्टर तुम्ही घेऊन चाललेली ‘ती’ व्यक्ती माझी आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, मुलगी आहे, वहिनी आहे, भाची आहे, बहीण आहे… आता तुम्ही या व्यक्तीला कुठे नेणार? काय करणार? किडन्या काढणार की शरीरातले अजून कुठले पार्ट काढून विकणार? का जंगलात सोडणार का बाजारात विकणार?”

या सोम्यागोम्या ची आई, बहीण, भाची, बाप, भीक मागताना इतके दिवस हा सोम्या गोम्या कुठे होता? मधूनच त्याला इतकं प्रेम कुठून उफाळून येतं? हा सोम्यागोम्या मग वाट्टेल ते आरोप करतो. रस्त्यात तमाशा करतो. आरडुन ओरडुन जमाव गोळा करतो, “माझ्या माणसाला बघा हा डॉक्टर फसवुन कुठेतरी घिवुन चालला आहे”, असं जमावाला सांगतो…जमाव साहजिकच माझ्याकडे संशयाने बघायला लागतो. मी इथं शेळी होतो आणि जमावातला प्रत्येकजण वाघ! काहीवेळा मार खायची पाळी येते… प्राण कंठाशी येणं म्हणजे काय? याचा प्रत्यक्ष अनुभव जमावाच्या मध्यभागी उभं असताना येतो.

“इथून जीव वाचवायचा आसंल तर मांडवली करावी लागंल… जमाव चिडलाय, मी शांत करतो त्यांना, तुमी जरा पैश्याचं बगा…” हा सोम्या गोम्या हळूच कानाशी येऊन धमकी देत, पैशाची मागणी करतो.

मी पोलिस स्टेशनला चलण्याची भाषा करतो, जमावाला, वस्तुस्थिती काय आहे हे मी जीव तोडुन, हात जोडुन समजावुन सांगण्याचा प्रयत्न करतो पण जमावाला माझा आवाज ऐकू येत नाही, जमावाला माझी दया येत नाही! शेवटी प्राप्त परिस्थितीत जमावापासून जीव वाचवून तिथून निघून जाणं हेच शहाणपणाचं ठरतं. एखाद्या व्यक्तीला माणसांत आणण्यासाठी, सुरुवातीपासून जीवापाड घेतलेली मेहनत डोळ्यादेखत उध्वस्त होऊन जाते…

हे साधून काय मिळंत असेल त्या समाजकंटक सोम्यागोम्याला?

शेवटी रस्त्यावर असणारी ती व्यक्ती रस्त्यावरच पडून राहते आणि हातपाय बांधल्याप्रमाणे हतबल अवस्थेत माझ्या डोळ्यात नुसतच उरतं पाणी! आपण सावरत असलेलं एखादं आयुष्य, आपल्यासमोर जेव्हा होळी होत असतं तेव्हा ते बघणं आणि पचवणं खूप अवघड असतं, दोस्तहो! अशावेळी सारा गाव मामाचा असला तरी कोणीही कामाचा नसतो! आणि मग, झक्क मारली आणि ही केस हाताळली असं वाटायला लागतं… इथून पुढे मी अशी कोणतीही केस हाती घेणार नाही, अशी मनाशी तेव्हा शपथ घेतो… आणि पुढच्या वेळी रस्त्यावर तळमळत असणारी अशी एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर मागचं सारं विसरून पुन्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात विरघळतो!,

आपण कोणासाठी जिवापाड करत असलेलं हे काम पूर्णत्वाला जाणार? की एखादा सोम्यागोम्या येऊन मध्येच ते उध्वस्त करणार? या हेलकाव्यांमध्ये झुलत राहून मला हे काम करावं लागतं. शेवटपर्यंत कशाचीच खात्री नसते! हे सर्व चढ-उतार पाहून, यश-अपयश पचवून, टक्के टोणपे खात… एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर २१ निराश्रीतांना कायमस्वरुपी आसरा मिळवुन देवु शकलो.
पण, हे सांगण्यास लाज वाटावी? की कौतुक वाटावं? हे माझं मलाच कळत नाही!

समाजकंटक सोम्यागोम्या पासून भविष्यात काही त्रास होऊ नये, त्याने माझा खेळ लाथेनं उडवुन लावु नये, यासाठी भूतकाळातील अनुभवांमधून शिकवण घेत, एखाद्या व्यक्तीला स्थलांतरित करायचे असेल तेव्हा आता मी पोलीस स्टेशनला आधीच मध्यस्थी घालतो. एखाद्या रस्त्यांवर सापडलेल्या व्यक्तीला स्थलांतरीत करण्याआधी, सुरुवातीपासुन मी जे काही पाहिले आहे आणि अनुभवले आहे याचे फोटोसहीत डॉक्युमेंटेशन करतो… आणि मग त्या त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला सर्व कागदपत्रं माहितीसाठी सादर करतो. मी पुढे काय करणार आहे याची सविस्तर माहिती देतो. आणि पोलीस मामांना नमस्कार करून सांगतो, “मामा, जे करतोय ते हृदयापासून, मनापासून! यात कोणताही वाईट हेतू नाही, स्वार्थ नाही, पुढे एखादा ‘सोम्यागोम्या’ आडवा आला तर सोबत रहा… अडचण आली तर सांभाळून घ्या!” पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा माझा हेतू खरंच शुद्ध आहे, हे तपासलं जातं आणि त्यानंतर मला त्या व्यक्तीला स्थलांतरित करण्याची परवानगी मिळते, यात काही दिवस जातात!

वर सांगितलेल्या घटनाक्रमाच्या चारही कड्या मी व्यवस्थित जोडल्या तर सारं ठीक, पण यातली एखादी कडी जर तुटली किंवा डळमळीत झाली तर सारा खेळ खल्लास!

या साऱ्या दिव्यातून मला रोज पार पडावं लागतं… वर सांगितलेल्या घटनाक्रमाच्या चारही कड्या मजबूतपणे जोडण्यास काही वेळेला आठ दिवस लागतात… काही वेळेला दोन महिने लागतात… काही वेळेस सहा महिने लागतात… काही वेळा त्या कधीच जुळत नाहीत… काहीवेळा काही कारणामुळे मी रचलेला हा सुंदर डाव मधेच उध्वस्त होतो आणि मला तिथेच पूर्णविराम द्यावा लागतो… कायमचा!!!

मुद्दाम मी हे सविस्तर सांगितलं. आज मन मोकळं केलं!

माझी कुठे आणि कशी घुसमट होते, एखाद्याचं पुनर्वसन करण्यासाठी काय अडचणी येतात, वेळ कुठं लागतो, रचलेले डाव ऐनवेळी कसे मोडतात, हे इतरांनाही कळावं यासाठी विषयांतर करुन मनोगत मांडण्याची संधी घेतली.
“काय केलंय त्या व्यक्तीचं तुम्ही डॉक्टर? आणि इतका वेळ का लागतोय.?” मला असा प्रेमळ जाब विचारणाऱ्या सर्व सहृदय मंडळींना वरील माहिती समर्पित!

हां… तर सांगत हेच होतो की “बाळ” या ब्लॉग मध्ये लिहिलेल्या व्यक्तीला डॉ. नंदाताई शिवगुंदे यांच्याकडे आज रोजी सुपूर्त केलं आहे. याच प्रवासात मला भेटलेले अनेक मराठी चित्रपटांचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक असणारे एक वृद्ध बाबा सध्या फुटपाथवर हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. यांची कहाणी सुद्धा अत्यंत करूण आणि दारुण!

सांगेनच सविस्तर पुन्हा यांच्याविषयी कधीतरी!

यांच्यात आणि माझ्यातही स्नेहबंध निर्माण झाला… रस्त्यात तळमळणा-या या वृद्ध बाबांना तरी मी कसा रस्त्यावर सोडणार होतो? आणि मग शेवटी या दोघांच्या बाबतीत सुद्धा वरील सर्व “कड्या” यशस्वीपणे जोडून… वाटेत आलेल्या सोम्यागोम्याच्या छाताडावर पाय ठेवून, आज बुधवारी दि. २३ जुन रोजी सकाळी यशस्वीपणे दोघांनाही, स्पेशल कार मधून डॉ. नंदाताईंच्या छत्रछायेखाली पाठवित आहे.

वर्षानुवर्षे उकिरड्यात पडलेलं हे “बाळ” आणि “बाबा” आज दुपारपर्यंत एका सुरक्षित ठिकाणी, चार भिंतीच्या आत, कॉटवर… एका गादीवर निवांत पहुडलेले असतील… मागच्या काही दिवसांमध्ये दोघांचंही आयुष्यं मी जवळून बघितलं… अनुभवलं… पाहतांना, ऐकतांना बऱ्याच वेळा आतून धडपडलो, घुसमटलो, तळमळलो, ढसाढसा रडलो… कारमधून जाताना, दोघांनीही खिडकीबाहेर हात काढून, डोळ्यात अश्रू आणून मला जेव्हा टाटा केलं… तेव्हा आज मात्र मनसोक्त हसलो!

आजपासून पुढे ते असतील एका सुरक्षित “मायेच्या” छताखाली!

हि सुरक्षित “माय” आहे डॉ. नंदाताई शिवगुंदे (संपर्क क्रमांक : 9822277557), आधार केअर सेंटर भोगाव मधील वृद्धाश्रमात अनेक वृद्धांची ती आई झाली आहे!

मला सख्खी थोरली बहीण नाही.. पण माझी ती थोरली बहीण झाली आहे!
जीने जन्म दिला, त्या आईला रस्त्यावर सोडणारी माणसं मी पहिली आहेत…
ज्याला जन्म दिला, त्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर सोडणारी बाई सुद्धा मी पाहिली आहे…
परंतु कोणतंही नातं नसताना, उकिरड्यात पडलेल्या, पॅरालिसीस झालेल्या माझ्या या “बाळाला” आणि वृद्ध बापाला आपली “मुलं” म्हणून स्वीकारणारी ही माझी थोरली बहीण, डॉ. नंदाताई शिवगुंदे ही जगावेगळी आई झाली आहे!

तीला माझा प्रणाम!

नंदाताई…तुला नंदाताई म्हणू.? की नंदामाई म्हणू.?
माई, Copy न करताही Paste होते ती आठवण!
हि माझी आठवण रस्त्यावर सापडलेल्या या माझ्या दोन “बाळांच्या” रूपाने तुला सुपूर्द करतोय! जगण्याचं “मर्म” यांना मी शिकवण्याचा प्रयत्न केलाय…तू यांना “कर्म” म्हणजे काय ते शिकवशील यात शंका नाही!
“बीज” मी रुजवले आहे…पण आता तू पाणी घालशील याची मला खात्री आहे!
मी यांना “शब्द” दिले आहेत…तू यांना “अर्थ” सांगशील…
“शक्ती” म्हणजे काय हे मी त्यांना सांगितलंच आहे ताई… पण त्यांना आता “भक्ती” करायला तू शिकवशील!
“कविता वाचता” येते डोळ्याने, हे मी त्यांना सांगून ठेवलंय ताई… पण गाणं म्हणायला “हृदय” लागतं हे तू प्लीज त्यांना सांगशील…
हात साफ धुतल्याने जंतू मरतात हे मी “डॉक्टर” म्हणून माझ्या या दोन्ही बाळांवर बिंबवलय… पण मन साफ केल्यावर तिरस्कार सुद्धा मरतो हे तू “माणूस” म्हणून त्यांना शिकवशील…
घेण्यात “आनंद” असतो हे त्यांना अगोदरपासून माहित आहे… “समाधान” देण्यात मिळतं, ते तू त्यांना सांगशील!
करशील ना एव्हढं माझ्यासाठी.?

माझ्या या दोन्ही बाळांना आज तुझ्या पदरात घालतोय… सांभाळ त्यांना! त्यांच्या बरोबर जगलेले आणि भोगलेले… सर्व क्षण मी हृदयात जपून ठेवीन… आठवणींचा सुगंधी कप्पा म्हणून!

मी हि कधीतरी बाप होतोच कि त्यांचा!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*