जून महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

सप्रेम नमस्कार!

भिक्षेकरी ते कष्टकरी

  • पूर्वी पायाला जखम होऊन पायात किडे पडलेला एक जण… याची जखम पूर्ण बरी झाली आहे. हा सुद्धा फुटपाथ वर पडलेला असायचा. जखम बरी झाल्यानंतर याला छत असलेली व्हिलचेअर घेऊन दिली होती. दाढी कटिंग करणारा हा कारागीर आहे. ५ जून रोजी त्याला सलुनचं सर्व साहित्य घेऊन दिलं आहे. ज्या ठिकाणी फूटपाथवर तो पूर्वी पडून होता त्याच ठिकाणी तो हा व्यवसाय करतो.
    ज्या ठिकाणी तो असहायपणे पडला होता, त्याच ठिकाणी तो आता पाय रोवून खंबीरपणे उभा आहे!
  • दुसरी एक व्यक्ती… येरवडा येथे, पाय नसल्यामुळे रस्त्यातून सरपटत चालते. या व्यक्तीला सुद्धा छत असलेली व्हीलचेअर दिनांक २१ जून रोजी दिली आहे. या व्हीलचेअरवर बसून तो आता गोळ्या बिस्किट विकतो.
    रस्त्यावरची सरपट आणि आयुष्यातली फरफट आता दोन्ही थांबलं आहे!

घर देता का घर?

  • “बाळ” नावाने लिहिलेला एक अनुभव! तीन वर्षे उकिरड्यात पडलेला, Paralysis झालेला एक तरुण मुलगा! पूर्वी हा बँकेत काम करायचा. त्याला आयुष्यात उठून उभा करण्यासाठी १५ जून रोजी सुरू झालेली माझी परीक्षा २३ जून रोजी संपली. बरोबर नऊ दिवस लागले. या काळात खूप कळा सोसल्या मी आणि त्याने सुद्धा. ९ महिन्याच्या कळा सोसून बाळ जन्माला येतं तशी आईसुद्धा जन्माला येते. एक एक दिवस माझ्यासाठी एक एक महिना होता…
    नऊ दिवसांच्या कळा सोसून माझं हे बाळ जन्माला आलं, आणि त्याच दिवशी बाप म्हणून मी सुद्धा!डॉ. नंदाताई शिवगुंडे यांच्या केअर सेंटर मध्ये त्याची सर्व सोय केली आहे. नंदा ताईंनी याला परावलंबी न ठेवता त्यांच्या ऑफिसचे डाटा मेंटेनन्स चे काम याला दिले आहे.
    याच्या आयुष्याला दिशा तर मिळालीच आहे आता वेग येईल… पण वेगापेक्षा दिशाच महत्त्वाची! किती वेगाने पळतोय यापेक्षा कुठल्या दिशेने पळतोय हे महत्त्वाचं…
  • अनेक मराठी चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक! आयुष्यात झालेल्या शारीरिक आणि मानसिक अपघातांमुळे पूर्ण खचले, अशात कुटुंबाने सुद्धा हात सोडला. फुटपाथवर राहू लागले, जगू लागले…
    माझ्या या प्रवासात माझी आणि यांची भेट झाली, स्नेहबंध जुळला. रोज मांडत असलेल्या माझ्या नाटकात या पात्राची एन्ट्री झाली. फूटपाथ वरच्या रंगमंचावर आमच्यात संवाद सुरू झाले. दोन पात्री आमचा हा प्रयोग बघायला प्रेक्षक मात्र कुणीच नव्हतं. “घर देता का घर”? म्हणणारा नटसम्राट नाटकात पहिला होता, आज हा दुसरा नटसम्राट माझ्यासमोर उभा होता.
    “कॉमेडी चित्रपट लिहायला बसलो आणि आपोआप त्याची ट्रॅजेडी व्हावी तसं झालं हो डॉक्टर” हे सांगताना ते खो खो हसत असतात… आणि हसून झालं की मान वळवून दुसरीकडे बघतात. मान वळवली तरी गालावर आलेले अश्रू माझ्यापासून काही लपत नाहीत. इथं मात्र अभिनयात हा नटसम्राट कमी पडतो… यांची ही व्यवस्था डॉ. नंदाताई शिवगुंडे यांच्याकडेच दिनांक २३ जून रोजी केली आहे.
    ते मला नेहमी म्हणतात “डॉक्टर आता तुमच्यावर पटकथा लिहिणार आहे, त्यावर चित्रपट निघावा अशी माझी इच्छा आहे. तुमची भूमिका सुबोध भावे यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे… बघू कसं कसं जमतंय ते… यावर मी नुसताच हसतो! हा चित्रपट म्हणे ते मनातल्या मनात रोज बघत असतात.
    हा माणूस उठून चालायला लागेल, पुन्हा माणसात येईल आणि त्याच्या घरातले लोक त्याला कधी ना कधीतरी भेटून, मिठी मारून, डोळ्यात पाणी आणून, त्यांना विनंती करतील, “चला ना हो आबा घरी… सगळे जण वाट बघत आहेत तुमची!” अशा दृश्याचा चित्रपट मीही रोज मनातल्या मनात पाहतो!
    यावर खो खो हसतं ते मला म्हणतील, “आयला, माझ्या आयुष्याच्या चित्रपटांमध्ये असा काही ‘क्लायमॅक्स’ येईल असं मला वाटलं नव्हतं… हहा..हहा..हहा!”
    ते हसत असतील आणि या वेळी अश्रू माझ्या डोळ्यात असतील…

वैद्यकीय

  • ७० वर्षाची एक आजी हिला गर्भाशयाचा कॅन्सर आहे… अर्थात हे नंतर कळलं.ती ज्या ठिकाणी बसली असेल… त्या ठिकाणापासून नळ फुटल्यावर पाणी वाहत तसं ययरक्ताचे थारोळं साठायच… संपूर्ण एक महिनाभर तीच्यावर उपचार सुरु आहेत आजच्या घडीला तीचे सर्व त्रास थांबले आहेत.
    फुटलेल्या धरणाला बांध घातला आहे…
  • गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय नाहीत असा एक मुलगा. याला दोन वर्षांपूर्वी छत असलेली व्हीलचेअर दिले होती, या व्हीलचेअर मध्ये बसून सॉक्स, रुमाल, गोळ्या बिस्कीट वगैरे तो विकतो. मधेच याच्या पायाला काहीतरी जखम झाली. भोपळ्या एवढा पाय सुजला. ताराचंद हॉस्पिटल मधील माझे मित्र डॉक्टर धनराज गायकवाड यांच्याकडे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे.
  • बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर ९०० पेक्षा जास्त भीक मागणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे रस्त्यावर याचना करणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार केले.
    ५०० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे इत्यादी दिले आहेत.
    रस्त्यावरच राहणाऱ्या, झोपणाऱ्या या व्यक्तींना शरीरावर कोणत्याही प्रकारचं फंगस (Fungus) जमा होवु नये यासाठी अत्यंत उच्च प्रतीचा मेडिकेटेड साबण स्वच्छतेसाठी देत आहोत.

भोक्ता ते दाता

  • आयुष्यभर लोकांकडून “भीक” घेऊन भिक्षेकरी म्हणून वागलास… रक्त “दान” करून चल आता जगायला शिक. हा विचार आता त्यांच्यात रुजवायला सुरुवात केली आहे. या महिन्यात एकूण आठ जणांनी रक्तदान केलं आहे. आठ जणांच्या या रक्तदानामुळे समाजातील २४ जणांचे प्राण वाचणार आहेत!

भीक नको बाई शीक…

  • पूर्वी भिक मागणारा परंतु आता कष्टकरी झालेला एक गृहस्थ. याच्या दोन्ही मुलांना शालोपयोगी साहित्य देऊन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी या महिन्यापासून घेतली आहे.
  • भीक मागणाऱ्या आज्यांच्या चार नातवंडांना या महिन्यात शालोपयोगी साहित्य दिले आहे.
  • जुलै महिन्यात साधारण ३० मुलांना शालोपयोगी साहित्य देणार आहोत.

अन्नपूर्णा

१ मे पासून सुरू झालेला हा प्रकल्प. रोज सहस्त्र भोजन घालण्याचं भाग्य भल्याभल्या राजवाड्यांना सुद्धा मिळालं नसेल. समाजाने मात्र हे भाग्य आमच्या पदरात टाकलं.
आज ३० जून बावन्नावा दिवस!रोज एक हजार लोकांना जेवण या हिशोबाने आज ५२००० हा जेवणाचा आकडा आपण पार केला आहे. यात आमचं कोणतही वैयक्तिक कर्तुत्व नाही. समाजाने समाजाला दिलं… आम्ही फक्त मधला दुवा झालो. माझे मित्र श्री प्रसादजी दातार यांच्या माध्यमातून GMBF Global Cares, Dubai यांनी या प्रकल्पात सिंहाचा वाटा उचलला. हा प्रकल्प यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे. या प्रकल्पात आम्हाला अनंत आशीर्वाद मिळाले परंतु ते आमच्या एकट्याचे नाहीत… हे सर्व आपण दिले आहे, याचं सारं श्रेय आपलं! या पत्ररूपाने आम्हास मिळालेले हे आशीर्वाद आम्ही आपल्या चरणी सादर समर्पित करत आहोत, कृपया स्विकार व्हावा.

खराटा पलटण

आदरणीय गाडगेबाबांच्या विचारांतून जन्माला आलेली ही खराटा फलटण. ४० आज्या सार्वजनिक स्वच्छतेचे काम करत आहेत आणि त्या बदल्यात त्यांना आपण मानधन देत आहोत. दर शुक्रवारी आयोजीत होत असलेल्या खराटा पलटणच्या माध्यमातून लोकांनी वापरून रस्त्यावर टाकलेले मास्क गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं सुरू केलं आहे. “बाळ” नावाने लिहिलेल्या अनुभवातील मुलगा ज्या उकिरड्यात राहायचा तो संपूर्ण उकिरडा या टीमने साफ केला आहे. पुण्यातल्या एका प्रेक्षणीय स्थळाच्या बाजूला असलेला हा डाग, ज्यांना लोक भिकारी म्हणतात त्यांनीच संपूर्णपणे उखडून टाकला आहे.

जागतिक योग दिन

२१ जूनला जागतिक योग दिन संपन्न झाला! डॉ. मनीषा योगाची मास्टर ट्रेनर आहे. जागतिक योग दिनानिमित्त अनेक संस्था, व्यक्ती, सोसायट्या यांनी तीला योग मार्गदर्शन करण्याविषयी, योग आसने घेण्याविषयी आमंत्रित केले होते. मोठ मोठ्या लोकांमध्ये आणि सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांमध्ये जाण्याची संधी असूनही नेहमीप्रमाणेच तीने भीक मागणाऱ्या माझ्या समाजामध्ये बसणं मंजूर केलं. शनिवारवाड्याच्या परिसरात २०० भिक्षेक-यांसाठी तीने रस्त्यावरच त्यांची योग आसने घेतली. भीक मागणारी इतकी मंडळी एकत्र येऊन जागतिक योग दिनानिमित्त योग आसने करत आहेत, ही जगातली पहिलीच घटना असावी.
एकाने डॉक्टर मनीषाला विचारलं, “प्रतिष्ठित लोकांमध्ये योगा विषयी मार्गदर्शन करण्याचे सोडून तुम्ही भिक मागणाऱ्या वर्गाला या दिवशी मार्गदर्शन करण्याचे का निवडले?”
यावर तीने मार्मिक उत्तर दिलं. ती म्हणाली, “या समाजालाच आम्हाला प्रतिष्ठित बनवायचं आहे!”

तीच्या या वाक्यात माझ्या जगण्याचं सार दडलं आहे! यादिवशी भिक्षेकरी समाजाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हालाही खूप समाधान झालं! शेवटी काय, घेऊन मिळतो तो आनंद आणि देऊन मिळतं ते समाधान!!!

मनातलं काही

साधारण पन्नाशीची एक मावशी. फुटपाथवर आडोसा करून राहते. तीला अनंत आजार आहेत, गेल्या दोन वर्षापासून सर्व वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत मी बऱ्याच वेळा तीला जेवणाचा डबा घेऊन जातो. हिचा स्वतःचा कोणताही ठावठिकाणा नाही, तरीसुद्धा रस्त्यावर असणाऱ्या एका अपंग मुलाचं मातृत्व तीनं स्वीकारलं आहे. आधी त्याला जेवू घातल्याशिवाय ती स्वतः काहीच खात नाही. आपल्याला भूक लागली म्हणून आपण खातो ती प्रकृती, परंतु स्वतःकडे काहीही नसताना आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणे ही झाली संस्कृती!कुठून येते ही दानत? स्वतःला काहीही आधार नसतांना दुस-याला आधार देण्याचं बळ कुठनं येतं?
एकदा कुणीतरी तीला कपडे दिले. त्यात साड्या, शर्ट-पॅंट असं बरंच काही सामान होतं. डब्बा द्यायला गेल्यावर तीने ते सर्व बोचकं माझ्यापुढं उघडलं आणि म्हणाली, “मनीषासाठी साड्या आणि तुझ्या मापाच्या प्यान्टा हायत, मी संबळुन ठिवलं हुतं, घिवुन जा… भारीतली हायत कापडं!”
मी म्हटलं, “अगं तू वापर की या साड्या…”
म्हणाली, “नगं… माज्याकडं बक्कळ हाय… तू ल्योक हायस आन् ती सुनबाय… आता चांगली कापडं म्या घालायची? का पोराबाळास्नी द्यायची.? मला कुणी शर्टं दिला तर सोहम साटी पण ठिवते, पुन्यांदा आलास की घिवुन जा…”
तीचं बोलणं ऐकुन माझ्या डोळ्याला धारा लागल्या… स्वतःकडे काहीही नसताना माझ्याकडे “बक्कळ” आहे म्हणायची समाधानी वृत्ती येते कुठून? आपण जन्माला न घातलेल्याला, आपलंच लेकरू समजण्याचा भाव येतो कुठून? त्यासाठी आईच व्हावं लागतं!

जुन्या शर्ट पॅन्टचं तीने दिलेलं हे बोचकं मी अभिमानाने मिरवत घरी घेऊन आलो… आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात “किंमती नजराणा” आहे तो!

Future Plan

  • एक आजोबा आणि एक अपंग गृहस्थ फुटपाथवर असहायपणे जगत आहेत. या दोघांनाही सर्व कार्यवाही पूर्ण करून डॉक्टर नंदाताईं कडे पुढील महिन्यात घेऊन जाण्याच्या विचारात आहे.प्रोफेशनल ट्रॅव्हल एजन्सीचे लोक यांना कारमध्ये बसवुन घेण्यास नाखुश असतात… त्यांचंही बरोबरच आहे म्हणा! स्वर्ग प्रत्येकालाच हवाय… पण मरण कुणालाच नको असतं!
    आता यांच्या प्रवासासाठी कार शोधणं ओघानं आलंच…
  • डोळ्यांच्या ऑपरेशन वाचून अनेक लोक तळमळत आहेत, परंतु “कोरोनाची लाट ओसरु द्या, मग ऑपरेशन सुरू करू” असं डोळ्यांच्या हॉस्पिटलमधून सांगण्यात येत आहे.
    वाट बघण्यावाचून माझ्या हातात काही नाही…
  • अन्नपूर्णा प्रकल्पातून हॉस्पिटल मधील रुग्णांना अन्नदान करणे.
  • ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असा एक वर्ग आणि भीक मागणारा माझा नेहमीचा वर्ग माझ्याकडे काही काम मागत आहे अशा लोकांसाठी काम शोधणे.
  • याव्यतिरिक्त “डॉक्टर फॉर बेगर्स” या प्रकल्पात भीक मागणा-या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे या व्यतिरिक्त आणखी जे समोर येईल ते…

जून महिना संपला… पुढच्या पानावर काही चांगलं लिहिलं असेल या आशेनं माणूस मागची पानं उलटतो! जुलै महिन्यात आणखी काही तरी चांगलं असेल या आशेवर, जून महिन्याचं पान आपल्या साक्षीनं उलटत आहे!

आपल्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा हा आढावा आपणास सविनय सादर!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*