विठ्ठल… विठ्ठल!

हा मला दिसला बरोबर दोन वर्षांपूर्वी!

मोटर सायकल वरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सहज रस्त्याकडेला लक्ष गेलं. आडबाजूच्या रस्त्याकडेला हा उघडा बंब पडून होता, निपचित… नाही म्हणायला, लाज झाकण्यापुरतं एक वस्त्र अंगावर होतं… ते ही फाटकं…

दाढी आणि मिशा वाढलेल्या… निष्प्राण डोळे, अर्धवट उघडे… उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली भली मोठी जखम आणि त्यावर बसलेल्या माशा! कितीतरी महिने अंघोळ नसावी, अंगावर घाणीचा काळा थर बसलेला… त्याच्या आजूबाजूला दोन-चार कुत्री निवांत बसून होती.

सुरुवातीला याला पाहून मला असं वाटलं, हा “गेला” असावा! मी असा विचार करत असतानाच त्याचा उजवा हात हलला. याच्यात आणि माझ्यात पाच ते सात फुटांचं अंतर होतं, तरीही जखमेचा विचित्र दर्प नाकात शिरत होता. भयानक घाणेरड्या वासाने, येणारे-जाणारे लोक नाकावर रुमाल धरून त्याला वळसा घालून जात होते.

सहज मनात एक विचार आला, त्याच्या आजूबाजूला जी चार-पाच कुत्री बसली होती त्यांना हा वास येत नसावा का? नाकं तर त्यांनाही होतीच की! माणसांना जशी किळस येते तशी त्या जनावरांना किळस येत नसेल का? कदाचित जनावरं ही “माणसं” नसतात म्हणून “माणूसघाणेपण” अजून त्यांच्या अंगात शिरलं नसावं का.?

विचार करतच गाडीवरून मी उतरलो. बरेच दिवस पोटात अन्न नसल्यामुळे तो अर्धमेला झाला होता. आधी त्याला पाणी पाजलं. पायाला झालेल्या जखमेची अवस्था अत्यंत वाईट होती, त्यातून अक्षरशः अळ्या बाहेर पडत होत्या. या अळ्यांनी संपूर्ण पाय पोखरून टाकला होता. स्पिरिटने जखमा स्वच्छ करून ड्रेसिंग केलं आणि त्याला रस्त्यावरच परंतु त्यातल्या त्यात सुरक्षित जागी हलवलं.

तो दुसऱ्या जागी जात असताना त्याच्या आसपास बसलेला एक कुत्रा सुद्धा त्याच्या मागोमाग आला. याबद्दल मी त्याला सहज विचारलं, तर तो म्हणाला “माझ्या जखमेच्या वासाने माझ्या आसपास कोणी येतच नाही, परंतु दुरून कोणी काही खायला फेकलं की आम्ही दोघं ते वाटून खातो… “

“अरे, एक तर तुलाच काही मिळत नाही खायला आणि जर मिळालं तर ते तू कुत्र्यासोबत वाटून खातोस?” माझा अप्पलपोटा स्वार्थी विचार मी बरळलोच…
“हा साहेब, तीची अवस्था पण माझ्यासारखीच आहे… तो कुत्रा नाही, ती मादी आहे… तीच्या पायालाही लागलंय… माझ्यासारख्या माणसाला खायला मिळत नाही… तीला कोण देणार खायला? नीट बघा, ती गर्भार आहे… ती उद्या आई होईल… इथुन तिथुन सर्वांची आई सारखीच ना.? माझी आई लहानपणीच वारली… आता हिला खावु घालुन पांग फेडतोय!”

मी “तीच्याकडं” निरखून पाहिलं, माझ्यासारख्या डॉक्टरच्या लक्षात जे आलं नव्हतं ते याच्या लक्षात आलं होतं… ती गर्भार होती! शिवाय मागच्या डाव्या पायाला सुद्धा जखम होती आणि त्यामुळे तीला नीट चालता येत नव्हतं… दोघांनी एकमेकांचं दुःख जाणलं होतं, फरक इतकाच की त्याचा पाय “उजवा” होता आणि हिचा “डावा”!

स्वतःकडे काहीही नसताना, स्वतः अडचणीत असताना, एका जनावरामध्ये आई शोधणारा “तो”  आणि दुर्गंधीत आजारी बाळाच्या उशापायथ्याशी “आई” होऊन बसणारी “ती”! वरवर जनावरा सारख्या दिसणाऱ्या याच्यात मला त्या वेळी एक “माणूस” दिसला आणि तीच्यात आई!

मी या दोघांना मनोमन नमस्कार केला!

पुण्या शेजारचं याचं एक गाव! जवळचं कुणीच नव्हतं, नातेवाईक फक्त सांगण्या पुरते… केशकर्तन, दाढी कटिंग करण्याचं विशेष कसब याच्या अंगात… अंगच्या कलेमुळे पुण्यातील एका मोठ्या सलून मध्ये कामाला लागला. अनेक प्रतिष्ठित मंडळी आमची कटिंग तूच कर म्हणून हटून बसायचे… याला अभिमान वाटायचा… हातात पैसे खेळू लागले… एकटा जीव मजेत जगत होता… सात वर्षांपूर्वी एकदा कामावरून परत जात असताना एक्सीडेंट झाला, त्यात डावा पाय मोडला आणि उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली मोठी जखम झाली!

ओळखी पाळखीच्या लोकांनी सुरुवातीला काही रक्कम जमा करून त्याच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करून दिले. परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे हा आता स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हता. तो जमिनीवरच पडून राहायचा… आता नोकरी सुद्धा गेली आणि स्वतः कडचा सर्व पैसा संपला… ओळखीपाळखीच्या लोकांनी सुरुवातीला मदत केली, परंतु काही वेळा सख्खे सुद्धा जिथं आपले नसतात तिथं परके किती दिवस साथ देणार?

भूक माणसाला चटकन मारतही नाही आणि नीट जगूही देत नाही… याच भुकेपोटी… तो सरपटत, जमिनीवर लोळण घेत अन्नासाठी, रस्त्यांवरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे याचना करायचा… लोक द्यायचे… पुढे सवय लागली… पुढे ही जखम वाढत गेली… सेप्टीक झाले जखमेत… अक्षरशः किडे पडले… आता याच्या जवळ येणं सुद्धा लोकांनी सोडलं आणि हा खऱ्या अर्थाने एकाकी झाला! मला भेटला होता, तेव्हा सात वर्षे झाली होती तो असा रस्त्यात पडून होता!

गेल्या सात वर्षात त्याने भोगलेले प्रसंग तो मला त्यावेळी रडून सांगत होता… त्याच्या सोबत असणारी “आई” हे सारं कान लावून ऐकत असावी… कारण तीच्याही डोळ्यात मला पाणी दिसलं… आईच ती!!!

या नंतरच्या दिवसात मी त्याला अनेक डॉक्टरांकडे दाखवलं… प्रत्येक डॉक्टरांनी उजवा पाय गुडघ्याच्या खाली कापून टाकावा लागेल असाच सल्ला दिला. मला ते मान्य नव्हतं…
भरकटतं ते पाऊल… घसरतात ते पाय… दिशा दाखवतात ते चरण!
पायच कापल्यावर कसली आलीय दिशा.? नुसतीच होणार होती दशा!

माझे मित्र डॉ. धनराज गायकवाड यांनी, आब्या बघू एक शेवटचा प्रयत्न करू… म्हणून माझ्या शब्दावर ट्रीटमेंट सुरु केली. हळूहळू का होईना, परंतु जखम सुधारायला लागली… गायकवाड सरांनी या बदल्यात पाच पैसेही फी घेतली नाही… माझा प्रणाम या वैद्याला! “वैद्य” कसला… मला भेटलेला “देव” तो हाच!

परंतु जखम बरी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यावर अतोनात खर्च होत होता. आणि… काय आश्चर्य… एकेदिवशी जखम पूर्णपणे बरी झाली. झालेला सर्व खर्च भरून पावला… पाय वाचला! आता त्याला बसता येऊ लागलं. झोपुन सरपटण्याऐवजी… आता तो बसुन सरपटायला लागला… मला खुप आनंद होत होता या प्रगतीत…हो, प्रगती अशीच मोजतात… त्यासाठी अपंग मुलाचं आईबाप व्हावं लागतं!

माझा आपला तोच आनंद!

यानंतर त्याला छप्पर असलेली व्हीलचेअर घेऊन दिली. दोन्ही पायावर उपचार सुरूच होते. हळूहळू त्याला कुबड्यांवर चालायला शिकवलं… कुबड्या घेऊनही दिल्या. काही महिन्यांनंतर कुबड्या सोडायला लावून हातात एक काठी दिली. या काठीच्या सहाय्याने तो लंगडत का होईना, पण चालायला लागला. यानंतर त्याला म्हटलं, “तुझा पूर्वीचा व्यवसाय तू चालू करशील?” त्याच्या डोळ्यात चमक आली… पण ती थोडाच वेळ टिकली… म्हणाला, “सारं काही विसरलोय मी… माझ्यात आता कोणताही आत्मविश्वास नाही आणि शिवाय माझ्याकडे दाढी कटिंग साठी कोण येणार?”

म्हटलं, “येड्या मासा पोहायचं विसरतो का?”
तो म्हणाला, “ते खरं आहे, परंतु कटिंग करताना काही चूक झाली, तर गिऱ्हाईक खवळेल ना? हात साफ कसा होणार?”
यानंतर त्याला लागणारं सर्व साहित्य घेऊन दिलं, सर्व सामान हातात देऊन त्याला म्हणालो, “चल गड्या, पहिली कटिंग माझीच कर…”
“सर… आवो!”  त्याचा विश्वासच बसेना!

रस्त्याच्या कडेला मी मांडी घालून बसलो आणि म्हणालो “हां चल रे कर सुरू…”
थरथरत्या हाताने त्याने कात्री हातात घेतली… ही कात्री तो जवळपास आठ साडे आठ वर्षानंतर हातात पकडत होता. त्याला रडू आवरेना… कटिंग सोडून माझ्या शेजारी बसून खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडला… रडण्याचा भर ओसरल्यानंतर पुन्हा कात्री हातात देत त्याला म्हटलं, “चल भावड्या कर सुरू कटिंग… काळजी करू नकोस.”

थरथरत्या हाताने, त्याने माझी रस्त्यातच कटिंग सुरू केली… मध्येच तो थांबत होता… मध्येच माझ्या चेह-याकडे पहात होता, बिचकत होता…
शेवटी त्याला हसत म्हणालो, “काहीही चूक झाली तरी चालेल, माझा पुर्ण चमन गोटा केलास तरी चालेल… हरकत नाही… केस काय पुन्हा हळूहळू वाढतीलच… पण सध्या तुझा आत्मविश्वास वाढवणं मला जास्त गरजेचं आहे!”

कटिंग पूर्ण झाली, मी शंभराची नोट त्याच्या हातावर ठेवली. दोन्ही हातांच्या चिमटीत धरून तो त्या नोटेकडे खूप वेळ पाहत होता, गालावरुन अश्रू ओघळत होते…
मी पुन्हा गमतीने त्याला म्हणालो, “अरे नोट खरी आहे बाबा, ठेव खिशात!”
नोटे वरून जरासुद्धा नजर न हटवता रडत मला तो म्हणाला, “सर खरी आहे म्हणूनच पाहतोय, हे जे चालले आहे ते सारं खरं आहे हे अजूनही मला पटत नाही.”
यानंतर, त्याने ती माझीच नोट माझ्या पायावर ठेवली… मी अवघडलो… म्हणाला , “सर, माझी पहिली कमाई, तुमच्या पायाशी सादर! “

या नंतर मी त्याला माझ्या सोबत घेऊन फिरायला लागलो. केस वाढलेला, दाढी वाढलेला कुणी भिक्षेकरी दिसला तर याला कटिंग करायला लावायचो. दिवसातून असे आठ-दहा ग्राहक करायचे आणि त्या बदल्यात मी त्याला पैसे द्यायचो अशाप्रकारे हळूहळू त्याची मिळकत वाढली आणि सोबत आत्मविश्वास सुद्धा!

23 जून 2021ही तारीख अनेक कारणांसाठी माझ्यासाठी महत्त्वाची आहे…
या दिवशी अनेक वर्षांपासून उकिरड्यात पडलेल्या एका मुलाला डॉक्टर नंदाताई शिवगुंडे यांच्या निवारा केंद्रात पाठवले होते. बाळ नावाने याच्याविषयी लिहिलं होतं…
याच दिवशी चित्रपटाचे लेखक आणि कलावंत यांनाही डॉक्टर नंदाताई शिवगुंडे यांच्या निवारा केंद्रात हलवले होते…

आणि २३ जून २०२१ याच दिवशी माझ्या या कारागिराची काठी सुटली होती…
तो कोणत्याही साधनाशिवाय स्वतंत्रपणे व्यवस्थित चालू शकत होता! कोणत्याही आधाराशिवाय, न लंगडत! आता त्याचं ते स्वतंत्र चालणं पाहून मला काय आनंद झाला असेल… हे मी शब्दात सांगूच शकत नाही…

दोन वर्षांपूर्वी मगरीसारखा रस्त्यावरुन सरपटत… घसरत… जाणारा हाच तो…
रस्त्यावर तेव्हा पडलेला हाच तो…
घाणेरड्या वासाचा हाच तो…
हाच तो… मला आठवला!

बाळाचा जन्म झाल्यानंतर, बाळाचं पोटावर घसरणं.., पालथं पडणं… दोन हात आणि पायाच्या बळाने रांगण्याचा प्रयत्न करणं… त्यानंतर हळूहळू पडतझडत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणं… आणि कालांतराने बाळाचं ते दुडूदुडू धावणं… हि सगळी स्थित्यंतरे त्याची आई पाहत असते.
अक्षरश: ही सर्व स्थित्यंतरे मी याच्याही बाबतीत या दोन वर्षात पाहिली होती!

पाय कापायचा सल्ला दिलेला हाच तो. तो चालत माझ्या जवळ येतो काय आणि मला मिठी मारतो काय…
दोन वर्षांपूर्वी याच्या पासून पाच फुटांवर उभं राहण्याचं कोणाचं धाडस नव्हत… आज तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो काय… सगळंच अतर्क्य!

२३ जून ला उकिरड्यात पडलेल्या मुलाच्या दाढी-कटिंग साठी मी यालाच घेऊन आलो होतो.
यावेळी याला मी सहज म्हणालो, “काय रे जातोस का तू पण त्या नंदा ताईंच्या सेंटरला? तिथं आश्रमात अनेक लोक आहेत, त्यांची दाढी-कटिंग कर, बदल्यात नंदाताई तुला अन्न-वस्त्र-निवारा देतील, बघ पटतंय का.?”
कसलेही आढेवेढे न घेता तो चटकन म्हणाला, “चालतंय की सर, इथ रस्त्यात पडण्यापेक्षा तिथं सन्मानानं काम करून जगतो की…”

काहीही ध्यानीमनी नसताना मी हे सहज बोलून गेलो होतो. त्यावर इतक्या पटकन त्याचा होकार येईल असं मला वाटलं नव्हतं , नंदा ताईंना विचारण्या आधीच मी हा आगाऊपणा केला होता. नंदाताईनी याला आणायला नकार दिला तर मी तोंडघशी पडणार होतो…
मी नंदा ताईंना चट्कन् फोन लावला आणि चाचरत सर्व परिस्थिती सांगून , “हा तुमच्या कडील लोकांची सेवा करेल… याला पण पाठवू का असं विचारलं?”

नंदा ताईंचा होकार की नकार? तळ्यात की मळ्यात? असा काहीसा विचार माझ्या मनात चालू असताना… चटकन ती माउली बोलून गेली, “काय रे अभिजीत? तू कधीकधी लहान मुलांसारखे प्रश्न विचारतोस मला… पाठवून दे ना त्याला… आजच, आत्ताच… इथल्या लोकांची सेवा तर तो करेलच परंतु मी गावात त्याला छोटसं कटिंगचे दुकान पण टाकून देईन… चल बाय!”

“आईचं पत्र हरवल्लं… ते मल्ला सापडल्लं”… हा खेळ मी लहानपणी खेळायचो… आज मोठेपणी मला आख्खी एक आईच सापडली…
२३ जूनलाच त्याला पाठवून दे असं नंदाताई म्हणाल्या होत्या, परंतु चित्रकार कितीही निपुण असला तरीही,चित्रावर तो एक शेवटचा हात मारतोच… मलाही माझ्या या सुंदर चित्रावर एक हात शेवटचा मारायचा होता… शिवाय कागदपत्रंही तयार करायची होती…

नुकतंच लग्न ठरलेल्या मुलीचे आई-वडील लग्नाअगोदरच्या महिन्यात खूप हळवे होतात… ती आता दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून ते आनंदी तर असतात आणि मनातून दुःखी सुद्धा… या काळात ते तीचे कोडकौतुक करतात, लाड करतात तीला जे हवं असेल ते आणून देतात…

नवरीमुलीची आई तर उगीचच मुलीच्या गालाला, कपाळाला, मस्तकाला काहीतरी बहाणे काढून हात लावत असते… मध्येच काहीतरी जुनी आठवण काढून तीच्यासमोर हसत असते… आणि स्वयंपाक घरात जाऊन रडत बसते! मुलीचा जो बाप असतो त्याची झोप उडालेली असते… आपण फारच करारी आणि रागीट आहोत हे दाखवण्यासाठी हॉलमध्ये हात मागे बांधून तो येरझाऱ्या घालत असतो… हाच बाप रात्री उशिरा, सगळे झोपल्यानंतर संडासातला नळ जोरात सुरू करून येड्यासारखा रडत असतो!

२४ जून ते १८ जुलै या काळात माझं सुद्धा हेच झालं!

मी याची आई होतो आणि बाप सुद्धा! याला दूर पाठवताना माझी काय अवस्था झाली असेल?
या काळात मी आई म्हणून जगून घेतलं आणि बाप म्हणून भोगून पण घेतलं!

आणि आज १९ जुलै २०२१ ला मी त्याला डॉ. नंदा शिवगुंडे यांच्या आधार केअर सेंटरला त्याला पाठवून दिलं. इथं तो कुणावर अवलंबून राहणार नाही… तो काम करेल… खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा राहील!

डॉ. नंदाताई शिवगुंडे ज्यांनी मला आणि माझ्या या मुलाला खऱ्या अर्थाने मदत केली मी त्यांचा ऋणी आहे. खरं कौतुक त्यांचं आहे… आयुष्यभर त्या सांभाळतील त्याला… कोणाला त्यांचं कौतुक करावसं वाटलं तर दोन शब्द नक्कीच बोलून घ्यावं त्यांच्याशी ९८२२२ ७७५५७ या नंबर वर…

श्री. श्रीपाद बापट सर माझे गुरुबंधू! यांनी आपल्या भल्यामोठ्या गाडीतून “त्याला” डॉ नंदाताई यांच्याकडे आज (१९-०७-२०२१) स्वतः ड्राईव्ह करून सोडले आहे. यांचं ऋण कसं फेडावे.?

उद्या २० जुलै… आषाढी एकादशी!
वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जातात तो हा दिवस!!
डॉ नंदा ताईंचे आधार केअर सेंटर पंढरपूर रोडला…

हा काय योगायोग आहे कळत नाही!

मी कोणी वारकरी नाही… मी निव्वळ भिक्षेकरी…
मला टाळ वाजवता येत नाहीत… परंतु गरीबाचा ताल समजतो…
मला अभंग म्हणता येत नाहीत… तरीही भिक्षेकर्यात बसून त्यांचं गीत गातो…

मला “वेद” समजत नाहीत, पण मी “वेदना” समजतो…
कामाच्या गडबडीत अभिषेक घालणं मला कधी जमलंच नाही… मी रस्त्यावरच्या उघड्या नागड्या दुर्गंधीत लोकांना मग आंघोळी घालतो…

पूजा बांधायला मला कधी वेळच मिळत नाही… मग रस्त्यातल्या एखाद्या माऊलीची मी सेवा करतो आणि तीथं मला रखुमाई भेटते… माझी गोळ्या आणि औषधं मग नैवेद्य होऊन जातात!

पंढरपुरास जाणंही मला कधी जमलंच नाही… कंटाळून, वाट बघून… शेवटी विठ्ठलच मग माझ्या दारी येतो…
तो विचारतो, “काय रे आभ्या, तुज पंढरपुरास येणे का जमले नाही?”
मी म्हणतो, “तू मला प्रत्येक माणसात दिसतो… मग मी कशाला जाऊ पंढरपुरी.?”
कमरेवर हात ठेवुन मग तो, गालात हसतो…

इथे मी नतमस्तक होतो…
कुठेही न चालता माझी वारी पुर्ण होते…
माझ्या आजुबाजुचा सारा परिसर मग पंढरी होतो…
मला दिसणारा प्रत्येक माणुस माझा पांडुरंग होतो…
आणि मग मीच तुकोबाचा अभंग होतो…
माऊलीचा रेडा होतो!!!

विठ्ठल… विठ्ठल !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*