जुलै महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

सप्रेम नमस्कार!

भिक्षेकरी ते कष्टकरी

  • दोन्ही पायाने अधू असलेले एक दिव्यांग गृहस्थ, सारस बाग परिसरात ते भीक मागत असतात. यांचं समुपदेशन करून यांना एक वजन काटा घेऊन दिला आहे, आता ते भीक मागण्या ऐवजी, सारस बाग परिसरात वजन काटा घेऊन बसतात. पूर्वी लाचार होऊन ते लोकांकडे पैसे मागायचे…
    ती “भीक” होती… आता ते “कमाई” करतात स्वाभिमानाने!
  • पायाने अधू, डोळ्याला दिसत नाही, अशा एका मावशीला व्हीलचेअर घेऊन दिली. ऊन-पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून या व्हीलचेअरला, ऑटो रिक्षाला असतं तसं छप्पर करून दिलं आहे. आतमधून कप्प्यांची सोय केली आहे , हँगर अडकवता येतील असे हुक्स लावून दिले आहेत. गजबजलेल्या झोपडपट्टीच्या प्रवेश द्वाराजवळ ही मावशी आपली व्हीलचेअर घेऊन थांबेल, या गाडीमध्ये झोपडपट्टीवासीयांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी घेऊन ती तिथे त्याची विक्री करेल.या आठवड्यात विक्रीयोग्य सर्व साहित्य तिला घेऊन देणार आहोत.
    काल ती “भिक्षेकरी” होती उद्या ती “कष्टकरी” असेल!

घर देता का घर?

  • “विठ्ठल विठ्ठल” या अनुभवात लिहिलेल्या केशकर्तन कारागीरांस १९ तारखेला डॉ. नंदाताई शिवगुंडे यांच्या आधार सेंटर मध्ये निवारा आणि काम मिळवून दिले आहे. तो तिथे आनंदाने काम करत आहे, स्वाभिमानाने जगत आहे. चार भिंतीच्या आत आपण राहतो ते नुसतं “घर”… परंतु चार भिंतीच्या आत जीथं आपल्या माणसांचा “सहवास” लाभतो ते “निवास”!
    कित्येक वर्ष रस्त्यावर पडलेल्या याला, खऱ्या अर्थाने निवास मिळाला आहे!
  • फुटपाथवर उघड्यावर राहणारे एक दांपत्य! त्यांच्याच शेजारी जवळपास दहा कुटुंब त्या फुटपाथवर राहतात. सध्याच्या मुसळधार पावसात कच्ची – बच्ची, तान्ही, उघडी-नागडी पोरं पावसात भिजत असतात. लपायला, बचाव करायला कुठलेही छप्पर नसते… संपूर्ण आयुष्याचा चिखल झालेला! पाऊस आला की पोरांच्या आया, त्यांच्या अंगावर पदर पसरतात… पण बेभान झालेल्या पावसाला हे कुठं कळतंय? तो कधी कुठे पूर घडवतो… कधी कुणाला निर्दयपणे बुडवतो… आणि कधी कुणाचा संसार भिजवतो… आयुष्याचाच चिखल करतो! या ५ – ५० जणांची एकाच वेळी सोय मी तरी कुठे करणार?
    माझ्या परीने मी मग १०० फूट लांब प्लास्टिक – ताडपत्री आणून फुटपाथच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत छत म्हणून टाकून दिलं आहे! तान्ही पोरं आता किमान भिजणार तरी नाहीत… कायमच पदर पसराव्या लागणाऱ्या आईला, किमान पावसापुढे तरी पदर पसरण्याची गरज आता उरली नाही!
    पुणे कॉर्पोरेशन कदाचित याला माझे अतिक्रमण म्हणेल! हरकत नाही, तान्ह्या पोरांसाठी, आईच्या त्या पदरासाठी, तीच्या व्याकूळ चेहऱ्यावरच्या एका हास्यासाठी, “ते” देतील ती शिक्षा या “अतिक्रमणासाठी” मी घ्यायला तयार आहे!!

वैद्यकीय

  • जवळपास ५०० भिक्षेकरी, डोळे तपासणीसाठी प्रतीक्षेत आहेत. परंतु साथ रोगामध्ये मागील दोन वर्षात डोळ्यांची ऑपरेशन्स करू शकलो नाही. आता डॉ. समीर रासकर, यांच्या माध्यमातून डोळ्यांची ऑपरेशन्स पुन्हा सुरू केली आहेत. १२ जुलै रोजी ७ आज्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून दृष्टिदान केले आहे. अत्यंत आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या हॉस्पिटल मधून भिक्षेकऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून घेतली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांचीच डोळे तपासणी येत्या काही महिन्यात संपन्न करत आहोत.
    जवळचं पाहायला “नजर” पुरेशी असते दूरवरच पाहायला मात्र “दृष्टी” हवी!
    भिक्षेकरी समाजाला ही दृष्टी मिळो, या सदिच्छा!!!
  • ज्यांना चष्मे लागले आहेत अशा २० जणांना उच्च प्रतीचे चष्मे स्पेशली तयार करून दिले आहेत.
  • बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर १००० पेक्षा जास्त भीक मागणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे रस्त्यावर याचना करणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार केले.
  • ५४० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे व अत्यंत उच्च प्रतीचा मेडिकेटेड साबण स्वच्छतेसाठी दिला आहे.

भोक्ता ते दाता

भीक मागणारांतील धडधाकट लोकांनी रक्तदान करावे यासाठी प्रयत्नशील आहोत. मेडिकली फिट असणाऱ्या लोकांकडून आज पावेतो आपण रक्तदान करून घेतले आहे. पुढेही हा प्रयत्न चालूच असेल.

भीक नको बाई शीक!

शैक्षणिक वर्ष हळूहळू का होईना, पण सुरू होत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी भिक्षेकरी समाजातील एकूण ५२ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आज पावेतो सर्व शैक्षणिक साहित्य प्राप्त करून दिले आहे. याच बरोबर त्यांच्या शाळा आणि कॉलेजच्या फिया सुद्धा भरून झाल्या आहेत.
माझ्या या ५२ मुलांमधील माझी एक मुलगी… तीचं सीए व्हायचं स्वप्न आहे, तिला यावर्षी बी कॉम च्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेऊन दिला आहे. नुकतीच अकरावीची परीक्षा पास झालेल्या मुलाला बारावी सायन्सला प्रवेश घेऊन दिला आहे. मी सहज त्याला विचारलं, ‘बारावी सायन्स करून पुढे काय करशील?’
यावर तो आत्मविश्वासाने म्हणाला, ‘I will either go for B. Tech or I will become Doctor like you and serve the downtrodden people in society!’
त्याचं हे उत्तर ऐकून मला काय वाटलं असेल.. हे मी शब्दात नाही सांगू शकणार!
कागदावर “पाणी” असे लिहून चालत नाही, पाऊस पाडायला “आभाळच” व्हावं लागतं…
माझी पोरंसुद्धा हळुहळु आभाळ व्हायचं स्वप्नं पाहत आहेत हे काय कमी आहे काय?

अन्नपूर्णा

साथ रोगाच्या काळात सर्व व्यवस्था बंद असल्यामुळे अनेक बेरोजगार तरुण रस्त्यावर भीक मागत होते, त्या काळात समाजाच्या मदतीने दररोज १००० लोकांना या प्रकल्पातून आपण भोजन दिले. ज्यांच्याकडून हे डबे आम्ही विकत घेत होतो त्या गरजू महिलांना रोजगार मिळाला, डबे पोचवण्याचे काम काही तरुण मंडळींना दिले, त्यांनाही रोजगार प्राप्त झाला. सध्या हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पूर्वीप्रमाणे एक हजार लोकांना रोज भोजन घालण्याची जरुरी उरली नाही.
मात्र या प्रकल्पातून, हॉस्पिटल मधील गरीब रुग्ण, ज्यांना कुणीही नातेवाईक नाहीत, अशा ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना मात्र हॉस्पिटलमध्ये आम्ही डबे पोचवत आहोत.
भाकरी कमवायला “मेंदू” लागतो, पण ती वाटून खायला “हृदय”!
खरोखरीच हृदय असणाऱ्या समाजातील अनेकानेक मंडळींमुळे आम्ही हा प्रकल्प चालवू शकतोय, आम्ही ऋणी आहोत त्यांचे

खराटा पलटण

आदरणीय गाडगेबाबांच्या विचारांतून जन्माला आलेली ही खराटा पलटण! ४० आज्या सार्वजनिक स्वच्छतेचे काम करत आहेत आणि त्या बदल्यात त्यांना आपण मानधन देत आहोत,शिधा देत आहोत. दर शुक्रवारी आयोजीत होत असलेल्या खराटा पलटणच्या माध्यमातून लोकांनी वापरून रस्त्यावर टाकलेले मास्क गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं सुरू आहे.

Future Plan

  1. नेत्र तपासणी / ऑपरेशन्स /चष्मे
  2. अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना जेवण
  3. “भीक नको बाई शीक” या प्रकल्पांतर्गत शैक्षणिक मदत
  4. “भिक्षेकरी ते कष्टकरी” या प्रकल्पांतर्गत याचना करणाऱ्या लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत.
  5. “भोक्ता ते रक्तदाता” या प्रकल्पांतर्गत भीक मागत जगणाऱ्या धडधाकट लोकांनी रक्तदान करण्याविषयी समुपदेशन.
  6. याव्यतिरिक्त निसर्ग जे समोर आणून देईल ते!

आपल्या माध्यमातून झालेल्या या कामाचा लेखाजोखा आपल्या पायाची सविनय सादर!

या साऱ्या कामाचं श्रेय लोक आम्हाला देतात, परंतु अगदी खरं सांगायचं तर हे एक चक्र आहे निसर्गानेच बनवलेलं… जे चाललंय ते या चक्राप्रमाणेच!

मुळांनी पोषण करून खोडाला आधार द्यायचा…
खोड मग फांद्यांना हात देतं…
फांद्या पानांना फुलवतात…
पानं फुलांना सुगंध देतात…
फुलं फळांमध्ये मग गोडवा भरतात!
आणि फळाचं मग कौतुक होतं!

हे निसर्गानं आखुन दिलेलं चक्र…

फळाचं कौतुक करणारी व्यक्ती, फळांमध्ये गोडवा येण्यास मूळ, खोड, फांद्या, पानं, फुलं यांचाही प्रमुख सहभाग आहे हेच विसरून जाते! पण आम्ही हे विसरून जात नाही, कारण आपणच आमचे मूळ – खोड – फांद्या -पानं – फुलं आहात… कामाचं जे छोटं मोठं फळ आहे… त्यात आपण सर्वजण सहभागी आहात… आम्ही त्यातला एक छोटा घटक… नाममात्र!!!

आम्हांकडुन प्रणाम स्वीकार करावा!!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*