लसीकरण

आपणा सर्वांच्या शुभ आशीर्वादामुळे १४ ऑगस्टपासून भिक्षेकरी व अन्य दुर्बल घटकातील लोकांसाठी सुरू केलेला हा लसीकरण प्रकल्प! आज १९ ऑगस्ट अखेर या दुर्बल घटकातील ७५ लोकांचे लसीकरण आजपर्यंत झाले आहे, इथून पुढेही हा प्रकल्प सुरु राहील.

हे श्रेय आपणा सर्वांचे!

कारण, आपण सर्वांनी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक मदत आम्हाला केली आहे, आणि म्हणून या दुर्बल घटकाचे लसीकरण होत आहे. आम्ही विशेष काही करत नाही, फक्त दुर्बल घटकातील लोकांना जमा करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत… ते काय कुणीही करेल!

मा. सौ. अनुश्री ताई आणि श्री. आनंद भिडे सर यांना आमचे साष्टांग नमस्कार, त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे.

दुर्बल घटकातील या लोकांच्या लसीकरणात आमची मूळ अडचण अशी आहे की, आमच्याकडे जे लोक रजिस्टर्ड आहेत त्यापैकी ७० टक्क्यापेक्षा अधिक लोकांमध्ये लसी विषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. “लस घ्या हो…” म्हणत त्यांच्या हाता पाया पडलो, आणि डोकं आपटलं तरीही ते लस घ्यायला तयार नाहीत. आता या ७०  टक्के लोकांना समोरासमोर बसून समुपदेशन / काउन्सेलिंग करणं सुरू आहे, यातील किती लोक भविष्यात लस घेतील, हे आत्ता तरी सांगता येणार नाही.

उरलेले ३० टक्के लोक! यांची लस घ्यायची इच्छा आहे… पण यांच्यापैकी ९० टक्के लोकांकडे आधार कार्डच नाही! यातून उरलेले जे काही शे-दोनशे लोक आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, अशा अंध, अपंग मानसिक रुग्ण आणि इतर व्यंग असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित केलं आहे, अशाच ७५ लोकांचे आज पावेतो लसीकरण पूर्ण झाले आहे!

लसीकरण करून घेण्यासाठी आधारकार्ड / पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांची आवश्यकता आहे… शासनाला मी अनेक वेळा, या निराधार लोकांना किमान आधार कार्ड देण्याविषयी विनंती केली होती, परंतु…

असो!

आता भविष्यात, रस्त्यावर / फुटपाथवर / झोपडपट्टीत उघड्या नागड्या अवस्थेत राहणाऱ्या या लोकांचा पासपोर्ट नंबर आणि ते कितीवेळा फॉरेन ला जाऊन आले आहेत याचे डिटेल्स… लसीकरणासाठी मागू नयेत अशी मी आशा करतो!

ओम शुभम भवतू!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*