रक्षा बंधन!
आपल्यातील प्रत्येकालाच एक परिवार आहे या परिवारात अनेक सदस्य असतात. जमेल त्या पद्धतीने एकमेकांना आधार देतात. आज रक्षा बंधन, बहिण या दिवशी भावाला राखी बांधते. एक बहीण-भावाच्या नात्याचा तो उत्सव असतो!
माझ्या बहिणीने मला रक्षाबंधनाची आठवण करून दिल्यावर, माझ्या डोक्यात विचार आला, जी निराधार मंडळी आहेत, रस्त्यावर राहात आहेत, ज्यांना कुटुंब नाही, सोबत – परिवार नाही, अशा लोकांना कोण राखी बांधत असेल? कोण ओवाळत असेल? याच विचारातून रस्त्यावर आम्ही “अनाम प्रेम परिवार पुणे” यांच्या सहकार्याने या निराधार लोकांसाठी रक्षाबंधन आयोजित केले.
रस्त्यावर याचना करत जगणाऱ्या या लोकांनी रस्त्यावरच एकमेकांना राख्या बांधल्या, काहींनी आम्हाला राख्या बांधल्या, आम्ही काहींना राख्या बांधल्या!
तुम्ही निराधार नाहीत, आमच्या कुटुंबाचा तुम्ही सुद्धा एक भाग आहात याची जाणीव त्यांना पुन्हा एकदा करून दिली आणि आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरं झालं!
राख्या बांधून घ्यायला माझे दोन्ही हात कमी पडले… यांच्या चेहर्यावरचा आनंद टिपायला माझे दोन डोळे कमी पडले… आज पहिल्यांदा असं वाटलं की, मला आणखी दहा तोंडं हवी होती, वीस हात हवे होते, म्हणजे मी रस्त्यावरच्या या लोकांच्या चेहर्यावरचा आनंद जास्तीत जास्त डोळ्यांनी पाहू शकलो असतो… उरलेल्या हातांवर आणखी राख्या बांधून घेता आल्या असत्या!
खरंच, आजच्या दिवसापुरती तरी मला दहा तोंडं लाभतील का.? मग कोणी रावण म्हटलं तरी बेहत्तर!
Leave a Reply