सप्रेम नमस्कार!
भिक्षेकरी ते कष्टकरी
- केवळ परिस्थितीमुळे भीक मागण्याची वेळ आलेला एक गृहस्थ… अंगात चर्मकारीची कला… पूर्वी याचा चप्पल शिवण्याचा व्यवसाय होता. अनेक घरगुती कारणांमुळे रस्त्यावर आला. केवळ भांडवल नाही, म्हणून परत तो हा व्यवसाय करू शकत नव्हता. ३ ऑगस्ट रोजी याला चर्मकारी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य दिले आहे. बॉम्बे गॅरेज, पुणे कॅम्प येथे आता त्याने व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे. दररोज रुपये ३०० ते ४०० इतकी आता त्याची मिळकत होत आहे.
एक भिक्षेकरी कष्टकरी झाला… आता गावकरी व्हायला वेळ लागणार नाही! - हडपसर पुणे येथे भीक मागणारा एक तरुण… परंतु दिव्यांग मुलगा… दोन्ही पायात ताकद नाही! आई-वडील अथवा जवळचं इतर कोणीही नाही.भीक मागायची लाज वाटते… परंतु भीक मागण्याशिवाय पर्याय नाही… काम करायची इच्छा आहे परंतु अपंग म्हणून कोणी कामही देत नाही! २६ तारखेला याला एक व्हीलचेअर घेऊन दिली आहे. हि व्हीलचेअर आपण ऑटो रिक्षा प्रमाणे मॉडीफाय करत आहोत. यामध्ये विक्रीयोग्य अनेक वस्तू ठेवून या चेअर मध्ये बसून तो आता व्यवसाय करू लागेल. ही व्हीलचेअर त्याचं घर आणि व्यवसायाचे ठिकाण अशा दोन्ही गरजा पूर्ण करेल!
घर देता का घर?
- अनेक महिने रस्त्यावर आयुष्य जगणारे एक गृहस्थ… अनेक चित्रपटांचे कथालेखक! मला मागे निराधार अवस्थेत रस्त्यावर भेटले होते. यांना मी डॉ. नंदाताई शिवगुंडे यांच्या आश्रमात ठेवले होते. सांगायला आनंद होतो की, इथे असताना यांनी पुन्हा भरारी घेतली आहे… “न्यायाधीश” नावाच्या एका चित्रपटाच्या कथा लेखनासाठी त्यांना पुन्हा बोलावणे आले आहे… यांचं आयुष्य पुन्हा सुरू झालंय!
यांच्या बाबतीत निसर्ग “न्यायाधीश” ठरला… त्याने बरोबर निवाडा केला आणि झुकतं माप या बाबांच्या पदरी टाकलं!
वैद्यकीय
- नुकतीच लग्न झालेली एक मुलगी… हिची आई भीक मागते… एके दिवशी ती या मुलीला घेऊन आली, अर्धमेल्या अवस्थेत. रस्त्यावरच तिच्या सर्व तपासण्या केल्या अंगातील रक्त (हिमोग्लोबिन) फक्त चार ग्रॅम ( नॉर्मली १३ ते १५ ग्रॅम असणे अपेक्षित) येणाऱ्या काही दिवसात तिला जर रक्त चढवलं गेलं नाही, तर कोणत्याही क्षणी तिचा जीव जाऊ शकत होता. २७ तारखेला हिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून रक्ताच्या बाटल्या चढवल्या आहेत. आज ३१ ऑगस्ट अखेर ती धोक्याच्या पूर्ण बाहेर असून खडखडीत बरी आहे. हिचे सहा महिन्यांचे बाळ आहे…
माझ्या मते एक “बाई” नाही “आई” वाचली! - बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर ९०० पेक्षा जास्त भीक मागणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे रस्त्यावर याचना करणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार केले.
- ६३० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, सॅनिटायझर, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे व अत्यंत उच्च प्रतीचा मेडिकेटेड साबण स्वच्छतेसाठी दिला आहे.
- रस्त्यावरील गोरगरीब आणि निराधार यांना लस देणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु आधार कार्ड अथवा इतर कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. या परिस्थितीत अशा लोकांचे लसीकरण दिनांक १४ ऑगस्ट पासून प्रायव्हेट हॉस्पिटल मधून सुरू केले आहे. आजपावेतो १७३ लोकांना लस देऊन झाली आहे. पुढे सुद्धा लसीकरण सुरूच राहील.
“लस” तर देऊन होतेच आहे, परंतु ज्यांच्याकडे काहीही नाही अशा लोकांकडे ओळखपत्र मागितलं जातं, याचा “सल” मात्र निश्चित आहे! - भीक मागणाऱ्या लोकांमधील ज्येष्ठ नागरिकांचे, डोळ्याला दिसत नसल्यामुळे, रस्ता क्रॉस करताना अपघात होतात! यात जीव तरी जातो किंवा कायमचे अपंगत्व येते… तसे होऊ नये, यासाठी आपल्याला काय करता येईल? याचा विचार करत काही वर्षांपूर्वी डोळ्यांच्या तपासण्या करणे, त्यांना चष्मा देणे आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अशा बाबी आम्ही सुरू केल्या होत्या. या महिन्यात ३, २१ आणि ३० तारखांना डोळ्यांचे ऑपरेशन आयोजित करून २१ लोकांना दृष्टी येण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी केल्या आहेत.सांगायला अभिमान वाटतो की, आज ३१ ऑगस्ट अखेर आम्ही मोतीबिंदू ऑपरेशनचा १००० लोकांचा आकडा आपल्या शुभेच्छांमुळे पार करू शकलो. रस्त्यात गाडी न दिसल्यामुळे, होणाऱ्या भिक्षेकर्यांच्या अपघातांचे आणि मृत्यूचे प्रमाण घटले यात आम्हाला आनंद आहे.
डोळ्यांचे एक ऑपरेशन बरोबर एक अपघात वजा!
भोक्ता ते दाता
- भीक मागणारांतील धडधाकट लोकांनी रक्तदान करावे यासाठी प्रयत्नशील आहोत. मेडिकली फिट असणाऱ्या लोकांकडून आज पावेतो आपण रक्तदान करून घेतले आहे. पुढेही हा प्रयत्न चालूच असेल. भीक मागणाऱ्या माझ्या कुटुंबातील लोकांनी जे रक्तदान केलं आहे त्यामुळे १५७ लोकांचे प्राण वाचले आहेत हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. समाजाने भीक मागणाऱ्या लोकांना “भीक” दिली असेल, परंतु या भीक मागणाऱ्या लोकांनी “रक्तदान” करून समाजाला हे “दान” परत केलं आहे!
भीक नको बाई शीक…
- ५२ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या सर्व मुलांना यावर्षीचे शैक्षणिक साहित्य देऊन झाले आहे तसेच शाळा व कॉलेजातील व फी भरून झाल्या आहेत. एक मुलगी CA तर, एक मुलगा डॉक्टर आणि इतर काही मुलं इंजिनियर व्हायचे स्वप्न बघत आहेत.
एका बापाला याहून मोठा आनंद तो कोणता?
अन्नपूर्णा
- जे गरीब लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, ज्यांना कोणीही नातेवाईक नाहीत, जेवणाचा डबा आणून देणारं त्यांच्या आयुष्यात कोणीही नाही… अशा लोकांचे नातेवाईक बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या अशा सर्व गरीब निराधार रुग्णांना, बाकी काही नाही, परंतु जेवणाचा एक डबा पोचवत आहोत… अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून! अर्थात आम्ही नाममात्र!
या डब्यासाठी सर्व खर्च समाजाने म्हणजे आपणच केला आहे… आम्ही फक्त “डबे पोचवणारी पोरं” म्हणून काम करत आहोत!
इतर
- दयनीय अवस्थेत पावसात भिजत असणाऱ्या १७८ लोकांना छत्र्या घेऊन दिल्या आहेत. अर्थात या छत्र्या समाजातून मिळाल्या आम्ही फक्त योग्य त्या ठिकाणी देऊन पोस्टमॅन चे काम केले!
- एक भीक मागणारी अपंग व्यक्ती! याला दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरच झाडू, खराटा, फिनेल, साबण अशा वस्तू विकण्याचा व्यवसाय टाकून दिला होता. (पूर्वी तो हाच व्यवसाय करत होता) हळूहळू धंद्यात जम बसत गेला. ४ ऑगस्ट रोजी याचा मला फोन आला. म्हणाला, “सर मी माज्या पैशातून, अपंगांसाठी असते ती तीन चाकी स्कुटी विकत घेतली हाय… तुमि या ना… तुमच्या हातनं गाडीला हार घालायचा हाय… आपण एकदा गाडीवर चक्कर मारू!” तीन वर्षांपूर्वी माझं हे पोरगं पाटाला चाक लावून घसरत घसरत रस्त्यावर भीक मागायचं… बाप अजून पण टू व्हीलर चालवतय…आज पोरांन स्वतःच्या कष्टातून थ्री व्हीलर घेतली…
बाप से बेटा सवाई निकला… कोणत्या बापाला आनंद होणार नाही.?
मनातलं काही
“भीक्षेकर्यांचा डॉक्टर” हे माझं (?) पुस्तक येत्या काही दिवसात प्रसिद्ध होत आहे.
खरंतर पूर्णपणे “वाया” गेलेला मी…
“ना-लायक” असा शिक्का बसलेला मी…
शाळा आणि कॉलेज च्या प्रिन्सिपलनी हाकलून दिलेला मी…
दहावी नापास विद्यार्थी मी…
बारावी कसाबसा पास विद्यार्थी मी…
आज या मार्गावर कसा आलो?
मुळात डॉक्टर कसा झालो?
कोणत्या वाटांवरून, कसा माझा प्रवास झाला?
बिघडण्यापासून – घडण्यापर्यंत अशी काय जादू झाली होती.?
मुळात घडलो होतो का.?
लहानपणी अत्यंत सालस निरागस असलेला अभिजीत, मोठेपणी गुंडगिरीच्या मार्गावर का जातो.? काय गुल खुलवतो? कसे? का?
मग परत फिरून तो या मार्गावर का येतो?
कशासाठी?
सारंच अतर्क्य!
हे तुम्हालाही काही माहित नव्हतं… हो ना?
पुस्तकात सांगताना मी काहीही लपवलेलं नाही!
माझा वाईट भूतकाळ कोणालाही माहित नाही…
पण मी सांगितलंय…
लोक तुटतील की जुळतील याची पर्वा न करता!
माझ्या अगदी जवळच्या लोकांना हे सारं माहीत आहे… असणारच ना!
त्यांनी याविषयी मला लिहिण्याबाबत माझ्यावर प्रेमाचा खूप दबाव टाकला…
शेवटी वैतागून मी लिहायला बसलो… आणि कोणताही आडपडदा न ठेवता मनातलं सारं काही लिहून काढलं… माझं मनोगत!
हा बिघडण्यापासून ते घडण्यापर्यंतचा माझा प्रवास आणि मी लिहिलेले माझे आतापर्यंतचे अनुभव, यांचे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे…
अर्थात ते माझ्या मित्रांनी पैसे जमवुन केलेलं आहे…मी “भिकाऱ्यांचा डॉक्टर”, पुस्तक छापण्याची चैन मला परवडणार नाही… पुस्तक छपाईच्या पैशात भीक मागणाऱ्या माझ्या अनेक कुटुंबाची काहीतरी सोय होईल… पुस्तक छापण्यासाठी पैसे खर्च करण्याची माझी पात्रता नाही! हे ओळखून माझ्या मित्रांनी पुस्तक छापण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे… कळवेनच मी!
Leave a Reply