दिव्यांग तसेच दृष्टी नसलेल्या रस्त्यावरील तळागाळातील समाज बांधवांचे लसीकरण!
ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा तळागाळातील समाजबांधवांची टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याची मोहीम आम्ही रॉबिनहूड आर्मी, पुणे तसेच पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील आजचा पहिला दिवस! आजच्या दिवशी आम्ही खास करून दिव्यांग तसेच अंध आणि विकलांग समाज बांधवांवर लक्ष केंद्रित केले होते. आम्हाला मिळतील त्या वाहनांमधून (कार, रिक्षा, बस, मोटरसायकल, अक्षरशः सायकल वरून सुद्धा) रस्त्यावरील या लोकांना आम्ही डॉ मनीषा सोनवणे यांच्या क्लिनिक वर घेऊन आलो. इथेच आमचं मोफत लसीकरण केंद्र आम्ही थाटलं होतं!
ज्यांना चालताच येत नाही, उठता येत नाही अशा सर्वांना त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरणाचा पहिला डोस दिला.
ओळखीचा कोणताही पुरावा नसल्यामुळे या समाज बांधवांना लसीकरणाची कोणतीही आशा नव्हती…
आजच्या या लसीकरणामुळे त्यांना “सुरक्षा कवच” मिळाले आणि आम्हाला आशीर्वाद!
ज्यांना हात नव्हते, त्यांनी डोळ्यातून कृतज्ञता व्यक्त केली!
ज्यांना डोळे नव्हते, त्यांनी पाठीवर हात ठेवून… स्पर्शातून कृतज्ञता व्यक्त केली!!
ज्यांना बोलताच येत नव्हतं, अशांनी खाणाखुणा करून कृतज्ञता व्यक्त केली!!!
आयुष्यात निःशब्द होण्याचे अनेक प्रसंग येतात… त्यापैकी आजचा हा एक…
त्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेवर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं!
आम्ही पुर्णतः निःशब्द झालो होतो!
आम्ही फक्त हात जोडून उभे होतो या दरिद्री नारायण समाजा समोर!
अर्थात हे श्रेय आमचं एकट्याचं नाही… यामागे शेकडो मदतीचे हात आहेत आम्ही त्यांचे ऋणी आहोत. रॉबिनहूड आर्मी पुणे, पुणे महानगरपालिका तसेच निरामय संस्था या संस्थांच्या सहकार्याशिवाय यातलं काहीही शक्य नव्हतं!
तीनही संस्थामधील सर्व टीम मेंबर्सना आमचा प्रणाम!
Leave a Reply