७५ ते ८० वर्षाची एक भिक्षेकरी आजी.
हिला मी भेटण्याचा वार ठरलेला… मंगळवार!
काही महिन्यांपूर्वी तीने माझा फोन नंबर घेतला होता.
या आजीला तपासण्यासाठी मी न चुकता, मंगळवारी ठरलेल्या ठिकाणी जातोच, तरीही ती आदल्या दिवशीच्या सोमवारी रस्त्यावरून येणार्या-जाणार्या लोकांना मला फोन करायला लावते… दरवेळी एकच प्रश्न… “उद्या येणार ना? किती वाजता? वाट बगती बरं का!” दरवेळी “हो ग म्हातारे”, म्हणून मी प्रत्येक फोनला उत्तर देत असतो.
६ सप्टेंबर च्या सोमवारी सुद्धा असेच ६ – ७ कॉल आले. प्रत्येक वेळी “हो, मी येणार आहे”, असं सांगितलं, तरी तिचे कॉल चालूच होते.
गाडी चालवत असताना एक कॉल घेताना, मरता मरता वाचलो… मला तीचा खुप राग आला.
७ सप्टेंबर मंगळवार, आजी भेटल्यानंतर मी तीची चांगली खरडपट्टी काढली…
“तुला कळतं का म्हातारे? वेडी आहेस का? दरवेळी येतो म्हणतो तरी किती वेळा, किती जणांच्या फोनवरून कॉल करतेस? मेलो असतो ना काल तुझा कॉल घेता घेता…”
“आता इथून पुढे मला तू कधीही कॉल करायचा नाहीस, समजलं?”
रागात मी खूप काही बोललो तीला!
तीचा चेहरा पडला… बाजूला जाऊन डोळ्याला पदर लावून बसली… नंतर मलाच वाईट वाटलं!
मी पुन्हा जाऊन तीच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आजी बोलायला तयार नव्हती… दुसरीकडे तोंड फिरवून बसली.
खेळीमेळीने गंमत करत, मी आजीचा सुरकुतलेला हात पकडला, म्हणालो, “जाऊ दे ना म्हातारे… सोड की राग आता”
मी पकडलेला हात तीने इतक्या जोराने झटकला की त्यात तीची बांगडी फुटली!
मी परत समजावणीच्या सुरात काहीतरी बोलायला लागलो, त्यावर ती एकदम उसळून म्हणाली, “गप, एकदम गप्प बसायचं… घरात माज दारुड पोरगं मला शिव्या देत, दारूच्या नशेत मारतं, सून सुद्धा घालून पाडून बोलती… तुझ्यात मी माजा लेक बगटला… डाक्टर म्हणून मी न्हाय तुजी वाट बगत… लेक भेटनार म्हणून वाट बगती…”
“मला वाटलं तू तरी चांगला असशील… पन न्हायी… तू बी तसलाच निगालास… आता न्हायी मी फोन लावणार तुला, कद्दी कद्दी सुदा करणार न्हाय!!!”
“तू बी तसलाच निगालास…” या तीच्या वाक्याने मी शहारलो!
आता हिचा पुन्हा कधीही फोन आला, तर तीच्यावर रागवायचं नाही, हे ठरवून मी तिथून निघालो.
१३ सप्टेंबर… पुन्हा सोमवार, त्या दिवशी मला खरंच तीचा फोन आला नाही…
१४ सप्टेंबर, नेहमीप्रमाणे “त्या” जागेवर गेलो, पण त्या दिवशी ती तिथे नव्हती. दुसऱ्या आजीला विचारलं, “इथली आजी कुठे आहे?”
डोळ्याला पदर लावत, तीने आभाळाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, “ती ९ सप्टेंबरलाच गेली!”
“क्काय?” मी जोरात ओरडलो…
“व्हय डाक्टर… आमी तिला हास्पिटलात एडमिट केली… जाताना तीने तुमचं नाव बी घेतलं…”
“अगं मग फोन करायचा ना अशावेळी” मी ओरडुन, रागाने तीला म्हणालो.
“न्हाय डाक्टर, ती आमाला म्हनली, डाक्टरला फोन लावायचा न्हाय कुनी… माझी शप्पत हाय तुमाला, म्हणून आमी नाय लावला फोन!”
माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.
मला इथून पुढे फोन न करण्याचा शब्द, तीने शब्दशः पाळला!
सर्व लोक असूनही , कुणीच नसणारी ही आजी, माझ्यात तीचा लेक शोधत होती…
मलाच नातं पाळता आलं नाही!
ती तर गेली पण “तू बी तसलाच निगालास” या वाक्याच असह्य ओझं मनावर ठेवून गेली…
या वाक्याच्या ओझ्याखाली दबून जगणं हीच मला मिळालेली शिक्षा!
आज सोमवार दि २० सप्टेंबर! आजचा सोमवार संपत आला आहे… मी दिवसभर तीच्या फोनची वाट पाहतोय… तो येणार नाही, हे माहीत असूनही!
“म्हातारे सोड की राग आता… लाव कि एक फोन मला… मी नाही चिडणार तुझ्यावर… अगं उद्या मंगळवार… आता उद्या कुणाला भेटू मी म्हातारे? सांग की… सांग ना!!!”
दिनांक : २० सप्टेंबर २०२१, एक मावळलेला सोमवार
Leave a Reply