तिघांचीही परिस्थिती वेगळी, या तिघांमध्ये समानता एकच!
तिघांनाही डोळ्यांच्या जागी डोळे आहेत, परंतु नजर मात्र हरवून गेलीय…
नेत्र आहेत, परंतु त्यात दृष्टी नाही…
आणखी एक समानता…
तिघांकडे दृष्टी नाही, परंतु दृष्टिकोन मात्र आहे…
भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचं, ही जिद्द आहे!
यापैकी एक आजोबा, यांचे या जगात कोणीही नाही! दुसरे आजोबा यांना सर्वजण आहेत, परंतु यांच्याकडे पहायला कोणाला वेळ नाही. तिसरा एक तरुण! याचीही अवस्था अशीच!
“असून नसून सारखंच” हा वाक्प्रचार इथूनच जन्माला आला असावा.
या तिघांनाही आज वजन काटे घेऊन दिले आहेत. खालील संदेशाचा एक बोर्ड तयार करून तिघांच्याही गळ्यात अडकवला आहे.
“डोळ्यातील फक्त ज्योत विझली आहे, मनातला प्रकाश नाही!”
“आमची फक्त सृष्टी हरवली आहे, आत्मविश्वास नाही!”
“आम्हाला भिकेचा चंद्र नकोय, कष्टाची भाकर हवीय!”
“आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या!”
सारसबाग, सिंहगड रोड आणि जंगली महाराज रोड इथे हे तिघे वजन काटे घेऊन बसणार आहेत. लोक येतील, आपलं वजन करतील, पैसे देतील आणि यामुळे आपोआपच या तिघांच्या आयुष्यातील भार थोडाफार का होईना पण कमी होईल!
मला नेहमी असं वाटतं, वजन काट्यावर उभं राहिल्यावर दिसतो, तो निव्वळ आकडा! आपलं खरंखुरं “वजन” पाहायचं असेल, तर आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पहावं.
तिथं आपल्याला स्पष्ट दिसतं, आपण समोरच्या व्यक्तीसाठी “भार” आहोत की “ओझं”?
वाचतो तुमच्या कामाचं कौतुक वाटतं।
वेदना आणि संवेदना हे कळलं।