तुला आठवतं का गं ?

तुला आठवतं का गं ?
आपल्या घरी एक
चिमण्याचं जोडपं यायचं…
आपण दिलेले दाणे आनंदाने टिपायचं
नी पुन्हा भुर्रर्र उडून जायचं…

तुला आठवतं का गं ?
आपल्याच घरात त्यांनी
काडी काडी जमवून…
एक लहानसं घरटं बांधलं
काही दिवसांनी घरट्यात
एक चिमुकलं चिवचिवलं…

तुला आठवतं का गं ?
त्यांची ती ओढ त्यांचा तो ध्यास
चिमुकल्याला जपण्याचा
वाढवण्याचा त्यांचा अट्टाहास…
स्वतः उपाशी राहून
पिलाला भरवलेले घास…

तुला आठवतं का गं ?
त्या पिलाचं खूप मोठं होणं
स्वतःच्या मोठेपणात
सारं काही विसरणं…
ज्यांनी त्यास पंख दिले
त्यांनाच पायाखाली घुसळणं…

तुला आठवतं का गं ?
पिलाच ते उद्धट बोलणं
घरट्यावर स्वतःचा हक्क सांगणं
आणि आईबापाला वृद्धाश्रम दाखवणं…
आईबापाचं हे कर्तव्यच असतं…
त्याला.. त्याला.. शोभतं का गं हे बोलणं?

तुला आठवतं का गं ?
परवाचं त्याचं वागणं…
मला जन्माला घालून
काय उपकार केले म्हणाला…
ती तुमच्या शरीराची ओढ होती
वासने पोटीच केवळ तुम्ही
जन्माला घातलंय मला…

तुला आठवतं का गं ?
चिमणा चिमणीचं ते धाय मोकलून रडणं
आणि दोघांचंही ते एकमेकांना सावरणं…
चिमणी दुःखी होऊ नये म्हणून
चिमण्याचं ते खोटं-खोटं हसणं…

तुला आठवतं का गं ?
जोडप्यानं केलेली प्रार्थना देवाला
‘उध्वस्त जरी झालो आम्ही
आभाळ मिळू दे आमच्या पिल्लाला’
तुला आठवतं ?
घरट्याकडे पाहून चिमण्याचं ते भकास हसणं
आणि चिमणीला घेऊन दूर उडून जाणं…

तुला आठवतं का गं ?
पिलाच्या आठवणीत
आपलं ते उध्वस्त घरटं जपणं…
पिलू कधीतरी येईल या आशेवर
प्राण डोळ्यांशी आणणं…
ते कधीही येणार नाही हे कळूनही
पिलासाठी उगीचच झुरणं…
आणि उध्वस्त घरटं जपता जपता…
आपलंच ढासळून पडणं…

तुला आठवतं का गं ?
तुला आठवतं ?
तुला आठवतं ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*