मनोगत

नमस्कार,

मला लोक फोन करुन विचारतात की डॉक्टर, तुम्ही हे काम कधी करता ? — महिन्यातुन एक तास ? दोन तास ? आठवड्यातून एकदा ? नेमकं काय करता वगैरे वगैरे……

खरं सांगु ….? आठवड्यातून एकदा आणि दोनदाच हे काम करुन भिक्षेकर्यांचं मत परिवर्तन करणं शक्यच नाही !

म्हणुन त्यांना रेग्युलर भेटण्यासाठी मी वार ठरवुन दररोज (सोमवार – शनीवार) ते जिथे आहेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतो.

सोमवारी पुण्यातली शंकराची मंदिरं, मंगळवारी देवीची, बुधवारी गणपती, गुरुवारी साई – दत्त – समर्थ, शुक्रवारी मस्जिद आणि शनिवारी शनी – मारुतीची मंदिरं या ठिकाणी मी रोज सकाळी 11 ते 2 या वेळेत जातो !!!

या वारी भक्तांची गर्दी इथं जास्त आणि म्हणुन भिक्षेकर्यांची पण जास्त ….!

मी मंदिरं – मस्जिद च्या बाहेर थांबतो, माझ्या मोठ्या बँगेत औषधं आणि इतर वस्तु असतात, जिथे जागा मिळेल तिथे बँग ठेवतो आणि प्रत्येकाजवळ जावुन बसुन काही आजार आहे का विचारतो? शक्यतो काहितरी त्रासअसतोच… मग केस पेपर तिथेच तयार करतो, यांत आजाराबरोबरच त्यांचा कायमचा पत्ता आणि इतर माहीती घेतो..

असं सगळ्यांचं झाल्यावर, बँगेजवळ येवुन केस पेपरनुसार प्रत्येकाच्या आजारांप्रमाणे पाकिटात औषधे घालुन, परत प्रत्येकाजवळ जावुन औषधं समजावुन सांगतो, यावेळी एखादी गोष्ट माझ्याकडे नसेल तर मी पुन्हा ती केव्हा देणार तेही सांगतो…..

या सगळ्या प्रक्रियेत मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करुन त्यांचं भिक मागण्याचं नेमकं कारण काही सापडतंय का हे पाहतो… तपासणीच्या निमित्तानं हि कारणं शोधणं हाच मुळ हेतु या प्रकल्पाचा आहे.

जेव्हा माझ्याकडे डेटा जमा होईल त्यावेळी अँनालिसीस करुन या कारणांवर काही उत्तरं सापडताहेत का ? सध्याच्या असलेल्या शासनाच्या पुनर्वसनाच्या पद्धतीत काही बदल करता येतील का ? आणखी वेगळं काही करता येईल का ? या सर्व बाबींचा विचार करता येईल.

यात शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने सर्वतोपरी मदत करण्याचं कबुल केलं आहे…. !

मी जर असं रोज करत गेलो तर त्यांच्यात आणि माझ्यात एक भावनिक नातं तयार होईल, माझ्यावर ते विश्वास ठेवायला लागतील आणि जेव्हा असं होईल तेव्हा मी हक्काने त्यांना भिक मागणं सोडण्याचं आवाहन करेन !
शासनाच्या मदतीने त्यांच्या पुनर्वसनासाठी पुरक प्रयत्न करेन.

100 पैकी 10 लोक तरी ऐकतील? बघु प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आणि तुम्ही आहातच की साथीला…..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*