लहानपणी सुट्टीत खेडेगावी आज्जीकडे जायचो. मित्रांबरोबर तंबुत “शिनेमा” पहायला, गारेगार खायला , पेपरात बांधलेली भजी खायला मी आज्जीकडे पैसे मागायचो. आज्जी 10/10 पैशाची दोन नाणी माझ्या हातावर ठेवायची, मला मात्र 1 रुपयाची नोट हवी असायची…. !
मी नोटेसाठी हट्ट करायचो, वाटायचं आपली म्हातारी किती चेंगट आहे…. मी तीच्यावर चिडायचो….मग ती तीच्या भाषेत मला समजवायची, ” आरं बाळा येक रुपायाची नोट कागदाची आसतीया , कवाबी फाटंल आशी. 10 पैशाचं नाणं बग बरं फाटतंय का ? न्हाय ना ? मंग भारी कोण, येक रुपाया का धा पैसं? आन वजन बी बग बरं कुणाचं जास्त ?”
मी मग हातात नोट आणि त्या दोन नाण्यांच्या वजनाची तुलना करायचो, अर्थात नाण्यांचं वजन जास्तच भरायचं…. आज्जी म्हणायची, “बग बरं, येक रुपायाच्या कागदाच्या नोटेपेक्षा धा पैशाचं नाणं भारी हाय का नाय …. ?”
माझं समाधान व्हायचं आणि त्या दोन नाण्यात होता होईल तेव्हढी मजा करायचो… !!!
पुढे मोठं झाल्यावर कळलं, कागदाची नोट हलकी असली तरी बाजारात तीचं खुप “वजन” असतं. मी ही मग सगळ्यांसारखाच जास्तीत जास्त वजनदार नोटा मिळवायच्या शर्यतीत धावु लागलो…..
असो…..
नंतर आज्जी भेटली की मी गंमतीने नेहमी म्हणायचो, “तु मला लहानपणी फसवलंस हां, 10 /10 पैसे देवुन…”
तेव्हा ती शुन्यात बघत खालच्या आवाजात म्हणायची, “आरं, माज्याकडं तरी कुटं नोटा हुत्या तुला द्यायला ? तुज्यासाटी मी रोज दोन नाणी बाजुला काडुन ठिवायची रोजच्या खर्चातनं…. आपल्याला खायाला जे लागत हुतं ते सामान मी रोज कमी कमी घेत हुते…. सामान जास्त घेतलं आस्तं तर तुला मी ती दोन नाणी पन दिवु शकले नस्ते…”
मला आत्ता कळतंय, आज्जीच्या हातातली पिशवी हलकी का असायची ते …! न घेतलेल्या सामानाचं सर्व वजन या दोन नाण्यांत एकवटलेलं असायचं ना, आणि म्हणुनच ती नाणी नोटेपेक्षा जड होती….!!!
आज हे आठवायचं कारण म्हणजे, मागच्यावेळी भिक्षेकरी तपासत असतांना, खुप गर्दीमुळे आणि लोकं खुप गलका करत असल्यामुळे, मी जरा वैतागलो होतो. अशात एक आज्जी आली म्हणाली, “का रं बाबा , आज तुलाच बरं वाटत न्हाय का?” मी थोडं वैतागून म्हणालो, “मग ? सारखी उठबस करुन आणि तुमच्या गोंधळामुळे माझी कंबर आणि डोकं दुखायला लागलंय…”
ती आज्जी मग म्हणाली, “आरं बाबा, बाम लाव मग, एकांदि गोळी खा, तु येवडा तरास करुन घिवु नगंस आमच्यासाटी. बॅगंत एवड्या गोळ्या आसत्यात त्यातल्या खा की तु बी !”
मी गंमतीने म्हणालो, “बॅगेतल्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच वाटतो, माझ्यासाठी काही उरतंच नाही ना … !”
आज्जी “खरं हाय बाबा” म्हणत निघुन गेली….
आज सारसबागेसमोर तीच आज्जी पुन्हा भेटली, मला जरा बाजुला घेवुन गेली आणि हळुच हातावर 10/10 रुपयांची दोन नाणी ठेवली आणि म्हणाली, “म्हागल्या येळी म्हणला हुतास माज्यासाटी गोळ्या उरतच न्हाईत, तर हे ईस रुप्पय घे आनी दुकानातनं बाम आनी गोळ्या घे बाबा…” मी म्हणालो, “वेडी आहेस का आज्जी , अगं मी घेईन गोळ्या, पैसे नको मला… तर म्हणाली, आसं नगो करु रं लेकरा, चार दिसापासुन मी साठवत्येय हे पैशे तुला द्यायला, आता नगो म्हणु नको….. !!!”
रस्त्यावरच दोघांचेही डोळे भिजले, पाऊस नव्हता तरीही !!!
एक माझ्या लहानपणीची ती आज्जी आणि मोठेपणीची ही …. संदर्भ बदलले आहेत, परिस्थिती बदललेली आहे, व्यक्ती वेगळ्या आहेत…
पण …पण….
ती जुनी नाणी मात्र अजुनही बदलली नाहित, तश्शीच आहेत आणि त्यांचं वजनही …..!!!
माझी पण मोरया मंदिरकडे 1 आजी होती तिला कमी दिसायच पण ती मला आवाजावरुंन ओळखायची माझी बाय आली म्हणायची मी तिला eye drop आणून द्यायची चश्मा दुरुस्त करून द्यायची पूरणपोळ्या करून द्यायची . असच 1 दिवस मी आणि माझे यजमान दोघ पण मंदिरात गेलो आणि मी नेहमी प्रमाणे आजी म्हणून हाक मारली तर म्हणाली अरे आज लक्ष्मी नारायणाची जोड़ी आली जावा दोघ आणि नाश्ता करा आणि हे घे पैसे अस म्हणून 100 ची नोट मला दिली मी नाही घेतले ते पैसे मी तिला म्हटल आजी वेडी झाली का तू मला म्हटली तू रोज मला देते मी 1 दिवस दिलं तर कुठे बिघडल
केवढ मोठ मन तीच !!!!!
मी गेली की माझ्या तोंडावरुन हात फिरवायची बाकीच्या सगळ्यांना सांगायची की ती माझी लेक आहे तुम्ही तिला त्रास देऊ नका