भूक

वेळ दुपारी 2:30 वाजताची, शनिवारवाड्याशेजारच्या शनीमंदिरातले भिक्षेकरी तपासुन झाले, घरी जायला अजुन एक तास, तिथुन पुढे जेवण… भूक पण सपाटुन लागलेली… सामान आवरलं आता निघायचं आणि जेवायचं, तेव्हढ्यात दोन्ही गुडघ्यात डोकं खुपसुन इतरांपेक्षा जरा लांब बसलेले एक म्हातारबाबा दिसले.

मघाशी तपासताना हे आपल्याला दिसले नाहीत, आपल्याकडे आले नाहित … का बरं ?

भरलेली बॅग पुन्हा खोलुन यांना तपासायचं का जायचं घरी ? थांबलो तर अजुन वेळ होणार ….भूक पण लागल्येय जोरात … काय करावं या विचारात असतांना हातांनी नकळतपणे बॅग कधी उघडली गेली मलाच कळलं नाही… !

बाबांजवळ गेलो, म्हणालो, “बाबा काय झालं, काय त्रास आहे का ? गोळ्या औषधं देवु का ?”

हळुच त्यांनी वर पाहिलं म्हणाले, “गोळ्या औषधं ? आरं बाबा विष दे थोडं आसल तर… म्हंजी भूक तरी लागणार न्हाई मेल्यावर …. मारुन टाक रं बाबा एकादं इंजेक्शन दिवुन, भुकंनं जीव कळवाळतुय, आता म्हातारपणात आजुन किती सहन करायचं …?” एव्हढं बोलुन ते रडायला लागले….

एव्हढा मोठा माणुस रडताना पाहुन मी ही गलबललो ….

इकडं तिकडं काहि आहे का पाहिलं आणि केळीवाल्याकडुन सहा केळी घेवुन गेलो, म्हणलं, “खा बाबा… केळ्यानं पोट भरंल…” बाबाचे आनंदाने चमकलेले डोळे पाहिले आणि परत निघालो !

बॅग भरली, तीन वाजुन गेले होते, पोचायला चार वाजणार… तिथुन पुढे जेवण, चला लवकर निघु म्हणत गाडीला किक मारणार एवढ्यात ते बाबा लगबगीने माझ्याच कडे येत होते.
आल्यावर काय म्हणावं …. ??? “आरं बाबा, मी बी तुला हितं सक्काळपस्नं बगतुय , तु जेवला का?” मी हसलो, म्हणालो, “हे काय आता निघालो, जेवणारच आहे मी जावुन.”

हे ऐकुन त्यांना दिलेल्यातली दोन केळी तोडली आणि म्हणाले, “हि दोन तुमी बी खावा… मला भूक लागली म्हुन मी बारक्या पोरावानी रडलो पन तुमाला बी भूक लागली आसंन याचा ईचारच न्हाय केला, तुमाला आजुन थांबावं लागलं …” बाबाचे डोळे पाणावले, म्हणाले, “खावा खावा … घरी जावुस्तवर पोटाला तेवढाच आधार …!”

मी म्हणालो, “नको बाबा मी जावुन जेवणारच आहे”, तर लहान मुलासारखा चेहरा करत म्हणाले, “आसं आसंल तर ह्ये बगा, मी बी न्हाय खात तुमी दिल्याली केळी, राहु दोगंबी उपाशी …” असं म्हणंत, बाजुला ठेवुन सुद्धा दिली त्यांनी केळी…. मी गाडीवरुन उतरलो, उरलेल्या चार केळ्यातुन दोन मी घेतली आणि दोन त्यांच्या हातात ठेवली….

समाधानानं चाललेल्या त्या वाकुन चालणाऱ्या पाठमोर्या आकृतीकडे बराच वेळ मी कितीतरी वेळ पहात होतो…..
आता निवांत घरी गेलो तरी चालणार होतं, भूकच नव्हती, माझं पोट आता गच्च भरलं होतं, बाबाच्या माणुसकीनं ….!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*