बाप…

हि कहाणी आहे मला भेटलेल्या एका बापाची. त्याचं नाव? बापच म्हणु त्याला…

तर असा हा बाप, चार पिढ्यांची गरीबी! एका गोंडस मुलीला पदरात टाकुन तीची आई देवाघरी गेलेली. मुलीचं नाव काहीही असलं तरी तीला तो चिमणी म्हणायचा. तो तीचं सगळं करायचा, वेणी फणी पासुन जेवणापर्यंत. तो राजा नव्हता पण त्याच्या झोपड्यातली राजकन्या होती ती.

या बापानं तीला शिकवलं, तीच्या शिक्षणासाठी स्वारगेट स्टँडवर हमाली केली, भवानी पेठेतल्या गोडावुनचा माल गाडा ओढत दुकानात पोचवला, आणखीही बरंच काही… एके दिवशी ही चिमणी शिकुन मोठी झाली, आयटि मध्ये जॉब मिळाला.. मधल्या काळात या बापाला कुष्ठरोग जडला, औषधं चालु करेपर्यंत बोटं झडायला सुरुवात झाली! बसला नशिबाला दोष देत.

चिमणी ने फ्लॅट घेतला ऑफिसजवळ, आता ती झोपड्यात कशी राहील? आता झोपड्यात उरला हा बाप आणि त्याची झडलेली बोटं… एके दिवशी चिमणीनं बापाला रस्त्यावरच भेटुन सांगितलं (झोपड्यात नाहिच आली हि चिमणी), “आण्णा, मी लग्न करणाराय, आमच्या कंपनीतलेच मॅनेजर आहेत!” बाप आनंदला, म्हणाला, “मला पण भेटव जावईबापुंना!” चिमणी म्हणाली, “तुम्हाला झालेला कुष्ठरोग त्यांना समजला तर लग्न करतील ते माझ्याशी?” नेहमीप्रमाणेच बापाला हे सुद्धा पटलं.

लेकीचं लग्न हॉलबाहेरुन त्यानं पाहिलं, हॉलमध्ये त्याच्यासारख्या कुष्ठरोग्याला आत तरी कोण सोडेल? झडलेली बोटं आता डोळे पुसायच्या पण लायकीची राहिली नव्हती! डोळ्यातलं,पाणी घेवुन आला पुन्हा झोपड्यात. कामं सगळी सुटली होती! नाही म्हणायला, संपुर्ण आयुष्यात चिमणीच्या लग्नासाठी साडेपाच तोळे सोनं त्यांनं पोट मारुन साठवलं होतं पण आता काय उपयोग?

एके दिवशी चिमणीनं पुन्हा रस्त्यावरच बापाला भेटायला बोलावलं, यावेळी तोंडावर स्कार्फ होता, कुणी बघितलं असतं या कुष्ठरोग्याशी बोलतांना तर लोक काय म्हणाले असते ? तीनं सांगितलं “आम्ही आता अमेरिकेला जात आहोत, बघु पुन्हा केव्हा येईन ते सांगता यायचं नाही” घशात आलेल्या आवंढ्यामुळे बापाला हे सुद्धा सांगता आलं नाही कि “चिमणे तोंडावरचं फडकं काढ, एकदा तरी बघु दे तुला!” डोळ्यांनी पण दगा दिला, ओघळणार्या पाण्यानं तीची पाठमोरी आकृती पण अस्पष्टच दिसली आणि डोळे पुसायला बोटंच नव्हती. चिमणी डोळ्या देखत भुर्र उडुन गेली!

आता हा झोपडीतला राजा बसतो मंदिराबाहेर, आपली झडलेली बोटं घेवुन, कुष्ठरोग मिरवत, चिमणीच्या येण्याची वाट पहात!

इथंच माझी आणि त्याची भेट झाली. दरवेळी मला विचारतो, डाक्टर , “माजी चिमणी येइल का वो परत?” आणि मी दरवेळी तोंड लपवत सांगतो, “नक्की येईल आण्णा” म्हातार्याच्या डोळ्यात डोळे घालुन खोटं बोलण्याचं धाडस माझ्यातही नसतं.

“डाक्टर, आमेरीका किती लांब आसंन वो? इमानाला लई पैशे लागत आसत्याल ना? किती येळ लागत आसंन? चिमणीला माजी आटवण येत आसंन का?” मी ही प्रश्नोत्तरे टाळतो… एका बापाशी मी तरी किती खोटं बोलु रोज रोज! एके दिवशी मला हा बाप म्हणाला, “डाक्टर, समजा साडेपाच तोळं सोनं मी मोडलं आणि पेशल गाडी करुन आमेरिकेला गेलो तर? काय फकस्त डिजेलचाच खर्च हुयील, इमानाचा खर्च तरी वाचंल. चिमणी आन जावाईबापुला म्हागल्या सीटवर बसवुनच आणतो, येत कशी न्हाई त्येच बगतो!”

कसं समजावु या “वेड्या बापाला” कि त्यांच्या चिमणीनं तीचा वेगळा संसार केलाय आणि त्यात आता तुम्हाला स्थान नाही!

पण हल्ली ते मला कुठलाही प्रश्न विचारत नाहित, बहुधा त्यांना हे कळलं असावं. हल्ली एका कोपऱ्यात बसुन ते कोणाशीही न बोलता आभाळाकडे एकटक बघत बसलेले असतात. कदाचीत त्यांना वाटत असावं, अमेरीकेतुन उडत उडत त्यांची चिमणी परत येईल!

मी खुप बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांनी बोलणंच सोडुन दिलं. पुन्हा त्या मंदिरात जायला बरेच दिवस मलाही जमलं नाही.

आज पुन्हा त्या मंदिरात पेशंट तपासायला आलो, ते बसत होते तो कोपरा रिकामा दिसला, शेजारच्या आज्जीला विचारलं, “आण्णा कुठे गेले?” म्हणाली, “म्हाईत न्हाई बा. 8-10 दिस झालं दिसलाच न्हाई, म्हणला, लेकिकडं जावुन येतो”

माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी आभाळाकडं पाहिलं, उंच आभाळात उडणारा एक पक्षी दिसला. लेकिच्या ओढीनं तीला शोधणारा हा आण्णा नावाचा तोच बाप असावा का?

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*