मी एक श्रीमंत

मी हे जे थोडंफार काम करतोय भिक्षेकर्यांसाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि पाठीवर हात ठेवुन शाब्बास म्हणण्यासाठी खुप फोन येतात मला… अक्षरशः डोळ्यातुन पाणी येतं!

याचवेळी काही लोक विचारतात, “का हो ? हे काम करुन तुम्हाला काय मिळतं?”

माझं उत्तर असतं “काहीच मिळत नाही उलट माझंच जातं!”

“काय मिळवता तुम्ही हे करुन?”

मी म्हणतो, “कुठं काय मिळवतो? उलट घालवतो!”

वडिलकीच्या नात्यानं मग ते सांगतात: “डॉक्टर, सगळं घालवुन जर तुम्ही हे करताय तर आजच्या जगात हे शहाणपणाचं आहे क? अहो, विचार करा जरा…”

आपली मानसिकता अशी झालीये, काही मिळालं तरंच फायदा नाहितर तोटा!

मी खरंच खुप घालवलंय या कामात, माझा तो फायदा की तोटा हा भाग नंतरचा!

“या कामानं माझा अहंकार गेला”

“या कामानं दुसऱ्याबद्दल वाटणारी घृणा गेली”

“माझ्यातला मी पणा गेला”

गरीबाला हलकं समजण्याची वृत्ती गेली”

“स्वतःकडे काहीही नसताना उगीचच हवेत राहुन दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती गेली”

“जिथं तिथं आपलंच खरं करण्याचा स्वभाव गेला”

“कोणासाठी काहीतरी करायचं तर पैसे घेवुनच, हा माझा स्वार्थ गेला”

“सतत स्वतःचं दुःख मोठं मानुन, दुसऱ्यावर त्याचा राग काढायचा हा स्वभाव गेला”

“आपल्या पुढे कुणी जात असेल तर त्याच्यावर जळण्याचा भाग गेला”

अजुनही खुप आहे सांगण्यासारखं…

या कामात मी इतकं सगळं गमावलं…?

रस्त्यावर काम करताना यातलीच एखादी आज्जी “लेकरा” म्हणत भर रस्त्यात तिला मिळालेल्यातल्या चांगल्या अन्नाचा घास तोंडात भरवते….

“च्या” पियाला रोज माझ्या हातात एक आज्जी दोन “रुप्पय” सरकवते….

भर रस्त्त्यात एखादा आजोबा धोतरानं माझ्या तोंडावरचा घाम पुसतो….

माझी पर्सनल बॅग आज कोण सांभाळणार यावर त्यांची आपापसात लुटुपुटुची भांडणं होतात! या बॅगेत सर्व क्रेडिट कार्डस आणि इतर महत्त्वाची कागदपत्र असतात, ती बॅग मी निश्चिंतपणे त्याच्याकडे सेफ कस्टडी म्हणुन ठेवतो, आणि आज्ज्या, “माज्या ल्येकराची पिशवी” म्हणुन तीला जीवापाड सांभाळतात.

सगळं आवरुन घरी निघालो, आणि जातांना कोणी मध्येच पेशंट म्हणुन आलं तरी त्याला हे लोक हटकतात, “अंय, बाबा जावुंदे आता लेकराला घरी, पोरगं आजुन जेवल्यालं न्हाय! तुजा तरास रोजचाच हाय, आता फुडल्या खेपंला घे औशीद… जावुंदे सोड डाक्टरला…” असं त्याला दटावतात.

मी काय गमावलं आणि काय मिळवलं याचा लेखाजोखा मांडलाय, अगदीच समजेल असं बोलायचं तर Income and Expenditure Statement सादर केलंय.

गंमत अशी आहे की जमेच्या रकान्यात “जमा” आहेच पण खर्चाच्या रकान्यात पण “जमाच” आहे…

All credits and no debits….!!!

आता सांगा मी खरंच घालवलं कि खर्या अर्थानं मिळवलं?

म्हणुन म्हणतोय मी खुप श्रीमंत आहे!

2 Comments

  1. Good job, Dr.Mr.& Mrs. Abhijit Sonawanae. Best wishes to achieve ur goal for compassion an determination towards ur work. God Bless U

Leave a Reply

Your email address will not be published.


*