आपल्याला वाटत असेल की मी खुप काहितरी आगळंवेगळं करत आहे, परंतु तसं काहिच नाही. मी यांना मोफत औषधे पुरवतोय, हे केवळ निमित्त आहे! मला खरंतर भिक्षेकर्यांचं समुळ उच्चाटन करायचं आहे.
मी यांना कायम मोफत औषधे देत गेलो तर हे लोक कायम माझ्यावर अवलंबून राहतील, भिकारी ते भिकारीच राहतील….. हे असं झालं, तुम्ही भिकारीच राहुन भीक मागत रहा, आणि बदल्यात मी तुमचा मोफत औषधोपचार करेन! असं झालं, तर रोज नविन भिकारी तयार होतील, जे मला अजीबात नकोय…
माझा मुळ हेतु हा आहे, की सध्या भिक्षेकरी म्हणुन आयुष्य जगत असलेल्या लोकांचे पुनर्वसन करायचं. आज ते दीनवाणेपणाने आपल्याकडे मागताहेत, माझं स्वप्न आहे, उद्या ते दुसऱ्याला काहितरी देउ शकतील, किमान स्वतःचं आयुष्य मानानं जगु शकतील इतकं त्यांना सक्षम बनवायचं…
पण असं करण्यासाठी मला त्यांच्याशी संवाद वाढवावा लागेल, त्यांच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण करावा लागेल, माझं ते काही ऐकतील अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल. आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मी त्यांना हक्काने सांगेन, ” चला उठा आता, बास झालं भीक मागणं आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणं! स्वाभिमानाने जगा”
पण असं सांगण्या अगोदर त्यांना पोटापाण्यासाठी काहितरी रोजगार मला द्यावा लागेल आणि मी त्याही प्रयत्नात आहे. माझ्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी मी आज त्यांचा मोफत औषधोपचार करतोय, माझं ते ऐकतील इतपत परिस्थिती निर्माण झाली की भीक मागणं मी त्यांना बंद करण्याची विनंती करेन ! तोपर्यंत रोजगाराच्या संधी शोधुन ठेवेन… शासनाच्या सहाय्याने पुनर्वसन करण्याचा पुर्ण प्रयत्न करेन….
हा विश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोफत औषधोपचार हे फक्त निमित्त आहे, माझं ध्येय नाही. नविन भिक्षेकरी तयार झाले नाहित तर मला हे काम थांबवावं लागेल. ज्या दिवशी माझं हे काम थांबेल तो दिवस माझा… आणि हेच माझं ध्येय आहे!
आणि म्हणुन माझ्या तपासणीदरम्यान मी या लोकांना विश्वासात घेवुन त्यांना भीक मागणं सोडण्यासाठी विनवतोय परंतु अजुन तरी सगळा “आनंदच” आहे. या पार्श्वभुमीवर सांगायला खुप आनंद होतोय की, माझ्या या प्रयत्नांना हळुहळु यश येतंय. चार लोकांनी आज मला सांगितलं की मी जर त्यांच्या हाताला काम दिलं तर ते भीक मागणार नाहीत…
आता त्यांच्या हाताला काम देणं , सोय करणं ओघाने आलंच… या चार जणांसाठीचा माझा प्लॅन असा:
- एक अपंग आजोबा आहेत त्यांना तीन चाकी सायकल किंवा व्हिलचेअर दिली – तर ते रुमाल, स्कार्फ व सॉक्स रस्त्यावर फिरुन विकु शकतील.
- दुस-या बाबांना पुर्वी मसाले विकण्याचा अनुभव आहे. सध्या भांडवल नाही म्हणुन भीक मागतात. यांना होलसेल रेटने मसाले घेवुन दिले तर आनंदाने ते विकायला तयार आहेत, शिवाय त्यांचे पुर्वीचे ग्राहक आहेतच.
- तिसरी व्यक्ती चालु फिरु शकत नाही. हे पुर्वी वजनकाटा घेवुन बसायचे मंदिराबाहेर, साधारण 250 – 300 रुपये सरासरी मिळायचे. पण कुणीतरी जबरदस्तीने हा काटा काढुन घेतला आणि हा व्यवसाय बंद पडला. यांना डिजीटल वजनकाटा घेवुन दिला तर आधीपेक्षा नक्कीच जास्त पैसे देतील लोक.
- चौथ्या व्यक्तीस शासनाच्या सुसज्ज अशा बेगर्स होममध्ये जाण्यासाठी तयार केलंय आणि ते तयार आहेत.
बघु, आता मला पुढच्या गुरुवारपर्यंत व्हिलचेअर आणि रुमाल, सॉक्स, स्कार्फ, मसाले, वजनकाटा वगैरे गोष्टिंसाठीचे भांडवल जमवायचे आहे, जमवेन!
या चार जणांनी भीक मागणं सोडुन स्वकष्टावर स्वाभिमानानं जगायला सुरुवात केली तरी आतापर्यंत केलेलं काम सार्थक झालं असं मला वाटेल. मला हे आवर्जुन सांगावसं वाटतंय कि आपल्या पाठबळामुळेच हे सर्व करण्याचं बळ मला मिळतंय…हे सांगण्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच!
Doctar namsskar.. tumchya kamala khup shubhecha. 3 chaki cycle..masale n vajankata yasathi paise dile tar chalel ki vastuch dyaychya..plz kalva