२३ सप्टेंबर – उत्तरार्ध

पार पडला आजचा “ब्लड चेकअप कॅम्प”

“अ” म्हणजे अडचण … “अ” म्हणजे अभिजीत …हे कायमचं समीकरणच आहे!

खुप वेळा सांगुनही टेक्निशिअन ने लाईट वर चालवायचं भलं मोठ्ठ मशीन आणलं चेकअपचं… आता रस्त्यावर माझ्यासारख्या भिका-याला लाईट मोफत देणारा कोण तालेवार भेटणार?
परत पाठवला टेक्निशिअनला, आणि लाईट न लागणा-या गोष्टींची योजना केली…

बाणेर फाट्यावर अपेक्षेप्रमाणे 20 भिक्षेकरी झाले! आता शनिवारवाडा आणि शनीपार… माझे बालेकिल्ले! इथं किमान 200 वर भिक्षेकरी होणार हा दांडगा विश्वास!

तपासणी सुरु केली रस्त्यावरच, भयाण गर्दी… चेकअपसाठी प्रत्यक्ष आमच्या सौ. डॉ. मनिषा सोनवणे आणि तीच्यासह टेक्निशिअन रणांगणावर!
मोठ्या आविर्भावात केली सुरु रक्त तपासणी पण सगळीकडे औदासिन्य! कोणीच तपासणी करुन घेईना… मला कळेना, झालंय काय?

बायको तीनदा म्हणाली, “तुला तर इथं कुणी कुत्रंही विचारत नाहिये…”

पडलेलं तोंड घेवुन चौकशी केल्यावर कळलं की कोणीतरी पसरवलंय भिक्षेक-यांत की, “डॉक्टर तुमचं रक्त फुकट घेवुन विकणार आहे एका कंपनीला…”
तिथंच डोळ्यातनं घळाघळा पाणी सुरु झालं माझ्या, म्हटलं, “येड्यांनो, तुमच्या रक्ततपासणी साठी मी माझंच रक्त आटवलंय, पैशासाठी कुणाकुणाच्या पाया पडलो… एक संस्था खर्च करत्येय तुमच्यासाठी… मी रक्त विकेन तुमचं? अरे तुमचा फोटो मी कुणाला दाखवत नाही, मी तुमचं एक मिली रक्त विकेन?”

काही केल्या अश्रु थांबेनात बायकोला म्हटलं, “चल आवर, हरलो मी!”

“भिक्षेक-यांना लाडावु नका, फालतु गोष्टी करु नका” असं कित्येक लोक तोंडावर सांगतात मला … मी त्यांच्या विचारांचा आदरच करतो कारण मी यातुन नंतर त्यांचं पुनर्वसन करणार आहे हा माझा विचार मी त्यांच्यापर्यंत पोचवायला कमी पडलो, चुक माझीच आहे!

यातलेच काही लोक माझा हा प्रकल्प हाणुन पाडण्यात यशस्वी झाले होते…

ब-याच भिक्षेक-यांनी नंतर सांगितलं, “डॉक्टर रक्त देतो तपासणीला पण आम्हाला पण शे दोनशे पायजेत , तुमी कमावता आमचं रक्त विकुन, आमाला पण मोबदला पायजे…”
मी काय बोलु? त्यांना दोष देणार नाही मी! साधी भोळी माणसं आहेत ती माझी… त्यांना भरवलं होतं कुणीतरी माझ्याविषयी!

4.30 पर्यंत 55 लोकांची तपासणी झाली होती, तिन्ही पॉइंट्सवर… माझी अपेक्षा 200 + होती पण… शेवटी निर्णय घेतला, जे पॉइंट्स ठरवले नव्हते तिथं जायचं…

डोनेशन मधले पैसे फालतु खर्च होवु नयेत म्हणुन मी कोणतेही गाडी भाड्याने घेतली नव्हती! आम्ही आमच्या बाईकनेच फिरत होतो…

मदतीसाठी श्री. बडवे, पवन लोखंडे, कविता देशपांडे, मुंदडा साहेब, कल्पनाताई गायकवाड, हुसेनभाई हे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज लोक मुंबई आणि कोकण आणि कुठुन कुठुन आले होते, (बस आणि रिक्षा ने फिरत फिरत! माझ्यासारख्या भिका-याचं केवळ मनोधैर्य वाढवण्यासाठी) दिवसभर उपाशी थांबले हे… मी आभार कसे मानु यांचे… वेडी लोकं आहेत ही!

या सर्वांना 5:30 ला मार्गी लावलं आणि दोन इतर टेक्निशिअन ना त्यांच्या चार आणि माझ्या दोन मोठ्या बॅगांसह माझ्या बाइकवर घेतलं… जे स्पॉट ठरवले नव्हते अशा तीन स्पॉटस्वर कसरत करत जावुन तिथल्या भिक्षेक-यांच्या तपासण्या केल्या आणि 9.30 वाजेपर्यंत 181 हा आकडा गाठला….

9.30 ला जाणवलं, भुक लागल्येय… दिवसभरात एक भेळ आणि पाणी किती वेळ मदत करेल? टेक्निशिअन्सना म्हटलं, “माफ करा भावांनो, मी माझ्या हट्टासाठी तुम्हाला तंगवलं! चला कायतरी खावु…” टेक्निशिअन्स म्हणाले, “सर तुम्ही आधी हसा, आमचं पोट भरंल…”

पुन्हा या नालायक डोळ्यांनी दगा दिलाच!

काय सांगु, कसं सांगु, किती लिहु, कसं लिहु कोणा कोणाबद्दल लिहु…? नाही सगळंच सांगता येत!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*