मनातलं काही…

भिक्षेक-यांचा डॉक्टर “Doctor For Beggars” म्हणुन काम करतांना माझी एक सवय आहे. मी त्यांना तपासतांना ते जीथे बसतात, तीथेच मांडी घालुन बसतो, त्यांनी काही दिलंच खायला तर खातो…

आयुष्यभर मागुन खायची सवय लागल्यावर एका रात्रीत त्यांना काम करायला राजी करण्यासाठी माझ्याकडे जादुची काठी नाही!

त्यांनी माझं ऐकावं यासाठी मला त्यांच्याशी नातं निर्माण करावं लागतं… यासाठी मला त्यांच्याशी रोज संवाद साधावा लागतो, त्यांच्या अंतरंगात शिरावं लागतं, आणि म्हणुन त्यांच्यातलाच एक व्हावं लागतं!

आम्हाला दुरुन पाहणाऱ्याला कळत नाही यातला डॉक्टर कोण आणि भिक्षेकरी कोण? इतके आम्ही एकरुप झालेले असतो… माझ्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो इतकाच काय तो फरक!

आज मी कुणाचा मुलगा आहे, कुणाचा नातु, कुणाचा भाचा आहे तर कुणाचा भाउ! यांच्याबरोबरचे लहानगे मामा म्हणतात तर कुणी काका…
जणु आख्खं माझं कुटुंबच भीक मागतंय रस्त्यावर…

सुरुवातीला रस्त्यावर भिक्षेक-यांना तपासणे एव्हढाच मुळ हेतु होता, पण घरी जाताना पोरा, ल्येका, वासरा, सोन्या, मामा, काका, दादा , भाउ म्हणुन त्यांनी मारलेल्या हाका डोक्यात पिंगा घालायच्या…

घरी पोचल्यावर मला जाणवायचं, माझ्या कुटुंबातले लोक याच नावानं मला हाका मारतात, आणि मी या नात्याला जागुन त्यांना सुखी ठेवण्यासाठी झटतोय, त्यांना भविष्यात काही अडचणी येवु नयेत यासाठी तळमळतोय…

पण, इतकंच प्रेम आणि माया हे बाहेरचे लोक करत असतांनाही, त्यांना तपासुन औषध देण्याव्यतिरीक्त मी काहीच करत नाही!

म्हणजे माझ्या ख-या कुटुंबासाठी मी शारीरिक आर्थिक मानसिक आधार देणार आणि ज्यांनी माझ्याशी बाहेरुन नात्यांची नाळ जोडल्येय भाबडेपणाने त्यांच्यासाठी मी फक्त माझं डॉक्टरी स्किल वापरणार?

पेशंट तपासुन औषधं देणं हा तर माझा धर्मच आहे, कर्तव्यच आहे, तशी शपथ घेतल्येय मी डॉक्टर होताना… मग भिक्षेक-यांना औषधं देतोय त्यात माझं काय “कवतीक”…? विशेष तर तेव्हा होईल, जेव्हा मी माझ्या कुटुंबासाठी करणारी प्रत्येक गोष्ट या मानलेल्या नात्यांसाठीही करेन!

पण मी यातलं काहीच करत नव्हतो… मग मी कोणाला फसवत होतो? लेकरा , सोन्या म्हणणा-या त्या भाबड्या आज्ज्या आणि आयांना की खुद्द स्वतःलाच?

आत एक बाहेर एक असं का वागतोय मी?
मुद्दाम नव्हतो करत, पण असं होत होतं हे खरं आहे!

माझ्याच मनात चाललेला हा विचार मला त्रास देत होता, माझाच छळ करत होता…

डॉक्टरचा मुखवटा लावुन मी या भिक्षेक-यांत फक्त शरीराने राहतोय, मनानं नाही… खरा मुलगा आणि नातु तर मी माझ्या घरातल्यांचा आहे ही बोच खुप छळायची… मी मुखवटा लावुन वावरतोय, यावर स्वतःचाच राग यायचा…
आणि मग एके दिवशी असा मुखवटा फेकायचं मी ठरवलं… जो घरात तोच बाहेर रहायचं!

ज्या दिवशी मी हा डॉक्टरी मुखवटा फेकला त्याच दिवशी माझ्यातला मुलगा, नातु , काका , मामा, भाऊ खऱ्या अर्थाने जन्माला आला… आणि ख-या अर्थाने मी भिक्षेक-यांची शारीरिक आर्थिक आणि मानसिक काळजी घ्यायला सुरुवात केली!

घरी असलेल्या माझ्या कुटुंबाला मी भीक नाही मागु देत ना? मग घराबाहेर असलेल्या माझ्या या मानलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही मी भीक मागु देणार नाही हा विचार मनात पक्का रुजला!!!

त्यांचं पुनर्वसन करण्याचं मुळ माझ्या या सर्व विचारात आहे…

मी मुखवटा फेकला त्याला आज बरोबर 12 महीने झाले… म्हणुन हे सगळं प्रामाणिकपणे लिहावसं वाटलं…

मागील 12 महिन्यांत 27 आजी आजोबा आणि इतर मंडळी स्वाभिमानानं काम करताहेत. कुणी फुलं विकतंय, तर कुणी मंदिराबाहेर तेल,कुणी बॅटऱ्या विकतंय तर कुणी रुमाल, कुणी दाढी करण्याचा व्यवसाय करतंय तर कुणी धुणंभांडी…

काही का असेना; कुटुंबातल्या 27 सदस्यांना तरी मी रस्त्यावरुन घरात आणु शकलो!

हे सगळं करत असताना, माझ्यावर निःस्वार्थपणे प्रेम करणारी जुनी जाणती मंडळी मला म्हणतात,”Hey Doc, अरे काम करंच तु, पण इतक्या Below Dignity जायचं काय कारण आहे ? After all you are doctor, you have your own status, why you are spoiling that बेटा?”

“आम्ही काही लोक मिळुन तुला व्हॅन घेवुन देतो ड्रायव्हर सकट, दोन क्वालिफाइड डॉक्टर्स देतो, सर्व खर्च आमचा… You be the Boss, तु फक्त गाइड कर त्यांना…”

मी तेव्हाही त्यांना नम्रपणे सांगीतलं होतंच, आताही यानिमित्ताने सांगतोय, पुर्वी मी आंतरराष्ट्रीय संस्थेत महाराष्ट्र प्रमुख होतो, तेव्हा साहेब आणि बॉस होतोच, साहेब आणि बॉसचा मुखवटा फेकायला मला 15 वर्षं लागली, खुप मोठ्या प्रयत्नाने मी आता बीनमुखवट्याचा जगायला शिकलोय, पुन्हा आता मुखवटा लावायला मला शिकवु नका…
रस्त्यावर मांडी घालुन बसायचं सुख तेव्हाच्या माझ्या 50 हजाराच्या रेलींग चेअर मध्येही नव्हतं… मांडी घालुन बसण्याची सवय माझी मोडु नका…

महत्प्रयासाने मी कुणाचा तरी मुलगा झालोय, नातु झालोय, मामा – काका झालोय पुन्हा “सायेब” बनवुन माझी ही नाती तोडु नका!
मला राहु द्या असाच भिक्षेक-यांचा डॉक्टर म्हणुन किंवा डॉक्टरांमधला भिकारी!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*