वयस्कर भिक्षेक-यांना तपासताना मला खुप लोक असे भेटतात ज्यांना मोतीबिंदु झाला आहे.
यालाच फुल पडणे किंवा इंग्लिशमध्ये Cataract असं म्हटलं जातं.
यांत धूसर दिसू लागणे, रात्रीच्या अंधारात नीटसं न दिसणं, यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं.अशा अडचणी येतात तेव्हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेणे अत्यंत गरजेचे असते. शस्त्रक्रिया करुन पुर्ण बरा होणारा हा व्याधी आहे.
भिक्षेक-यांपुरतं बोलायचं तर, ते याकडे कधीच लक्ष देत नाहीत, पार शंभर टक्के दिसायचं बंद झालं तरीही! (लक्षात आलं तरी काय फायदा म्हणा!)
यामुळे त्यांच्यातील अपघातांचे प्रमाण जास्त आहे…
माझ्याकडे असे 35-40 आजी आजोबा आहेत, ज्यांना मोतिबिंदु झाला आहे. दिवस असुनही चाचपडत चालतात, समोर कोण आहे कळत नाही… काय खातोय हे ही चवीवरुन आणि स्पर्शातुन कळतं… रात्रीची यांची कल्पनाच केलेली बरी…
आणि म्हणुन यांना चांगली दृष्टी यावी यासाठी माझा प्रयत्न चालु आहे…
पुण्याच्या खाजगी दवाखान्यात एका डोळ्यासाठी एका व्यक्तीसाठी किमान 30000 – 35000 लागतात. समाजकार्य म्हणुन कितीही पैसे कमी केले तरी
ही किमान 15000 एका व्यक्तीला लागतातच, जे मला परवडत नाहीत!
सरकारी यंत्रणेत मोफत सुविधा आहेत पण मध्ये बरेच “जर” आणि “तर” आहेत, शिवाय अनेक कागदपत्रे… मी हे पुर्ण करु शकत नाही…
या सर्व परिस्थितीत एका धर्मादायी संस्थेला माझी दया येवुन त्यांनी 35 -40 हजाराचं ही शस्त्रक्रिया केवळ 1000 – 1500 मध्ये करुन द्यायचं मान्य केलं आहे, कोणत्याही कागदपत्रांशिवाय!
हा माझ्यासाठी फार फार मोठा दिलासा आहे… प्राप्त परिस्थितीत त्यांचे पाय धरण्या व्यतिरीक्त मी काहीच करु शकत नाही…
बघुया, हे माझ्या आवाक्यातलं आहे… मी नक्की प्रयत्न करेन आणि दिसणं बंद झालेल्यांना पुन्हा स्वच्छ “नजर” देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन!
Leave a Reply