प्रेम, माया आणि आशिर्वाद

ब-याच दिवसांपासुन तयारी करत असलेला आजचा कार्यक्रम… भिक्षेक-यांची नेत्रतपासणी!

मागचा पुर्ण आठवडा पुणं पिंजुन काढुन डोळ्यांचा आजार असणारे भिक्षेकरी शोधले. आज त्यातल्या पहिल्या 15 लोकांची अपॉइंटमेंट घेतलेली. आज यांच्या डोळ्यांवर इलाज होईल, खुप दिवसांपासुनचं स्वप्न पुर्ण होईल, मनोमन मी खुष होतो !

पण माझा मुलगा सोहम, हा गेल्या 4 तारखेपासुन तापाने आजारी! मी आणि डॉ. मनिषा, दोघंही त्याचा ताप उतरण्यासाठी हरत-हेने प्रयत्न करत होतो, पण काही केल्या ताप उतरेना… सगळ्या गावाला बरं करतो पण आमचंच पोरगं आमच्या औषधाला दाद देत नव्हतं… सोमवारी रात्री त्याने दोघांनाही जागवलं, रात्रभर तो ग्लानीत बडबड करत होता…

आज मंगळवार उजाडला, पहाटे ताप पाहिला 102.5 डिग्री…

आज माझी भिक्षेक-यांची नेत्रतपासणी आणि मनिषाने झोपडपट्टीतल्या लोकांसाठी शिबीर ठेवलेलं, दोघांच्याही सर्व तया-या पुर्ण… जाणं दोघांनाही अत्यावश्यक!

दोघंही बाहेर गेलो तर याला कोण बघेल? काही कळेना, जावं तरी प्रॉब्लेम, न जावं तरीही… पण आज जाणं दोघांनाही बंधनकारक! कोणीच काही कॅन्सल करु शकत नव्हतं, लोक रस्त्यावर वाट पहात उभे होते, दोघांचेही फोन वाजत होते!

शेवटी आमची अवस्था ओळखुन सोहम म्हणाला, “मी बरा आहे आता, तुम्ही दोघेही जा…”

जाताना दोघेही चारदा दारातुन परत आलो, पण शेवटी बाहेर पडावंच लागलं… निष्ठुर होवुन..! आम्ही निघालो, मनिषा तीच्या वाटेनं आणि मी माझ्या… एकमेकांच्या डोळ्यांतलं पाणी दिसु नये याचा आटोकाट प्रयत्न करत! आता पडलोच आहे बाहेर तर, सोहमचा विचार नको, हे स्वतःलाच बजावुन!

मी पोचलो, वाटेत रॉबीनहुड या स्वयंसेवी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुनील सर व राठी सर पॉश कार घेवुन भिक्षेक-यांना घेवुन जाण्यासाठी रस्त्त्यात वाट पहात होते…

वाटेत हिंडुन, कसरती करत करत एकुण 15 भिक्षेक-यांना घेवुन पोचलो दवाखान्यात…

भारी कारमध्ये बसल्याचा आनंद या आजीआजोबांच्या मनात मावत नव्हता…!

दवाखान्यात तोबा गर्दी, आपल्या 15 लोकांचा नंबर यांत कधी लागणार या विचारात असतांनाच, डॉ. रावळ मॅडम म्हणाल्या, काळजी करु नका, यांना तपासल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही…

डॉ. रावळ मॅडमनी आत्मियतेने सर्वांना चेक केलं… 8 लोक ऑपरेशनने, 3 लोक चष्मा लावुन आणि 4 लोक औषधांनी बरे होणार होते… दवाखान्याची वेळ केव्हाच संपली होती!

ऑपरेशनच्या लोकांची रक्त लघवी तपासणी करणे गरजेचे होते, तपासण्या आजच झाल्या तर भार खुप हलका होणार होता… पण वेळ संपुन गेलेली…

शेवटी मदतीला आलेल्या पवन लोखंडे आणि भुवड सिस्टरांनी दवाखान्याच्या अरुण बोबडे यांना विनंती केली आणि वेळेनंतरही थांबुन त्यांनी माझ्या सर्व लोकांच्या तपासण्या करुन आजच्या आजच रिपोर्टस् ही दिले…

रावळ मॅडम आणि बोबडे साहेबांचे आभार कसे मानावेत हेच कळेना…!

ज्यांना चष्मे लागले होते त्यांच्या पसंतीच्या फ्रेमचे चष्मेही लगेच करायला टाकले… आरशात पाहुन फ्रेम पसंत करण्याची त्यांची चढाओढ पाहुन गंमत वाटत होती…

आजच्या बॅचमधल्या लोकांचे ऑपरेशन ठरले, दुस-या बॅचमधल्या लोकांना आणायची तारीख ठरली, सर्वांचे रिपोर्टस् हातात आले, चष्मे करायला टाकले… सग्गळी कामं मनाप्रमाणे झाली…

सर्वचजण थकले होते, वयस्कर आजी आजोबा भुकेजले होते, त्यांना खावु पिवु घातलं आणि पुन्हा कारने सोडायची व्यवस्था केली…

प्रत्येकजण आपापल्या वाटेने गेले… मी मागं थांबुन बीलं भागवली आणि समाधानाने एकेक रिपोर्ट पहात होतो, पुढचं प्लॅनिन्ग करत होतो,

आजपासुन किमान 15 लोकांच्या आयुष्यात आपण सर्वांच्या मदतीने चांगली नजर देवु शकु या विचाराने खरंच खुप छान वाटत होतं, यांत सर्वांचाच वाटा आहे….!!!

रिपोर्टस् पहात असतांना सोहम ट्रस्टच्या नावावर आलेल्या बिलावर नजर गेली, सोहम ट्रस्ट… सोहम…!!!

एकदम सोहम आठवला…. 6 तास तो एकटा आहे, तापाने फणफणलेल्या अवस्थेत त्याला आम्ही सोडुन आलो होतो…. मला तो आत्ता आठवला,.. सर्व कामं संपल्यावर…

मनिषाला फोन लावला, म्हणाली, अरे मी त्याला सतत फोन लावत्येय पण तो उचलतच नाही…

यानंतर मी सोहमला फोन लावला… 1 रींग … 2 … 6…10…20… तो फोन घेत नव्हता… काय झालं असेल…? सहा तासात मी एकही कॉल त्याला केला नव्हता… मी निष्ठुर झालो होतो, की???

याच विचित्र आणि घाबरलेल्या मनंस्थितीत धडपडत घरी पोचलो… दार उघडंच! मी धडधडत्या छातीने आत गेलो…

तर हा पठ्ठ्या हेडफोन लावुन व्हिडिओगेम खेळतोय! थर्मामीटरने ताप चेक केला, एकदम नॉर्मल! दिवसभरात एकदाही ताप आला नव्हता…

कसं शक्य आहे ? ताप उतरवण्यासाठी आम्ही दोघंही डॉक्टर आईबाप मागचे 2-3 दिवस झुंजतोय, आता सहा तास एकही गोळी न देता हा बरा कसा झाला…?

आत्ता मी लिहितोय, रात्रीचे 12 वाजुन गेले आहेत, गोळ्या न घेता अजुन एकदाही त्याला ताप आलेला नाहीय….

म्हणजे आम्ही बाहेर असतांना आमच्या पोराची काळजी कोणीतरी अनामिक, अदृश्य शक्ती घेत होती, आमच्याही नकळतपणे… अतर्क्य!!!

पोराला सोडुन झोपडपट्टीतल्या लोकांना तपासणा-या आईला त्या लोकांकडुन मिळालेले हे आशिर्वाद असावेत की ज्या आजी आजोबांना मी तपासण्यासाठी घेवुन गेलो, त्यांच्या पासुन मिळालेली ही पवित्र उर्जा असेल?

माहित नाही आणि जाणुनही घ्यायचं नाही… पण एक खरं, प्रेम, माया आणि आशिर्वाद यात जी ताकद आहे ती कशातही नाही, आणि या ताकदीचं मोजमाप करणारं कोणतं सायन्सही आजतागायत अस्तित्वात नाही!!!

 

1 Comment

  1. Got to know about your trust through whatsaapp post. You are doing a great work..keep doing..all the best..????

Leave a Reply

Your email address will not be published.


*