डोळ्याच्या ऑपरेशन ची 23 तारीख तर ठरली आहेच, त्यासाठी आमचीही लगीनघाई चालुच आहे!
ज्यांना चष्मे लागलेत त्यांना त्यांच्या आवडीच्या फ्रेमचे चष्मेही करायला टाकले होते, 4-5 दिवसांत देतो असं सांगीतलं होतं दुकानदाराने… तोवर आमच्या लोकांना दम कुठला निघतोय?
भेटेन तेव्हा “बाबा, लगीन…?” या चालीवर, “डाक्टर आमचा चष्मा…?” असा लकडा माझ्यामागं…
शेवटी मिळाले बाबा आज चष्मे एकदाचे, प्रत्येकजण आपापला चष्मा वेगवेगळ्या स्टाइलने घालुन पहात होता! आणि सगळीकडे एकच चर्चा, “मी कसा दिसतुया आन तु कशी दिसतीया”
नुसती झुंबड…! चष्म्याचे, त्याच्या कव्हरचे कोण कौतुक…!
माझं एकच काम, त्यांचे वेगवेगळ्या स्टाइलचे फोटो काढायचे आणि त्यांना ते दाखवायचे…
आपापले फोटो पाहुन आज्ज्या पदराआड लाजायच्या आणि आजोबा मिशीवर ताव द्यायचे…
आज्ज्या एकमेकीला चिडवत होत्या, थट्टा करत होत्या… ज्यांचं आपापसांत पटत नाही त्याही या निमित्ताने खेळीमेळीने वावरत होत्या… या अवतारात मी ही पहिल्यांदाच त्यांना या रुपात पहात होतो…
ब-याच वर्षांनी इतकं स्वच्छ दिसतंय, यांचं कौतुक वेगळंच!!!
म्हातारमाणसांत एक मुल दडलेलं असतं… म्हणजे नेमकं काय, ते आज समजलं…
या सर्व प्रकारात, एक हृदयद्रावक अनुभवही आला… सविस्तर सांगेन पुन्हा केव्हातरी!
लहानपणी जादुचं पुस्तक, जादुची काठी, जादुचा रुमाल, जादुची सतरंजी असली पुस्तकं वाचली होती… त्या खोट्या कथा होत्या हे आज कळतंय…
पण नाही, या खोट्या कथा नव्हत्या… बघाना आज या “जादुच्या चष्म्यानं” किती जणांना आनंदी केलं…
किती जणं खळखळुन हसणं विसरले होते, ते हसु आज पुन्हा ओठी आलं…
गमावलेलं तरुणपण काही अंशी का होइना परत आलं… आपण ही सुंदर आहोत अशी नव्याने “दृष्टी” मिळाली…
जादु… जादु म्हणजे आणखी काय असतं?
लहानपणीच्या जादुच्या गोष्टी ख-या असोत की खोट्या…. पण “जादुचा चष्मा” खरंच असतो हे आज मला मान्य करावंच लागेल!!!
Leave a Reply