ज्या भिक्षेक-यांना चष्मे लागले होते त्यांना ते दिले… मोतिबिंदुचे ऑपरेशन केले…
आज्ज्या पदराआडुन खुसुखुसु हसत होत्या, आजोबा मिश्यांवर ताव देवुन माझ्याकडुन फोटो काढुन घेत होते…
एकुण वातावरण हास्यात आणि एकमेकांच्या खोड्या काढण्यात दंग…
खुप वर्षांनी इतकं स्वच्छ पहिल्यांदाच दिसत होतं… आनंद चेह-यावरुन आणि डोळ्यातुनही वहात होता!
एक बाबा मात्र एकाबाजुला गप्प गप्प उभे… मी चमकलो … म्हटलं, “बाबा, दिसतंय ना व्यवस्थित?”
“व्हय दिसतंय डाक्टर, लय भारी दिसतंय आप्रेशन झाल्यापसनं…”
“मग गप्प का? मला वाटलं, तुम्हाला ऑपरेशन करुनही दिसेना…!” यांना दिसतंय म्हटल्यावर माझाही जीव भांड्यात पडला…!!!
पण पुन्हा ते काहितरी विचारात गढुन गेले… मी दुर्लक्ष केलं…
हसत खेळत सगळ्यांना गाडीत बसवुन पाठवणी केली… हे तीथंच उभे…
“अरेच्या! बाबा, गाड्या गेल्या की सगळ्या, तुम्ही का थांबलाय?”
“न्हाय तुमालाच येकट्याला बोलायचं हुतं…”
“डाक्टर, मला सांगा, माजं डोळं आप्रेशन च्या आदी काय कामाचं नव्हतं, पन आता आप्रेशन नंतर नव्यागतच झाल्यात… बरुबर हाय ना?”
मी हसत म्हणालो, “होय बाबा, खरं आहे… आता तुम्हाला नवे डोळे मिळालेत आसंच समजा…”
ते समाधानानं हसले… तरीही काव-याबाव-या नजरेने इकडेतिकडे पहात म्हणाले, “डाक्टर, तुमीबी डोळ्याची आप्रेशनं करता का?”
मी म्हटलं, “नाही, मी नाही करत… ऑपरेशन्स करणारे डॉक्टर वेगळे असतात…”
ते पुन्हा खिन्न झाले…
म्हटलं, “नेमकं झालंय काय बाबा? तुम्हाला काही त्रास असेल अजुन तर, चला परत वर, ज्यांनी ऑपरेशन केलं त्यांना सांगा…!”
असं म्हणुन मी त्यांना उठवायाला लागलो… तर माझा हात सोडवुन म्हणाले… “न्हाय न्हाय वो मला काय तरास नाय पन…पन…?”
“पण काय बाबा? घडाघडा बोला, नायतर रिक्षात बसवुन देतो… अहो मला अजुन पुढची कामं आहेत…”
“डाक्टर, कसं इचारु?”
“बाबा, आवो बोला की आता, की जावु? पुढल्या खेपेला विचारा…” आणि मी माझ्या बाईक कडे निघालो…
“डाक्टर…” पुन्हा मागुन आवाज… हातानंच जवळ येण्याची त्यांनी खुण केली…
मी पुन्हा गेलो, थोड्याशा नाराजीने विचारलं, “आता काय बाबा, तुम्ही बोलत पण नाही आणि चाललो की हाका मारता! बोला…”
“तसं न्हवं, पन तुमीच म्हनला हे डोळं आता नव्यागतच झाल्यात…’’
“होय की, पण त्याचं काय?”
“मंग हे माजं चांगलं डोळं काडता येत्याल का?”
मी उडालोच… आश्चर्याने जवळजवळ ओरडुन विचारलं… “क्काय, डोळे काढायचे??? आणि कशाला…?”
माझा हात धरुन अत्यंत शांततेत म्हणाले, “न्हवं… तसं न्हवं डाक्टर… माजा नातु हाय आट वर्साचा… आन त्यो आंदळा हाय… डाक्टर म्हणले काय बी करुन उपेग न्हाय… ह्याला दुसरा डोळाच बसवावा लागंल…”
“आता दुसरा डोळा आमी बसवावा कुटनं? आन त्याला किती पैशे पडत्याल?”
“मेल्यावर लोकं दान करत्यात डोळं पन त्ये आमच्यासारक्या भिका-याला कोण दिल? आनी का?”
“मग म्हनलं, आपुनच आपलं डोळं दिवु ल्येकराला…पन आपलंच डोळं फुटकं… त्येला दिवुन तरी काय फायदा?”
“म्हनुन मंग तुमच्याकडं मी आप्रेशन केलं… पन ते मला चांगलं दिसावं म्हणुन नाय… माज्या ल्येकराला चांगलं दिसावं म्हनुन डाक्टर…”
बाबांनी तीकडं मान फिरवली… मी खांद्यावर हात ठेवला… हात चींब ओला…
मी विचारलं, “आणि त्याचे आईवडिल… म्हणजे हा मुलगा तुमच्या मुलीचा का मुलाचा? आणि ते कुठं असतात?”
माझा हात हातात घेत म्हणाले, “मी लगीन न्हाय केलं…”
मी चक्रावलो… म्हटलं, “मग हा मुलगा?”
“ह्यो मला भिक मागताना सापडला, उकीरड्यावर… कुण्या xxxxx नी फेकुन दिला व्हता जलमल्याबरुबर! तवापसनं मीच संबाळतोय…”
मी हेलावून गेलो… मला कळेचना… खरंच किती मोठी माणसं आहेत या जगात? स्वतःच्या चैनीसाठी दुस-याला मारुन टाकणारी लोकं कुठं आणि उकिरड्यावर सापडलेल्या मुलाला जिवंतपणी डोळे द्यायला चाललेला हा आज्याबा कुठं ?
भरल्या गळ्याने मी एकही शब्द बोलु पावत नव्हतो…
पुढं म्हणाले, “बगवत न्हाय वो डाक्टर… दिसत न्हाय त्येला, चाचपडत चाचपडत लेकरु चालतंय, दिसातनं दहा वेळा पडतंय, हाताला भाजुन घेतंय, सांजच्याला गेलो कि मला च्या करुन द्यायला बगतंय, पडत झडत माजं हातरुण टाकुन देतंय…. रातच्याला मला दिसत न्हाय, त्यो तर आंदळाच हाय पन मलाच हाताला धरुन लगवीला घिवुन जातंय, मला आज्याबा म्हणतंय…”
“मला जमत न्हाय वो त्येला संबाळायला, पन सोडुन कसा दिवु त्येला… म्या पन त्येला सोडला तर त्याला लहानपणी सोडलेल्या xxxxx आईबापात आन माज्यात फरक काय?”
मलाही खुप बोलायचं होतं, मी तसा प्रयत्न केलाही….. पण “आज्याबा”, या एका शब्दाशिवाय बोलुच शकलो नाही काही! माझेच शब्द सहकार्य करत नव्हते मला कि ते ही गोठुन गेले होते आज्याबासमोर कळेचना…!
“आवं बीनलगीन करता नातु मिळाला, हे नशीब न्हवं का?” आज्याबानं तंद्री मोडली माझी… “त्येजाचसाटी भिक मागतुय, आन त्येजाचसाटी ह्यो डोळाबी नीट करुन घेतलाय तुमच्याकडनं…”
“लेकरु लय ग्वाड हाय… एवडं देकनं हाय की नजर हाटत नाय पोरावरनं… फकस्त डोळ्यात गेलंय…पन आसुंदे… हाय त्येजा आज्याबा जीवंत… मरायच्या आदी त्याला डोळं दिवुनच जाईन…”
आवंढा गिळत कसंबसं म्हणालो, “पन तुम्ही त्याला डोळे दिल्यावर मग तुम्ही त्याला बघणार कसे? तुम्हाला काहिच दिसणार नाही…!”
“आवो डाक्टर, मी किती जगनार हाय आजुन? आन डोळं मिळाल्यावर त्यो बगंल की त्येज्या आज्याबाला… त्यो काय सोडणार हाय का आज्याबाला? मी आंदळा हुयीन तवा त्योच माजी काटी…!”
“दिसाय लागल्यावर शाळा शिकंल… कामधंदा करंल… मोटा हुइल… मी आदिच त्येला सांगितलंय, तु भिक मागायची न्हाई…”
तर त्यो म्हनतो, “आज्याबा, जरा थांब तु, मला डोळं नसलं म्हनुन काय झालं? मी गानं म्हनीन, नाचुन दाकविन, काय बी काम करीन आनी कमवुन आनीन, मीच तुला भिक मागु देणार न्हाय आज्याबा…”
परवा म्हनला, “तुला गानं येतंय का आज्याबा…? तु कसंबी गानं म्हन बसुन एक्या जाग्यावर, मी माकडागत उड्या मारुन हसवतो लोकांना, लय पैशे मिळत्याल… मंजी तुला भिक मागाय नको…”
हे दोघेही एकमेकांचे कुणीच नाहीत, तरी एकमेकांना सर्वस्व दिलेलं … दोन नद्या एकत्र होवुन एकजीव होतात, तसे हे दोन जीव एकमेकांशी समरस झालेले… आईबापाने, समाजाने एव्हढंच काय देवानंही नाकारलेले! तरीही एकमेकांत घट्ट अडकुन बसलेले… जगावेगळा नातु आणि त्याहुन वेगळा हा आज्याबा…!
एकाने आपलं बालपण देवु केलं तर एकजण आपलं आयुष्यच द्यायला तयार…!!!
आपण आठ वर्षाचे असु तेव्हा एव्हढी जाण होती आपल्याला? नक्कीच नाही…
मग हा आठ वर्षाचा मुलगा आपलं बालपण हरवुन असा पोक्त कसा झाला? याला जबाबदार कोण? परिस्थिती? समाज?? की आणखी कुणी???
हृदयस्पर्षी
Wah…motivative