आज मंगळवार… भवानी माता मंदिरातलं काम संपवुन दुस-या मंदिराकडे निघालो
मेनरोड ट्रॅफिक मुळे जाम….
थोड्या आडबाजुच्या रस्त्याने निघालो. कँप सारखा उच्चभ्रु एरीया आणि मध्यम वर्गीयांची भवानीपेठ या मधुन हा रस्ता जातो. पदमजी पोलीस चौकी पार केल्यानंतर थोडंसं निर्जन म्हणता येईल असं ठिकाण आहे, लागुनच फुटपाथ…
शेजारी उकिरडा ! गाडी चालवतांना सहज फुटपाथच्या कडेला नजर गेली तर घाणेरड्या चादरींचा गुंडाळा पडला होता फुटपाथ वर, आणि बाजुला प्लास्टिक कपड्याचे एक मोडके शेड…
गुंडालेल्या चादरीतुन बाहेर आलेला एक पाय मला दिसला… मला कळेचना… गुंडाळलेल्या चादरीतुन पाय ?
मोटरसायकल बाजुला लावली, आणि फुटपाथकडे चाललो… चादरीतुन एक हातही बेवारशासारखा बाहेर पडला होता… मला हे वेगळंच वाटलं, म्हटलं चला पोलीस चौकीत खबर देवु. पुन्हा वाटलं, एकदा बघु तरी काय आहे म्हणुन जवळ गेलो… येणा-या दुर्गंधाने नकोसं झालं… जवळ जावुन घाबरत चादर दुर केली…
चादरीखाली शरीराने काळेठिक्कर पडलेले एक म्हातारबाबा दिसले.. वाटलं चला चौकीत जावु, पण नीट बघितल्यावर जाणवलं, श्वास चालु आहे. ते जिवंत आहेत म्हटल्यावर माझ्याही जीवात “जीव” आला.. नाहीतर पोलीसांनी माझीच “कसुन” तपासणी केली असती…!
10-12 किलो धान्यांनं भरलेलं पोतं जर रस्त्यावर टाकलं तर ते मुटकुळं जसं दिसेल तसा तो चादरींचा बोचका दिसत होता… आणि या बोचक्यात साधारण सत्तरीतला हा “देह”(?).
हात आणि पाय त्या बोचक्यातनं असे बाहेर पडले होते की ते या शरीराचे नव्हेतच…!
जिवंत माणसाच्या शरीराची इतकी विटंबना….?
शेवटी इकडं तीकडं बघत मी चादर ओढुन काढली, आणि हातानं त्या शरीराला हलवलं… कोणतीच हालचाल नाही…
दोन तीनदा जोरात हलवल्यावर मात्र ते खडबडुन जागे झाले… “आं.. आं… कोण आहे?” गडबडीने उठण्याचा प्रयत्न ते शरीर करु लागले…
या बाबांचा अवतार इतका विचित्र की भर दिवसा भिती वाटावी…
काळंठिक्कर डांबर फासल्यागत शरीर, त्यात डावा डोळाच नाही, दुसरा डोळा चुन्यासारखा पांढरा पडलेला… तोंडभर वाढलेली दाढी आणि त्यात मुंग्या, धागे, काटक्या अडकलेल्या… कोणीतरी कागदाचा बोळा करुन फेकुन द्यावं तसं बोळ्यागत झालेलं शरीर….त्यात हा आडबाजुचा फुटपाथ आणि त्यावर आम्ही दोघेच…!
लोकं जनावरांचीही नीट काळजी घेतात, इथं जिवंत माणुस मेलेल्या जनावरापेक्षा वाइट अवस्थेत होता… कँप च्या उच्चभ्रु वस्तीत !
जबाबदार कोण ? शासन…समाज… यंत्रणा…की आपली मेलेली मनं…?
असो…
मी म्हटलं, “बाबा मी डॉक्टर आहे…”
म्हणाले, “अरे वा ! डॉक्टर ? आणि माझ्याकडे ? कसं काय बुवा ? माझ्याकडे काय काम काढलंत?”
मला हे अपेक्षित नव्हतंच… मी सटपटलो…
इतकं विनयपुर्वक, सुसंस्कृत आणि अस्खलीत मराठीतलं बोलणं ऐकुन मी चाट पडलो…
“पाणी घेणार? म्हणजे शेजारी बाटली आहे; त्यातलं घ्या, मला तर दिसत नाही!”
मी उडालोच… इतकं अगत्य…? जणु मी त्यांच्या घरी आलेला पाहुणा होतो…!
मला जाणवलं, हे निश्चित साधं प्रकरण नाही, याला काहितरी वेगळी छटा असणार…
त्या घाणीतच बसलो मांडी घालुन, मी काही आता विचारणार; तर त्यांनीच विचारलं, “डॉक्टरसाहेब, गाव कुठलं?” मी चाचरत बोललो, “मुळ गाव सातारा, आणि…”
अशी जुजबी ओळख करुन दिली.
त्यांच्या एकुण वागणुकीवरुन लक्षात आलं की हा एक सुसंस्कृत माणुस आहे…
एकुण अवतार कसाही असला तरी माझ्या मनात या माणसाबद्दल आदर वाढला न जाणो…!
मी विचारलं, “बाबा हे नक्की काय आहे ? तुम्ही कोण आहात ? इथं कसे ?”
ते काहीही सांगायला तयार नव्हते; पण माझ्या पद्धतीने मी त्यांना बोलतं केलंच…
“मी पुण्यातला…सधन कुटुंबातला. साधा – सरळ पण स्पष्टवक्ता… वावगं आणि खोटं मला खपत नाही… देवाने स्वाभिमान नावाची एक घाणेरडी गोष्ट माझ्यात ठासुन भरली आणि म्हणुन मी इथे असा…!”
“बाबा नीट सांगा ना…”
“डॉक्टर, मी जसा आहे, तशी माझी मुलं निघाली नाहीत…”
“लांड्या लबाड्या करुन दुस-याला फसवणं यात त्यांचा हातखंडा… मी त्यांना रागवायचो, शिव्या द्यायचो, वाइट कामातुन परावृत्त करायचो , पण त्यांना ते आवडत नव्हतं…”
एक दिवस मुलगा म्हणाला, “या घरातुन चालता हो…” मुलाने असं म्हटल्यावर मी तडक बाहेर पडलो… मला हा अपमान सहन झाला नाही… म्हणुन म्हटलं स्वाभिमानानं घात केला… !
“नाही बाबा, याला स्वाभिमान म्हणत नाहीत, हा तुमचा वेडा हट्ट होता, दुराग्रह होता… माफ करा मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण तुम्ही वेडेपणा केलात आणि स्वतःची अशी अवस्था केलीत…”
“नाही डॉक्टर, चुकताय तुम्ही… मी घर सोडण्याची फक्त धमकी दिली होती, पण पुढे जावुन मुलाने हाताला धरुन दाराबाहेर काढलं…”
वाटलं, त्यांची आई त्यांना सांगेल, “अरे आत घे त्यांना… पण नाही… ती काहीच बोलली नाही…”
दाराबाहेर मी दोन तास थांबलो होतो, वाटलं, बायको म्हणेल, “जावु द्या हो आत या, पोरांचं काय मनावर घेता ? पण ती आलीच नाही…”
वाटलं पोरगा येवुन म्हणेल, “बाबा या आत, झालं गेलं सोडुन द्या…”
“पण कुणीच आलं नाही… मी वाट पहात होतो कुणीतरी अडवेल, जावु नका म्हणुन कुणीतरी विनवेल…. पण कुणी अडवलंही नाही आणि विनवलंही नाही…”
“ज्या घरात मी इतका नकोसा आहे त्याच घरात स्वतःहुन मी जावं असं वाटतं तुम्हाला डॉक्टर?”
“घर सुटलं यापेक्षा आपल्याला अडवणारं कुणी आता उरलं नाही ही भावना वाईट असते डॉक्टर…”
“सोन्याची दहा फुटकी भांडी असण्यापेक्षा तडा न गेलेलं मातीचं एक मडकं पुरेसं असतं डॉक्टर…”
“नाती खुप आहेत माझी इथं.. पण ना – ती माझी झाली…आणि ना – ती माझी कुणी होवु दिली…!”
“डॉक्टर, नात्यात हिशोब आला की तो व्यवहार होतो… आणि मला तिथे राहुन व्यवहार नव्हता करायचा…”
मी सुन्न झालो.. बाबांचं मला पटत होतं.. कुणी आपल्याला फेकायचंच ठरवल्यावर आपण तरी बळंबळंच नात्यांची लेबलं लावुन चिटकुन का बसायचं ?
“बाबा, इथं राहुन तुम्ही जगता कसे? एवढ्या घाणेरड्या जागेत राहता कसे? खाता काय? बहुतेक तुमचा पाय उजव्या खुब्यात मोडलाय, म्हणजे तुम्हाला चालता येत नाही…. तुम्हाला दिसत पण नाही… मघाशी तर तुम्हाला पाहुन मला वाटलं….”
“काय वाटलं डॉक्टर? माणुस मेलाय हा असंच ना?” ते हसायला लागले एव्हढं बोलुन….
“तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं आहेत डॉक्टर…”
“बघा डॉक्टर, म्हातोबा प्रसन्न आहे माझ्यावर…. मुलाने मला घरातुन हाकलुन दिलं, पण हा माझा राजमहाल आहे… शेजारच्या मोडक्या शेडकडे पाहुन ते बोलले…. म्हातोबाने मला धृवासारखे अढळ स्थान दिलंय… मला इथुन कुणी उठवु शकत नाही… का ते विचारा डॉक्टर?”
“का बाबा?”
“अहो पाय मोडलाय, उठणार कसा? आणि उठलो तर जाणार कुठे? दिसतंय कुठे मला? म्हणुन म्हटलं धृवासारखं अढळ स्थान…. हा…हा…हा… !!!”
“बाबा, तुम्ही…” माझा आवाज कातर झाला…
तो आवाज ऐकुन चाचपडत माझा हात त्यांनी हातात घेतला, म्हणाले, “डॉक्टर चालायचंच, तुम्ही नका वाईट वाटुन घेवु…”
“या घाणीचं म्हणाल, तर मनात कुजके आणि नासके विचार ठेवणा-या लोकांच्या गर्दित राहण्यापेक्षा ही अस्सल घाण केव्हाही परवडली…”
“माझ्याकडं कुणी फिरकत नाही या घाणीमुळे आणि मला कुणी नकोच आहे माझ्याकडं आलेलं… म्हणुनच अशा घाणीत राहतो मी… बाकी तुम्ही आलात तुमचं कौतुक!”
माझा हात दाबत ते म्हणाले…
तेव्हा रंगहीन डोळ्यातही मला मायेचा रंग जाणवला… इतर कोणत्याही रंगापेक्षा सुखद !
“डॉक्टर एक गंमत सांगु का?”
“हो सांगा की…”
“अहो मी कित्येक वर्षात आंघोळ केली नाही. माझा वास येत असेल, तुम्हाला माझी किळस नाही वाटली?”
म्हटलं “बाबा, आंघोळी केलेल्या लोकांबरोबर मी रोजच असतो, पण आज ब-याच दिवसांनी “स्वच्छ” माणुस भेटला… स्वच्छ माणसाची किळस कसली?”
बाबा पुन्हा हसले…
“बरं मला सांगा डॉक्टर, तुम्ही रस्त्याने चालला होतात, मी कसा दिसलो?”
म्हटलं, “म्हातोबा माझ्यावर पण प्रसन्न आहेच की बाबा, त्यानेच सांगीतलं, फुटपाथकडे बघत बघत जा…!”
कित्येक वर्षात बाबा एव्हढे दिलखुलास हसले नसतील….
“बरं बाबा, आता आपण मुद्द्याचं बोलु… मी तुमच्या पायाचं ऑपरेशन करुन देतो, डोळ्याचे डॉक्टर डोळ्याचं काय सांगतात बघु… आणि शिवाय तुमच्या निवा-याची आणि इतर सर्व सोईंची व्यवस्था मी केली तर चालेल?”
इतका वेळ हातात असणारा हात हातातुन सोडवत ते म्हणाले, “आणि खर्च ?”
“मी बघेन त्या खर्चाचं…”
“ऑपरेशनला घरातलं कुणी तरी लागतं सह्यांसाठी आणि सोबतीला… माझ्यासाठी कोण येणार माझं?”
“बाबा, ऑपरेशनला तुमच्या घरातला म्हणुन माझी सही असेल आणि ऑपरेशनवेळी सोबतीला पण मीच असेन, काळजी नका करु…”
“निवा-याची सोय कशी करणार पण?”
“बघेन मी काहितरी बाबा… तुम्ही फक्त हा “राजमहाल” सोडायची तयारी ठेवा…”
“हे सगळं तुम्ही करणार माझ्यासाठी?”
“हो बाबा, पण मी एकटा नाही, तुमच्यासारख्या परिस्थितीने गांजलेल्या लोकांवर प्रेम करणारे माझ्यासारखे खुप लोक आहेत अजुन या जगात, त्यांच्या मदतीने मी हे सगळं करणार…”
“म्हणजे विखुरलेल्या मोत्यांना एका धाग्यात घेवुन एक माळच तयार करणार म्हणा की डॉक्टर!!!”
“होय बाबा…”
“पण फुकट घ्यायचं मी हे सगळं डॉक्टर?”
“फुकट कुठं बाबा, आशिर्वाद द्यालंच की आम्हाला… त्याची किंमत किती मोठी आहे… आशिर्वाद काय एव्हढा स्वस्त असतो काय?”
“दोन दिवस मलाही लागतील तयारीला बाबा… पण शुक्रवारी 22 तारखेला मी येतोय सकाळी 11 वाजता!”
“डॉक्टर, एक सांगु का? एका पोरानं घरातनं मला बाहेर काढलं आणि माणसातुन उठवलं…. आज तुम्हीही मला या माझ्या घरातुन उठवताय पण माणसात बसवताय…”
बाबांच्या डोळ्यातुन धारा वाहु लागल्या .. माझ्या आवाजाच्या दिशेने आशिर्वाद देण्यासाठी अंदाजाने त्यांनी हात उचलला… जाताना म्हणाले, “बाळा गाडीवरुन सावकाश जा… आपण नीट असलो तरी दुसरा आदळतो येवुन आपल्यावर…!”
मला अर्थ समजला…
म्हटलं “येतो बाबा शुक्रवारी…”
तसे म्हणाले, “माझी काही सोय नाही केलीस तरी चालेल पण येत जा भेटायला… आपलं कुणीच नाही असं म्हणत जगण्यापेक्षा, आता माझं कुणीतरी आहे या भावनेनं आलेलं मरण मला गोड लागेल… आता तुम्ही माझे आहात!”
त्यांच्या या वाक्यांनी माझेही डोळे पाणावले…
मी विचार करत होतो… आज असं कसं घडावं…मी रोजचा रस्ता सोडावा… फुटपाथ कडे बघावं…. कुणी जाणार नाही तीथं जावं…. पुढच्या गोष्टी घडाव्या… त्यांच्या तुटलेल्या पंखांवर मी हळुच फक्त एक फुंकर घालावी… आणि त्या व्यक्तीने सरळ आपल्याला मायेच्या उबदार पंखाखाली मलाच घ्यावं….
असं कसं घडावं आज… मी म्हातोबा या देवाचं नाव प्रथमच ऐकत होतो…
पण बाबांच्या रुपात आलेला तो म्हातोबा तर नसेल ?
Leave a Reply