श्री म्हातोबा प्रसन्न – साठा उत्तराची कहाणी सुफळ संपुर्ण

बाबांचं सगळं ऐकल्यावर ठरवलं, काहिही करुन बाबांना या दलदलीतुन बाहेर काढायचंच… पण कसं ? काही सुचेना… यातच ठोसर मावशींचा फोन आला, बाबांविषयी वाचुन… म्हणाल्या, “फळणीकर काकांचं ‘आपलं घर’ आहे तिकडे नेवु ना रे आपण…”

लगेच फळणीकर सरांसारख्या देवदुताला फोन लावला, म्हणाले, “आणा तुम्ही त्यांना गुरुवारीच, मी सांभाळेन त्यांना माझ्या वडिलांप्रमाणे…”

मी भारावुन गेलो… मन हलकं झालं… मनात म्हटलं Yessss … बाबांना घर मिळणार…

गुरुवारी त्याना घेवुन जायचं ठरलं… पुढच्या तयारीला सुरुवात केली…

पण गुरुवारी न्यायचं कसं? गुरुवारी 15 लोकांची अगोदरच डोळ्यांची अपॉइंटमेंट… मी दुपारी 12 वाजता फ्री होणार… बाबांना नेणार कधी… ?

म्हटलं बघु… म्हातोबा असतीलच प्रसन्न तर होईलच काहीतरी नक्की…

पहिला फोन लावला भुवड ताईंना, म्हटलं “ताई, यांना आपल्याला न्यायचं आहे पण अशा घाणेरड्या अवस्थेत भिक्षेकरी म्हणुन नाही, तर सन्मानानं एक माणुस म्हणुन…”

ठरलं… रस्त्यावरच त्यांना आंघोळ घालायची… काय काय लागेल…? बादली, मग, टुथपेस्ट, ब्रश, साबण, टॉवेल…

दुसरा फोन पवनला… “पवन यार, आपल्या बाबाला नवे कपडे पाहिजेत… एक मस्त पांढरा नेहरु शर्ट आणि पायजमा … प्युअर कॉटन किंवा रेशमीच पाहिजे…”

हिंदु परंपरेत, मृत व्यक्तीस रस्त्यावरच आंघोळ घालुन नवे कपडे घालतात…

आम्हीही हेच करणार होतो, पण “मेलेल्या” माणसाला पुन्हा माणसात आणण्यासाठी …

समाजातल्या “मेलेल्या मनांना” अंतर्बाह्य हलवण्यासाठी…!

बुधवारची रात्र विचारात गेली… आम्ही हे करणार आहोत याविषयीची सर्व माहिती पोलीसांना सांगुन करायचं मी ठरवलं…

न जाणो उद्या कोणी वाईट अर्थ काढु नये… बुधवारचा संपुर्ण दिवस आणि रात्र डोळेतपासणी आणि पोलीसांना द्यायची कागदपत्रं जमवण्यात गेला…

डोळेतपासणीतुन गुरुवारी दुपारी 12 ला फ्री झालो आणि गडबडीने निघालो बाबांकडे …

पण सिंहगड ला बाबांना न्यायचं कसं ? रिक्षाची धडधड झेपेल का बाबांना… आधीच उजव्या पायाचे तीन तुकडे झालेत त्यांच्या… काय करायचं…?

पुन्हा म्हातोबाच आला असावा धावुन… ठोसर काकांचा नेमका याच वेळी फोन आला, “अरे अभिजीत, तु कसा नेणार आहेस त्यांना?” मी चाचरत बोललो, “बघु ना काका… अजुन तरी काही सोय नाही… पण…”

“पण बिण काही नाही अरे, माझी न्यु ब्रँड गाडी आहे… ती कशासाठी आहे…? मी आणि तुझी मावशी येतो 2 ला दुपारी, तयार रहा बाबांना घेवुन…”

तिसऱ्या मिनिटाला, नंदिनी ताईंचा फोन… “अरे, तु माझी पर्सनल गाडी घेवुन जा… मी बघते माझं काय करायचं ते… तुझा दिवस महत्वाचा रे…!”

मी काळा आहे का पांढरा हेही माहित नसतांना ताई, काका, मावशी ही नाती मला मिळाली…

रक्ताचं कोणतंच नातं नाही आमच्यात … तरीही मग रक्ताचीच नाती अशी का वागतात परक्यांसारखी…

रक्ताचा ब्राइट रेड कलर हल्ली “काळसर” का होत चाललाय…?

रक्तातलं हिमोग्लोबीनचं प्रमाण सांगणारी मशीन्स आहेत, पण त्यात माया आणि जिव्हाळा यांचं प्रमाण किती? हे सांगणारं मशीन कुठं मिळेल काय…?

असो…

तर, असं करत पहिल्यांदा पोचलो एकदाचे, बाबा असलेल्या फुटपाथ शेजारच्या पोलीस चौकीत… आम्ही करणार असलेल्या बाबींची त्यांना कल्पना दिली…

वॉकी टॉकी च्या धडधडणा-या आवाजातुन वेळ काढुन, जमेल तसं त्यांनी बराच वेळ ऐकुन घेतलं… अतिशय “महत्त्वाचे” प्रश्न विचारले आणि शेवटी ब-याच वेळाने सांगितलं की, “हि चौकी आहे, इथं आमी काय कागदपत्रं घेत नाय, तुम्हाला समर्थ पोलीस स्टेशनला जावुन वरिष्ठांना भेटावे लागेल…”

खुप वेळ गेला… पण इलाज नव्हता, पोलीसांना सांगुन हे करणं सर्वार्थाने सोइचं होतं…

आमची वरात निघाली समर्थ पोलीस स्टेशनला…

मनात म्हटलं, वरिष्ठ आता विचारणार – “कुणी या भानगडी करायला तुमाला सांगितलेत? – आमाला का पत्र देताय? – कशाला आजुन आमची कामं वाढवताय? – गप घरात बसायचं सोडुन कशाला धुणी धुत बसलाय? – दहा मिसींगच्या केसेस चा आजुन पत्ता नाय, तुमी आजुन कशाला हे झेंगट आमच्या मागं लावता?”

सग्गळ्या प्रश्नांची उत्तरं मनात घोळवुन धडधडत्या मनाने समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांसमोर उभा राहिलो…

“हां बोला…” अत्यंत जरबेने विचारलेल्या वरिष्ठांच्या या आवाजाने इतका वेळ पाठ केलेली सगळी उत्तरं विसरलो…

मी कोण – काय करतो – माझा हेतु अशा खुप गोष्टी मी बोललो…

साहेब टेबलवर दोन्ही हात जुळवुन, त्यावर हनुवटी टेकवुन, पुढं झुकुन अत्यंत तन्मयतेने माझं ऐकत होते…

माझीही भीड चेपली… मी भडाभडा बोलत राहीलो… साहेबांचा चेहरा आणि डोळे विरघळत चाललेले मला स्पष्ट दिसत होतं… जणु बर्फ वितळत होता… माझं झाल्यावर ते टेबलाबाजुने उठुन माझ्याजवळ आले, तसा मीही उठलो… झट्कन मला जवळ घेत म्हणाले… “ग्रेट माय बॉय… मी यात तुला कशी मदत करु? माझ्याकडुन काय हवंय तुला…?”

अत्यंत मायेनं माझं कौतुक करत राहीले ते… ममतेने निथळणारा तो चेहरा पाहुन मी अवाक् झालो… मी झट्कन वाकलो, पाय धरले, म्हटलं “काय द्याल सर…? फक्त एक आशिर्वाद द्या…!!!”

माझं पोलीस स्टेशनचं काम तर विनासायास झालंच, पण मला यांच्या रुपात देव दिसला …
शनीसारखा वरुन कडक, शंकरासारखा भोळा पण प्रेमळ… आणि म्हणुनच मी मंदिरात जात नाही…!

एक मोहिम फत्ते करुन आम्ही निघालो बाबांकडे… यांना स्वच्छ करणं अत्यंत महत्वाचं…

पण कसं…? पाय मोडलेला… दिसत नाही… घाण तर इतकी, आणि कोणी विश्वास ठेवणार नाही पण 15 वर्षात ते एकदाही उठुन बसले नाहीत… उठवुन बसवणार कोण? स्वतःच्याच मल मुत्र विष्ठेत कायम झोपुन असणारे… यांची जागेवरच केलेली विष्ठा साफ तरी करणार कोण? झाडुवाल्या बाया वासामुळे इकडे फिरकत नाहीत, ते असतात तो एरीया टाळुन लोक पुढे जातात आणि बाबा स्वतः करु शकत नाहीत…!

त्यांच्याच विष्ठेने त्यांचं सर्व शरीर माखलं होतं… आम्हाला ते साफ करायचं होतं…

आम्ही एकमेकांकडे पाहिलं… आता म्हातोबाने बहुतेक आमची परिक्षा घ्यायला सुरुवात केली जणु…!

बाजुला एक पोलीस वसाहत आहे – भुवड काका, ताई, पवन आणि मी बादल्या घेवुन निघालो पाण्यासाठी या वसाहतीत… आत जाताच 4-6 तरुणांचा गट बनियन आणि हाफ पँट घालुन हास्यविनोद करत असलेले दिसले. जवळ जावुन त्यांना सर्व सांगितलं आणि म्हणालो, “आम्हाला फक्त पाणी द्या…”

त्यांच्या डोळ्यात आम्ही करणार आहोत त्या गोष्टीवर विश्वासच बसेना…

शेवटी म्हणाले, “तुम्ही जा पुढे त्या जागेवर…आम्ही पाणी आणुन देवु…”

आमच्या मागुन प्रत्येकाने आपापल्या घरातुन दोन दोन बादल्या पाण्याच्या स्वतः वाहुन आणल्या… आम्ही शरमलो… आभार कसे मानावेत या पोरांचे असं आम्हाला झालं…

मी मग त्यातल्या अगदी तरुण मुलाचा हात हातात घेवुन म्हटलं, “थँक्स मित्रा, आम्ही खुप आभारी आहोत यार…! काय करता तुम्ही पोरं…?”

तसे म्हणाले, “आम्ही सर्व PSI (पोलीस सब इन्सपेक्टर्स) आहोत…”

मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं… एकेरी उच्चाराबद्दल हात जोडुन माफी मागीतली…

तसे जोडलेले हात तसेच धरुन ते म्हणाले, “आत्ताचं हेच नाही, इथुन पुढचंही जे काम करणार आहात त्यांत आम्हाला सामावुन घ्या…”

भुवड काका आणि ताईंना नमस्कार करुन आले तसे ते गेलेही…

आम्ही त्यांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो…
त्यांच्यातल्या देवदुताला मनोमन सॅल्युट केला…

माणसाच्या मनाचे किती कंगोरे असतात…! जितक्या वाइट प्रवृत्ती आहेत, त्यापेक्षा जास्त चांगलं भरलंय या समाजात, आपला हेतु मात्र निर्मळ हवा… हे पुन्हा एकदा पटलं…

आता आम्ही बाह्या सरसावल्या आणि भुवड ताईंनी आपला पदर खोचला…

भुवड काकांचं वय 70 आणि भुवड ताईंचं 65… उत्साह मात्र पवन आणि माझ्या दामदुप्पट…

पहिला मग पाण्याने भरला या माउलीने दुसरा पवनने…

एखाद्या लहान बाळाला घालतात तशी चोळुन चोळुन साबणाने आंघोळ घालायला सुरुवात केली आम्ही…

एखाद्या आईप्रमाणे भुवड ताई अंग अंग चोळुन बाबांना आंघोळ घालत होत्या… खरंच प्रत्येक “बाई” ही प्रथम “आई” असते…!

बाबा आता नुकत्याच न्हावु घातलेल्या शंकराच्या पिंडीसारखे दिसत होते… निर्मळ आणि पवित्र!!!

त्यांनाही आमच्याविषयी काहीतरी बोलायचं होतं… बोलले काहीच नाहीत पण आम्हाला ते समजलं…

आता बाबांना मस्त शुभ्र कपडे घातले… मोडलेल्या पायातुन पायजमा घालणं हेच दिव्य होतं आमच्यासाठी …!

पण काही असलं तरी, बाबा बाकी छान दिसत होते, निरभ्र आकाशासारखे… आम्ही एकमेकांकडे पाहुन समाधानाने हसलो…

मला एकदम आठवलं, म्हटलं, “पव्या, यार इतकी घाण असुनही मला काहीच वास नाही आला रे… तुला आला का?” तो ही म्हणाला, “नाही…!”

अरे असं कसं झालं असेल…?

आणि मग जाणवलं, आपण जेवुन उरलेलं अन्न असतं त्याला “खरकटं” म्हणतो, पण पुजेनंतर जे उरतं त्याला “निर्माल्य” म्हणतात…

वास येतो खरकट्याचा… निर्माल्याचा नाही… आपली ही पुजा आहे… आणि हे निर्माल्य आहे , त्याचा घाणेरडा वास येईलच कसा?

सगळं आवरलं, बाबांनी अडवलेला फुटपाथ पुन्हा आम्ही घासुन पुसुन पाण्यानं धुतला, साफ केला…

बाबांच्या भिकारी असण्याची कोणतीही खुण मला मागे ठेवायचीच नव्हती रस्त्यावरसुद्धा…

शेवटी ठोसर काका आणि मावशींना गाडी घेवुन येण्यासाठी विनंती केली आणि बाबांना म्हटलं, “बाबा मजा आहे तुमची, नवीन गाडीत बसुन जाणार…”

तसा बाबांचा धीर सुटला… म्हणाले, “माझ्याकडे काही नंबर आहेत… बायको आणि मुलाचे… एकदा बघा ना फोन लावुन,…” मी ही हबकलो…

2002 ला घर सोडलंय… 15 वर्ष झाली रस्त्यावर… कुणी आलं नाही भेटायला… पण मन कसं असतं… पुन्हा रक्ताच्याच नात्याकडे, बायको – मुलाकडे ओढ घेतं…

त्यांच्यातला बाप आता जागा झाला… आमचेही डोळे ओलेचींब…

म्हटलं, “बाबा, हे नंबर कुणी दिले तुम्हाला?” तर म्हणाले, “परवा नात्यातले एक जण आले होते, त्यांच्याकडुन घेतले…”

मी फोन लावला… एका माणसाने उचलला, म्हटलं, “असं असं आहे… ऑपरेशन वैगेरे सर्व गोष्टी मी करेन , तुम्हाला कसलाच खर्च नाही… फक्त दोन वेळचं जेवण आणि प्रेम द्या…”

पलीकडुन आवाज आला, “ओ, त्याला तुम्ही न्या, जाळा नायतर पुरा… इकडं पुन्हा फोन नाय आला पायजेल”

आवाजातली गुर्मी वाखाणण्यासारखी होती…

तेवढ्याच नम्रपणे मी त्याला म्हटलं, “हिंदु धर्मानुसार जाळायचा अधिकार तुमचा आहे, पण स्वखुशीनं तुम्ही तो मला दिलात, त्याबद्दल मी आभारी आहे… आता या नात्यानं तुम्ही माझे भाउ झालात. आता भाउ म्हणुन तुला सांगतो की तु यांना अगोदरच जाळुन मारलंय, मी जाळण्यासारखं काही शिल्लकच ठेवलं नाहीस…”

पलीकडुन फोन कट्… आणि बाबा मला विचारताहेत, “लागला का फोन? घरी ये म्हणला का पोरगा?” मी काय उत्तर द्यावं…?

मी म्हटलं, “बाबा राँग नंबर होता, चुकीचा नंबर लिहुन दिलाय… जावु द्या ना…”

त्यातुनही बाबा बोलले, “हां… राँग नंबर आहे म्हणुनच, नायतर याच घरी म्हणला आसता माझा पोरगा…!”

काय बोलु मी? किती प्रेम आणि विश्वास? इतकं सारं घडुनही?

गाडी आली, बाबांना गाडीत बसवलं… ठोसर काका आणि मावशी लहान लेकराला कडेवर घेवुन जावं तसं बाबांना घेवुन गाडी चालवत होते…

शेवटी आलो आम्ही “आपलं घर” ला… घर कसलं मंदिरच ते… विजय फळणीकर सरांनी हसतमुखाने स्वागत करुन बाबांची काळजी करु नका असं सांगीतलं …

संस्था पाहिली… मुलांनी सोडलेल्या आया आणि आयांनी सोडलेली मुलं, या एकाच छताखाली नांदतात… ज्यांना आई नाही त्या मुलांना आई मिळते … ज्यांना मुलांनी टाकुन दिलंय त्या आयांना इथं मुलं मिळतात…

आणि या सगळ्यांचा “बाप” बनलाय हा “विजय फळणीकर” नावाचा माणुस…!

मी कथेत वाचलं होतं या देवाने याचा अवतार घेतला, त्या देवाने ह्याचा अवतार घेतला… आधी मला हे खोटं वाटायचं… पण नाही, देव असेलच तर आत्ताही त्याने या युगात अवतार घेतलाय हे मला पटलं… नाव आहे “विजय फळणीकर

या माणसाने काय भोगलंय हे समजुन घ्यायचं असेल तर त्यांच्यावर आधारीत पुस्तक वाचा… “पराजय नव्हे विजय…!” मग मी बोलतोय याची सत्यता पटेल…!

यांचंही काम माझ्यासारखंच तुमच्या मदतीवर चालतं…

बाबांना आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी या देव माणसाने घेतली आहे… विनामुल्य…!!!

मी लहानपणापासून ऐकलंय जीवंतपणी स्वर्ग दिसत नाय आणि देव पण काय भेटत नाय…

झुठ आहे हे… माझ्यावर विश्वास ठेवा, खालील पत्त्यावर जा, स्वर्गही पहा आणि देवाचं दर्शनही घ्या…

विजय फळणीकर
आपलं घर
सिंहगड पायथा, गोळेवाडी, हॉटेल अमृतेश्वर पासुन डावीकडे, पुणे
8275695452
9850227077

या बाबांना तर आपलं घर मिळालं …

मी आणि माझ्याबरोबरच्या लोकांनी माझंच आहे म्हणुन सगळं केलं… पण हे कधी थांबणार आहे…?

इकडं दगडाच्या देवीला हार घालायचा आणि ख-या बाईवर बलात्कार करायचा नाहीतर हुंड्यासाठी जाळायचं…

शंकराच्या पिंडीसमोरच्या दगडी नागावर दुध ओतायचं आणि ख-या सापाला ठेचुन मारायचं…

मेलेल्या बापाच्या श्राद्धाला गावजेवण घालायचं आणि जिवंतपणी बापाला हाकलुन द्यायचं…

अंबाबाईला लायनीत थांबुन साडीचोळीचा आहेर करायचा आणि स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात ठेवायचं दुस-याच्या दयेवर जगण्यासाठी…!!!

एकाच दिवसात, परिस्थिती एकच असतांना त्या त्या परिस्थितीत माणसं कशी वागली…? काही खुप चांगली काही खुप वाईट…

का हे असं? उत्तरं आहेत? सापडल्यास कळविणे…

म्हातोबाच्या चरणी अर्पण करेन…!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*