पुर्वी भिक्षेकरी हा विषय कोणी बोलत नव्हतं आणि कोणाला या समाजाविषयी काही देणं घेणंही नव्हतं! परंतु हे काम मी चालु केल्यानंतर आता किमान शासन आणि समाज स्तरावर या समाजाबद्दल चर्चा तरी होवु लागली आहे… एक प्रकारची चळवळ हळुहळु सुरु झालीय, जनजागृती होत आहे… आपणांशी या माध्यमातुन संवाद साधण्याचा माझा मुळ हेतु तोच आहे…! आणि संथपणे का होईना पण ते साध्य होतंय, याचा मला विशेष आनंद आहे…!
आपल्या आधाराने आणि मदतीवरच हे काम मी करत असल्यामुळे निश्चितच याचं श्रेय आपणांसच जातं… मी फक्त पोस्टमन प्रमाणे योग्य त्या गोष्टी योग्य पत्त्यावर पाठवतोय…!
आपणांस माहीती आहे कि, भिक्षेक-यांना वैद्यकीय सेवा देत देत त्यांचा ब्रेन वॉश करणं, लाचारी काय असते त्यांना समजावुन सांगणं, भिक मागण्याची लाज वाटावी असं वातावरण तयार करणं, आणि सर्वात शेवटी त्यांना सन्मानाने काम करायला प्रवृत्त करणं हा माझा मुळ हेतु आहे…!
यासाठी मी त्यांना खुप उदाहरणं देत असतो – बाबांनो, आपल्याला साधी सावली तयार करायची असेल तरी उन्हात उभं रहावं लागतं… पायाचा ठसा उमटावयचा असेल तर आधी चिखलात पाय बरबटुन घ्यावे लागतात… या जगात फुकट काही मिळत नाही, तेव्हा चला काम करु सन्मानानं… दुस-याच्या थुंकीवर आपण आपली तहान का भागवायची…?
हे विचार त्यांना पटतातही… त्यांचं मनपरिवर्तन होत असतांनाच कोणीतरी येतं आणि जेवण देवुन जातं, कोणी कपडे देवुन जातं, कोणी काय कोणी काय देवुन जातं… आणि या जगात फुकट काही मिळत नाही हे माझं म्हणणं पाटिवरची अक्षरं पुसल्यागत खोडुन काढलं जातं…
कुठलाही जीव भुकेनं तडफडत असेल तर त्याला जेवु घालणं ही माणुस असल्याची साक्ष आहे, ते करावंच… परंतु एखाद्याला रोज असं फुकट घ्यायची सवय लावणं, त्याला परावलंबी करणं, दुस-यानं दिलं तरच ते घेणं अशा सवयी लावणं हे माणुसकीचं निश्चित लक्षण नाही…!
मी रस्त्यात त्यांच्यात बसुन तत्त्वज्ञान सांगत असतो… 12-15 भिक्षेकरी बसलेले असतात, एखादा तालेवार येतो, 10 रुपयांची नोट फडकवुन सांगतो… वाटुन घ्या सर्वांनी… 10 रुपये 12-15 जणांत वाटायचे कसे? 60 -70 पैसेसुद्धा प्रत्येकी येत नाहीत… पण तेव्हढ्यासाठी एकमेकांची डोकी फुटतात… तो तालेवार निघुनही जातो ऐटीत…
आणि मी बसतो त्यांची भांडणं सोडवत आणि फुटलेल्या डोक्याची ड्रेसींग करत…
मला रस्त्त्यात ड्रेसींग करतांना बघुन मग लोकं म्हणतात…वा…वा… किती सेवा करतोय हा डॉक्टर…?
काय उपयोग आहे या माझ्या असल्या सेवेचा?
यामुळे माझा वेळ त्यांच्याशी चांगलं चुंगलं बोलण्यापेक्षा भांडणं सोडवण्यात आणि जखमांची मलमपट्टी करण्यात जातो… हाच वेळ मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी घालवला असता ना…?
खरंच आपण दान देतोय का? ज्यात मारामा-या होतील ते दान असतं का? की आपण आपला इगो सुखावत असतो फक्त…
लोकांच्या या खोट्या इगोपायीच नविन भिक्षेकरी तयार होत आहेत… आज 31 लोकांना काम दिलंय… लोकांनी हा आपला इगो सोडला असता तर मी आजपर्यत 3100 भिक्षेक-यांना मुक्त करु शकलो असतो…!
पण नाही, लोक द्यायचं थांबणार नाहीत, तोपर्यत कुणीच काही करु शकत नाही… हे असं होतंय मी तांब्या तांब्याने पाणी टाकुन टाकी भरतोय पण कुणीतरी येवुन टाकीचा नळ खालुन सोडतंय …टाकी भरणार कशी?
तेव्हा कृपया दुस-याला परावलंबी करेल असं दान देवु नका, फुकट खायची सवय लावुन त्यांना अक्षरशः भिकेला लावु नका…
मग काय करता येईल आपल्याला…???
एखाद्याशी बोला… संवाद वाढवा… नातं तयार करा… त्याच्या मनात भिक मागण्याची लज्जा उत्पन्न करा… घरात / सोसायटीत एखादं काम द्या पगारी… व्यवसाय करता येतील अशा वस्तु द्या… वजनकाटे , तयार चहा विकण्यासाठी साहित्य, वाती विकणे, फुलं विकणे, बुट पॉलिश असे अगणित व्यवसाय आहेत ज्यात तुम्ही सहज मदत करु शकता…
काही द्यायचंच असेल तर मानानं काम द्या…
यातलं काहिच जमणार नसेल तरी हरकत नाही फुकटची भिक देवु नका…
लक्षात असुदे, आपण अशा भिक देण्याने पुढच्या पिढीवर संस्कार करतोय की, कष्ट नाही केले तरी चालतात…
तोंड वेडंवाकडं करुन गयावया करुन भिक मागणं हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे हा मेसेज आपल्या मुलांवर व्हायला नकोय…
बघा पटतंय का… ?
ज्यांना माझ्या कामात मदत मला करायची आहे त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी जर कोणाला अशी भिक दिली नाही तर ती खुप मोलाची मदत ठरेल माझ्यासाठी…!
कराल ना अशी मदत…? प्लीज… माझी हात जोडुन विनंती आहे…!!!
Leave a Reply