ही घटना बरोब्बर मागच्या शनीवारची, दि. २० जाने. २०१८…
एक मावशी आहे… “शारदा” नावाची… भीक मागते… नाव शारदा, पण पुर्ण अडाणी… इतकी की हाताची बोटंही मोजता येत नाहीत.. आईवडिलांनी काय ठरवुन नाव ठेवलं असेल?
तर या शारदा मावशीचं डोळ्यांचं ऑपरेशन केलंय… तीला पहायला, पुढची औषधं द्यायला २० तारखेला गेलो होतो… तपासतांना लक्ष गेलं…
एक अत्यंत देखणी, नाकीडोळी नीटस, वीशीची मुलगी शारदा मावशीच्या मागेपुढे करत होती…
साहजीकच मी विचारलं, “मावशे ही कोण गं?”
ती बोलली, “माजीच पोरगी हाय… लक्षुमी नाव हाय तीजं…”
मी या “लक्ष्मीला” न्याहाळलं… या लक्ष्मीच्या अंगावर कसेबसे अंग झाकतील एवढेच कपडे होते…
एक “शारदा” अडाणी आणि दुसरी “लक्ष्मी” भिकारी… काय आयुष्याची थट्टा!
मी गंमत म्हणुन हाक मारली, “ए लक्ष्मी… अगं ए…”, तीनं लक्ष दिलं नाही माझ्याकडे…
शारदा मावशी मला म्हणाली, “बाळा, ती तुजा आवाज ऐकनार नाय, ती भयरी हाय… आन ती “ओ” पन नाय देनार कारन मुकी पन हाय ती…”
मी मनात म्हटलं, “खरंच लक्ष्मी मुकी आणि बहिरी असते…!”
मला वाईट वाटलं… म्हटलं, “कसं गं मावशी, हिला तु एव्हढी मोठी केलीस… तुजं कौतुक बरं का… बहिरी मुकी असुन तीला छान सांभाळलंस तु!”
तर शारदा मावशी म्हणाली, “कुटं मी माजं प्वाट फाडुन जलमाला घातलंया तीला… दुस-याचं ल्येकरु त्ये…”
मी बुचकळ्यात पडलो… म्हटलं, “आगं तुजी ल्येक हाय ना ही? आसं का म्हणती मग?”
शारदा मावशीला एक पाय नाही, खुरडत चालते ती… तशीच खुरडंत माझ्या अजुन जवळ आली म्हणाली, “आभी, तुला म्हायीत हाय ना माज्या लगीन झालेल्या पोरीला एडस झाला व्हता… ती पोरगी माजी मेली…”
“ही जी लक्षुमी हाय ना ती माजी पोरगी नाय… हिचं लगीन झालं हुतं लहानपनी लवकर… १८ व्या वर्सी हिला पोर झालं आनं दारुड्या नव-यानं तीला दिली सोडुन…”
“अशीच भीक मागताना मला रस्त्यावर दिसली… मी म्हणलं आज माजी पोरगी जित्ती आसती तर आशीच आसती आन आसाच नातु मला बी आस्ता… मंग काय आनली मी तीला घरी…”
मी म्हनलं, “तु भीक मागायची न्हाय लक्षुमी, आजपस्नं मीच तुजी आई… तु भयरी हायेस, मुकी हायेस… आसुंदे… मी हाय तुला… आता तुच माजी लेक…! एक गेली… आन ही दुसरी पावली!”
मंग मी तीला मुकबधीर शाळेत घातली, तीला शिकीवली…
तीनं पुणे बोर्डाची १० ची परिक्षा दिलीय आन नंबरात पास पन झालीया…
मी म्हनलं, “शाळा शीकली तर कवातरी नशीब उजडल आन कुटंतरी काम मिळंल… मी भीक मागुन शिकवलं तीला, पन तीला कदी रस्त्यावर न्हाई आनली भीक मागायला… तीजा पाय दुकतोय म्हणुन तुला दावाय आनली फकस्त आज…”
मी आश्चर्याने पहात राहीलो… “शारदा” नावाची ही बाई अडाणी नव्हती,… ही होती एक सुजाण आई… आणि नावाप्रमाणेच शारदा आई !
हिला भिकारी कसं म्हणु? रस्त्यावरचं पोर हिनं जीवापाड सांभाळलं… भीक मागुन शिकवलं… लोकांच्या नजरेतुन वाचवलं… खरंच मातृत्व हे मातृत्वच असतं… मी मनोमन नमस्कार केला तीला…
मी तीचे हात हातात घेतले, म्हटलं, “मावशी तु भीक मागतेस आणि हिला सांभाळतेस? ते पण दुस-याचं लेकरु? कसं गं?”
म्हणाली, “आभी, आरे दुस-याचं कुठं हाय हे? देवानं मला तीला सांभाळायला दिलंय… देव परिक्षा बगतो आपली… दिवुन पन बगतो आन घिवुन पन बघतो…”
“आपल्यापुरतं बगुन चालत नसतंय कदी बाबा… नेहमी आपुन दुस-याला हात द्यावा… आन आपुन कुनाला असा हात दिला ना तर एकाचं दोन हात हुत्यात… दहाची वीस बोटं हुत्यात… कुणाला हात दिला तर आपली बी ताकद वाढती आनी दुस-चीबी… जगायला ताकद मिळती आपल्याला बी आन दुस-याला बी…!”
तत्त्वज्ञानाच्या PHD मध्ये १०० पानं वाया घालवुनही समजलं नसतं हे तत्त्वज्ञान ही अडाणी “शारदा” मला रस्त्त्यात सांगत होती…
वर वर गरीब दिसणारी तीची मानलेली ही मुलगी “लक्ष्मी” शारदा सारखी माय मिळवुन ख-या अर्थानं श्रीमंत होती…!
मी म्हटलं, “मावशे ही तुजी लक्षुमी काम करंल का?”
शारदा मावशी म्हणाली, “व्हय, म्हणुन तर शिकवली तीला… बग की तुज्या बहिणी चं कायतरी…!”
शारदा मावशीच्या या वाक्यानंतर माझ्याही डोक्यात चक्रं सुरु झाली… काय करावं या लक्ष्मीचं काही सुचेना… आणि झटकन आठवलं…
माझ्या परिचयात एक रामेश्वरी जाधव नावाच्या मॅडम आहेत…
ही एक बाई एकटी मुकबधीर मुलामुलींसाठी निवासी शाळा चालवते… रस्त्यावरच्या अनाथ मुलांना आणुन सांभाळते…
शाळेचा खर्च परवडत नाही म्हणुन स्वतःचे सर्व दागिने विकलेत आणि लंकेची सिता म्हणुन स्वतःला मिरवते…
“माझी रस्त्यावरची मुकी बहिरी अनाथ पोरं हेच माझे दागिने”, असं अभिमानानं सांगते…
काय लोकं असतात ना? नावातच “राम” आणि “ईश्वर” ही,…
मी या रामेश्वरी मॅडमला ८००७७०८२८२ या नंबरवर फोन लावला, म्हटलं, “मॅडम, तुमच्या या कामात माझ्या या बहिणीला सामिल करुन घ्याल का? काहीतरी काम द्या… पोरगी दहावी पास आहे… तुम्हाला हरत-हेने मदत करेल, शिवाय स्वतः मुकबधीर असल्यामुळे तुमच्या इतर मुलाबाळांत पण छान मिसळुन जाइल… प्लिज…!”
या मॅडम स्वखर्चाने सगळं चालवतात, त्यात त्यांना आणखी बोजा नव्हता द्यायचा मला… पण काय करु…? पर्याय नव्हता… शेवटी मी ही एक भिकारीच की…!
पण रामाच्या अवतारातील या इश्वरीने सांगीतलं, “मी २७ तारखेला, शनीवारी येते… आणि काय ते बघु…”
त्याप्रमाणे मी, शारदा मावशी आणि लक्ष्मी ला आज २७ तारखेला बोलावुन घेतलं…
रामेश्वरी मॅडम ठरलेल्या वेळेनुसार आपल्या यजमानांसह आल्या… बराच वेळ आम्ही लक्ष्मीशी खाणाखुणांनी या हृदयीचे त्या हृदयी बोललो…
ब-याच वेळाने रामेश्वरी मॅडम म्हणाल्या, “सर आजपासुन ही मुलगी माझी… मी हिचं सर्व काही करणार… नोकरी, कपडालत्ता, पुढचं शिक्षण आणि जमलं तर लग्नही…!”
या त्यांच्या वाक्यांनंतर शारदा मावशी पुन्हा पाय खुरडत माझ्याकडे आली… गळ्यात पडुन रडली, म्हटली, “खरंच तु भाउ तीचा आभी,…” मी ही डोळ्यातलं पाणी हटवत म्हटलं, “आणि तु तीची खरी आई…जन्माला न घालुनही मुलीसारखं जपणारी!”
लक्ष्मी आता रामेश्वरी मॅडमच्या बारामती जवळच्या क-हावागज इथल्या मुकबधीर निवासी शाळेत कामाला लागणार…
आमची लक्षुमी आता रामेश्वरी मॅडमच्या गाडीत बसली जाण्यासाठी… तीला काहितरी बोलायचं होतं… शब्दांऐवजी हुंदका आला…
मी कागद आणि पेन समोर ठेवला तीच्या… तीने लिहिलं… “दादा मला भेटायला तु आणि आई तीकडे याल ना?”
मी त्याच कागदावर फक्त “हो” एव्हढंच लिहु शकलो…
बोलुच शकत नव्हतो बोलायला कंठ दाटला होता… आणि लिहु पण शकत नव्हतो काही… कारण एक हात शारदा मावशीनं पकडला होता… आणि दुसरा हात या “लक्षुमी” नं… मग लिहावं तरी कसं माणसानं कितीही मनात असलं तरी…!
दि. २७ जानेवारी रात्री ९.४५
Hello Doctor,speechless no words. Only can say there can be no one like Dr. Abhijit Sonawane.People try to copy u but u were, are an always be one an only one.No replica for u. All the best an God Bless! A successful person in ur mission. Whatever u r doing is no less.