राजगी-याची चिक्की

ही शारदा मावशी… हिची माझी भेट साधारण ८ – १० महिन्यापुर्वीची … .हो …हीच ती… जीने स्वतः भीक मागुन दुस-याची मुलगी सांभाळली… “लक्ष्मी”..! आणि तीच्या पुनर्वसनासाठी हात पसरले…!

तर हिला डाव्या मांडीपासुन पाय नाही. म्हणायला एक कृत्रिम पाय लावलाय, पण तो असुन नसुन सारखाच!

हा कृत्रिम पाय पण तुटला होता… आणि बरोबर मांडीला जीथं फिट केलाय तीथेच तो मांडीत रुतुन जखमा झालेल्या…

मी येवुन या जखमा साफ करायचो, सेप्टिक झाल्यामुळे घाणेरडा वास यायचा जखमेतुन,… ड्रेसींग करतांना म्हणायची, “आबी, आरं कशाला करतो आसलं घाणीचं काम? मरुदे मला, मेली तरी चालंल, आता काय राह्यलंय माझं…?”

जखमा नीट भरल्यावर कधीतरी हिला नविन कृत्रिम पाय बसवुन देईन हे माझं स्वप्न..!

ड्रेसिंग करताना होणाऱ्या संवादातुन कळलं…  हिला एक ३५ वर्षाचा मुलगा आहे, ३० वर्षाची मुलगी आहे…  मुलगी मुकी आणि बहिरी…

मी म्हणायचो, “भीक कशाला मागते? पोरांना सांग की कामं करायला…”

ती म्हणायची, “करत्यात दोगं कामं त्यांच्या पोटापुरतं, पन त्ये जे कमावत्यात त्यात त्यांचंच भागत न्हाई… माजा कशाला आजुन त्रास त्येनला…? मग मी माज्यापुरतं मागुन खाते, पोरांवर भार नको…”

“अगं पण, पोरांचं कामच आहे, जे मिळेल त्यात भागवायचं… भीक कशाला मागते?”

“जावु दे बाळा, काय सांगु? आता तर मुलगा म्हणतो, घर सोडुन जा… त्याच्या बायकुला माजं नाही पटत काही…”

“भीक मागनं निमित्त हाय, मी हितं येते वेळ काडायला… घरी थांबलं की सुन कायतरी कारन काडुन भांडती… नव-याला म्हनती, म्हातारी मरत पन नाय… त्या दोगांची भांडनं व्हत्यात माज्यावरनं…  परवा तर घरच सोडुन गेली…  आता मी मरत न्हाय यात माजा काय दोष रं बाळा…  पायाला जखमा होवुन शेप्टिक होवुन मी मेले तर बरं हुयील आसं वाटायचं…  पन देव बग कसा हाय … तुला पाटवलं, जखमा ब-या करायला…  म्हणजे आता शेप्टिक होवुन मरायचं पन माज्या नशिबी न्हाय!”

“मला मारुन टाक रं बाबा…  मी मेले तर चार लोकं पेडं वाटत्याल…  त्या नवराबायकुची भांडणं तरी थांबत्याल, सुखानं नांदत्याल…”

“घर माज्याच नावावर हाय… सुन म्हनती माज्या नावावर करा… केलं बी आस्तं पन माजी मुकी बहिरी लेक हाय… माज्या माघारी तीला नको आसरा?”

“मावशी पोरीचं लगीन का नाय केलं?”

“आरं बाबा तीचं लगीन झालं व्हतं… नवरा एडस नं वारला आन् जाताना हिला बी दिवुन गेला… पोरगी लय देकनी हाय, आजुनबी कुनीबी लगीन करंल तीज्यासंगं… पन तीला बी एडस हाय… कुनाला म्हाईत न्हाई, पन आपल्या फायद्यासाटी दुस-याच्या लेकराला का फसवावं आपुन? किती पाप लागंल…?”

बाहेरचं फसवाफसवीचं जग कसं असतं, आणि ही भीक मागुनही स्वतःशी प्रामाणिक!

मला नेहमी असं वाटतं की, आयुष्याने पोहायला तरी शिकवावं किंवा सरळ बुडवुन तरी टाकावं…  मध्येच गटांगळ्या खात, गुदमरत जगवत ठेवण्याचा फायदा तरी काय?

ड्रेसिंग करत असतांना मध्येच कोणीतरी काही खायला देवुन जातं… ती ते वेगळं ठेवते… मी तीच्याकडे पाहतो… ती हसते… म्हणते… “काय नाय, राजगी-याची चिक्की हाय… माज्या सुनंला देईन संद्याकाळी घरी गेल्याव, तीला लय आवाडती…”

मला कळतच नाही… “अगं पण… ती भांडते ना तुज्या संगं…?”

“व्हय भांडु दे तीला, ती लहान हाय…पन मोटी तर मीच हाय ना…”

“हि चिक्की मी तीला देणार… चिक्कीला महत्व नसतंय बाळा, माज्यासाटी कुणीतरी कायतरी उरवुन आणलंय ही भावना म्हत्वाची… काय आणलंय, किती आणलंय या पेक्षा “का” आणलंय हे महत्वाचं आस्तं आबी…”

“चार भिंती म्हणजे घर नसतंय… आपल्या त्रासात दुसरा माणुस रडतो ते रडणारे डोळे म्हंजे घर, आपुन पडतांना कुनी आपल्याला सावरण्यासाठी हात दिला तर त्यो हात म्हणजे घर… आपल्या सुखासाठी दुसरं कुणीतरी पदर पसरतंय… हा आपल्यासाठी दुस-यानं पसरलेला पदर म्हणजे घर…”

“कळंल कधी तरी माज्या बी सुनंला… घर म्हंजे काय आस्तं ते?”

“बीन बोलणा-या चार भिंती घ्यायच्या नावावर करुन, की प्रेम करणा-या म्हाता-या माणसाच्या फाटक्या का हुयीना पन मायेच्या पदराखाली आसरा घ्यायचा हे तीनं ठरवायचं…!”

मी आ वासुन पहात असे…आणि ती मात्र निश्चल!

ही तीच शारदा, जीची स्वतःची मुलगी मुकबधीर, स्वतःला घरात स्थान नाही… आणि रस्त्यावर फिरणा-या दुस-या च्या निराधार तरुण लक्ष्मीला घरी आणुन जीव लावणारी…

मुकबधीर मुलीसाठी एक नोकरी देतो म्हटल्यावर हिने स्वतःच्या मुकबधीर मुलीचं नाव न सुचवता, रस्त्यावर घावलेल्या लक्षुमी ला कामाला लाव असं म्हणाली होती…

वास्तविक तीच्या स्वतःच्या मुलीला नोकरीची जास्त गरज असतांना…!

मागच्या आठवड्यात तीला म्हणालो, “का गं मावशे, नोकरीसाठी तुज्या पोरीचं नाव न सांगता, दुस-याच्या पोरीला, लक्षुमीला तु मला नोकरी द्यायला लावली… असं का?”

ती म्हणाली, “परतेकालाच पयला नंबर पायजे आस्तो… मलाच पायजेल म्हणुन सगळीच भांडत्यात, आसं करुन पयला नंबर मिळतो सुदा पण त्यात सुख आसतंय का..?”

“आपला पयला नंबर दुस-याला दिवुन बगा… मंग आपला नंबर दुसरा येवुनबी त्यात किती सुख वाटतंय…! आपल्या हातानं आपल्या तोंडात घास टाकला तर पोट भरतंय… पण आपल्या हातानं दुस-याला घास चारला तर मनबी भरतंय…!”

तीच्या तुटक्या पायावर माझ्या अश्रुंचा अभिषेक होत राहतो… ती मात्र रेखीव पिंडीसारखी असते निःशब्द आणि निश्चल!

कशी ही शारदा…? कोणत्या मातीत ही तयार झाली?

आपल्याला भुक लागली म्हणुन खाणं म्हणजे प्रकृती… दुस-याचं ओरबाडुन खाणं हि विकृती, आणि आपल्याला भुक लागलेली असतांनाही आपल्या घासातला घास दुस-याला भरवणं म्हणजे संस्कृती..!

अशीच ही, रस्त्यावर भीक मागुनही सुसंस्कृतपणा टिकवुन ठेवणारी… नावाप्रमाणेच शारदा!

हिच्या आता सर्व जखमा ब-या झालेत… आता हिला नविन कृत्रिम पाय द्यायला हवाय. इकडेतिकडे तीला फिरवण्यापेक्षा, माझ्या या क्षेत्रातील टेक्निशिअन मित्राला विनंती केली, तीला नविन पाय तयार करुन करण्यासाठी… तो ही स्पेशल!

रस्त्यावर काल शनीवारी सर्व मापं घेतली… साचा तयार केला… रस्त्यावरच उन्हातान्हात आमची गडबड चालु होती…

शारदा मावशी हे बघत होती… म्हणाली, “माज्यासाटी स्पेशल पाय तयार करतोय तु… खर्च किती येईल?” मी बोलुन गेलो, “७००० – ८००० येईल…”

तोंडावर हात ठेवुन म्हणाली, “माज्या एकटीला येवडा खर्च? नगो मला पाय… जुनाच वापरीन…  तुज्याकडं तरी कुटं हायेत पैशे…?”

मी म्हटलं, “आगं बगीन मी कसंही पैशाचं, पण तुझा पाय नीट करायलाच पायजे… तुच जर चालली नाहीस, तर इतरांना कशी चालवशील? इतरांसाठी का होईना, मला तुला उभं करायलाच पाहिजे”

सग्गळं कळलंय, अशा आविर्भावात तीने माझा गालगुच्चा घेतला…

मी तिथुन निघालो… म्हणाली. “ए पोरा, थांब… काय खाल्लंयस का? नसशीलच खाल्लं… हितंच हायेस सकाळधरनं… कदी खाणार? हिकडं ये…”

मी गेलो… हळुच बोचक्यात ठेवलेल्या राजगि-याच्या चिक्क्या काढल्या आणि हातावर ठेवल्या… म्हणली, “खा आन मंग फुडं जा…!”

मी म्हटलं, “आगं सुनेसाठी ठेवलेत ना तु त्या…?”

म्हणाली, “म्हंजे? सुनेसाटी ठेवलेल्या चिक्क्या माज्याच पोराला दिल्या मी… ती काय बी बोलणार न्हाय मला… आन् बोलली तर बोलुंदे… खाईन तुज्यासा

टी चार शिव्या…”

असं म्हणुन जुना पाय लावुन निघाली सुद्धा पुढे…  पुर्ण पणे कोरडी…  पण मला मागे अश्रुंत भिजवुन… . आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात…!!!

आणि मी पहात राहिलो तीला पाठमोरी…

हातातल्या चिक्क्यांना डोळ्यातल्या पाण्यानं हातातच चिंब कधी भिजवलं मलाही कळलं नाही!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*