मला लोक विचारतात, “डॉक्टर, तुम्ही या भिक्षेक-यांत दिवसभर उठबस करता, तुम्हाला काही संसर्गजन्य आजार होत नाहीत? काही Infection होत नाही?? जंतुसंसर्ग होत नाही???”
मला या प्रश्नाची गंमत वाटते… हसु येतं… मला का बरं आजार होणार नाहीत? मला काही निसर्गाने कवचकुंडलं दिली आहेत का? त्यांना जो आजार होतो तो संसर्गजन्य असल्यामुळे मला होतोच की… किंवा कधीतरी होणारच की!
कारण, आजार निर्माण करणा-या जंतुंना कुठं माहित असतं की हा डॉक्टर आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा भिकारी आहे, ही बाई आहे, हा माणुस आहे, हा या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे…
हे भेदभाव आपण माणसं (?) पाळतो…
जंतुंसाठी “माणुस” महत्त्वाचा … !
त्यांच्यापासुन दगडाला काही त्रास होणार नाही… माणसालाच ते आजार देणार…
कारण जंतुंना सुद्धा “माणसं” ओळखता येतात…!
आणि आपण “माणसं” असुनही आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत…
जंतुंपासुन भिका-यांना त्रास होतो, म्हणजे ती ही “माणसं” आहेत हे नक्की झालं… मग समाजातल्या माणसांना भिका-यांमध्ये “माणुस” का दिसत नसावा, हे एक कोडंच आहे…
जे जंतुंना कळतं ते सर्वशक्तीमान अशा माणसाला कळु नये?
मग श्रेष्ठ कोण माणुस की तो जंतु?
नक्की जंतुच, कारण त्याला “भिका-यातही माणुस” दिसला… आणि आपल्याला दिसतो तो “माणसांतला भिकारी“!!!
या जंतुंचा धर्मच आहे रोग पसरवणं… ते तो इमानेइतबारे पार पाडताहेत… पण मग याच न्यायाने माणसाचा ही धर्म आहे माणुसकी जपणं… पण माणुस हा धर्म पाळताना शक्यतो दिसत नाही…
म्हणजे हे यःकश्चीत जंतु आपल्या “जंतुपणाला” अभिमानानं जपतात पण माणुस मात्र “माणुसकीला” जपत नाही…
म्हणुन मला जर भिक्षेक-यांकडुन काही आजार झाला, तरी मला त्यात गैर वाटत नाही, कारण मला हे कळतंय की हा आजार जंतुंनी प्रथम एका “माणसाला” दिलाय… मग तो भिकारी का असेना… आणि नंतर तो “माणुस” म्हणुनच माझ्यापर्यंत आलाय, मग मी डॉक्टर का असेना…
किमान जंतुंनीतरी आम्हाला “माणुस” समजलं याचाच आनंद इतका असतो त्यात आजारामुळे होणारे त्रास विसरुन जातो तेही आणि मी ही!
डॉक्टर म्हणुन मला खुप वेळा असं वाटतं की एखाद्या माणसाला “माणुसकी” नावाचा अति भयंकर रोग व्हावा… तो संसर्गजन्य असावा… त्याला बरे करणारे कोणतेही औषध बाजारात नसावे… एकमेकांच्या संपर्कात येवुन हा रोग प्रत्येक “माणसाला” व्हावा…
या रोगाचा संसर्ग इतका वाढावा, इतका वाढावा… की एक दिवस या “रोगानं” पछाडलेला प्रत्येक जण एक दिवस “माणुसच” व्हावा!!!
डॉक्टर, ही तुमची मावशी सर्वात श्रीमंत आहे! तिचं आयुष्याबद्दलचं तत्वज्ञान मोठमोठ्या तत्ववेत्यांच्या तोडीचं आहे.तिला प्रणाम आणि तुम्हाला तर कायमच सलाम आहे!
उत्तम, अति उत्तम।