डोळ्यांची आज ऑपरेशनं झाली… खुप जणांचे त्यांच्या आवडीचे चष्मे करायला टाकले… खुप मंडळी प्रत्यक्ष भेटुन आशिर्वाद देवुन गेली…
माझ्या सगळ्या म्हाता-या माणसांनी गालावरनं हात फिरवुन डोक्यावरनं हात फिरवुन शाबासकी दिली…
एकुण दिवस मस्त…
२२ आजीआजोबा होते हे… मी ही हवेतच..!
समाधानाने निघतांना एक आजी भेटली… जीचं ऑपरेशन डिसेंबर महिन्यात झालं होतं…तीला मी म्हणालो होतो, “मावशी, ऑपरेशन करतोय…पण काम करायचं हां..!”
तीने वचन दिलं होतं… “होय, मी काम करेन!”
तीच आज आली… म्हणाली, “तु काम देणार होतास… काय झालं…?”
ही आजी… अत्यंत श्रीमंत घरातली… हिच्या नव-याने दहा वर्षांपुर्वी हिला बाहेर हाकललं… तीच्या तरुण पोरासह… का? तर म्हणे, “तु मला आवडत नाहीस…”
याने या वयात दुसरा घरोबा केला… ही आली पोरासह रस्त्यावर…
पोरगं तरुण होतं… काहीबाही काम करुन स्वतःचं आणि आईचं पोट भरत होतं…
ही आई, पोराला लग्नाला विनवत होती… पोरगी बघितली, लग्न ठरलं आणि, पोरगं अचानक वारलं….
सगळे पाश तुटले… आली रस्त्यावर… आप्पा बळवंत चौकातल्या जोगेश्वरी मंदिराजवळ भिक मागते… रस्त्यावरच झोपते हि माउली…!
“तु काम बघणार होतास, काय झालं?”, मी या वाक्याने भानावर आलो… जमिनीवर आलो…
म्हटलं, “सुरेखा मावशी, तुला संधीवात आहे, काय काम देवु? त्यापेक्षा तुझ्या नव-याला भेटतो, त्याच्या पाया पडुन तुला घरी न्यायला सांगतो… चालेल? करु तसं?”
हि स्वाभिमानी माउली चवताळली, म्हणाली, “त्याच्या पाया पडावं म्हणुन मी तुझ्याकडं आलेली नाही…”
“जमत असेल तर माझ्या लायक काम दे, नाहीतर मरु दे मला जोगेश्वरी च्या दारात…”
“अगं पण कायद्यानं तुझा हक्क आहे… मला बोलुदे तरी तुझ्या नव-याशी…”
“नको! बाळा, तो तुझा अपमान करील… मला तुझा अपमान सहन नाही होणार…”
“आणि कायद्यानं काही मिळालं आणि नव-याच्या मनात काही द्यायचंच नसेल तर, ते घेवुन मला कसला आनंद?”
“आम्हाला कामाला बाई बघा डॉक्टर”, असं पुर्वी सांगणाऱ्यांची नावं आठवली… म्हटलं, “चल, आत्ताच एक दोघांकडे जावुन पाहु काम मिळतंय का…”
“मी कशी येवु?”, तीचा भाबडा प्रश्न?
म्हटलं, “चल की, माझी मोटरसायकल आहे… माझ्यामागं बस…”
आजी तेवढ्यातुनही लाजली… म्हणाली, “नव-यानं “तीला” गाडीवर बसवलं… पण मला कधीच नाही रे…”
म्हटलं, “असु दे, नव-याच्या नाही तर नाही लेकाच्या गाडीवर बस आता…”
“वाटेत खावु पिवु मज्जा करु… काम पण कुणी देतंय का बघु… चल!”
ती बसली गाडीवर… सावरत… मला पाठीमागुन घट्ट पकडलं…
माउली खुश होती… वाटेत आम्ही मायलेकरांनी काहीबाही खाल्लं… तीला त्याचं कोण कवतीक…?
दोघा चौघा ओळखीच्यांकडे घेवुन गेलो… पण एकुण वय, तीला असणारा संधीवात वैगेरे वैगेरे यामुळे तीला कुठंही काम मिळु शकलं नाही आज…
मी हिरमुसलो… जीथुन घेतलं होतं तीथं परत नेवुन सोडलं…
म्हटलं, “मावशी, माफ कर… भिक्षेक-यांचा डॉक्टर म्हणुन मिरवतो मी… पण मुलगा म्हणुन तुझं काम नाही करु शकलो…”
“एक मुलगा सोडुन गेला… दुसरा मी जिवंत आहे पण तोही “नालायक” निघाला… माफ कर… पण मी करतोच आहे प्रयत्न..!”
म्हणाली, “बाळा, नोक-या काय रस्त्यावर पडलेत का? आणि लोकं पगार देवुन म्हातारी माणसं कशी ठेवतील कामाला… तु नको वाईट वाटुन घेवु… मिळंलंच कधीतरी…”
ती निघाली… म्हटलं, “मावशे, आता कुठं जाशील?” ती हसली, म्हणाली, “मी चालले जोगेश्वरी जवळच्या फुटपाथवर…”
“आणि खायला?”
“आता खायला काय? लेकानं गाडीवरनं फिरवुन आणली… जीवाची मुंबई केली… पोट भरलं माझं बाळा!!!”
मलाच कालवलं….
तीने गालाचा पापा घेतला माझ्या… डोक्यावरनं हात फिरवुन बोटं कडाकडा मोडत म्हणाली, “सोनं आहे माझं सोनं…”
ती निघाली… फुटपाथवर झोपायला…
आणि थोड्या वेळापुर्वी आई मुलाचं नातं जोडणारा हा अभिजीत नावाचा मुलगा (?) या माउलीला फुटपाथ वर सोडुन निघाला पुन्हा…
काय करावं… मी ही हतबल होतो…
हिच्यासाठी करायचं खुप आहे… पण मार्गच दिसत नाहीये!!!
ती गेली आनंदात… पण मी मात्र स्वतःशी कुढत राहीलो…
आपल्याच आईला फुटपाथवर सोडुन जाणारी अशी माझ्यासारखी नालायक मुलं का जन्माला घालतो देव..?
Hello Doctor, want to speak to u pl Coming to Pune on Wednesday, where will u meet. This will be a casual meeting, since want to discuss certain things with u. This time no excuses. If yes meeting pl. msg. Only yes meeting or not meeting. Waiting for reply. Thanks, Regards