महाशिवरात्र… शंकराच्या मंदिरात मी नेहमी सोमवारी जातो… पण मंगळवारी महाशिवरात्रीमुळे शंकराच्या मंदिरात गर्दि जास्त असेल… म्हणुन भिक्षेकरी जास्त सापडतील या भावनेनं येरवड्याच्या शंकराच्या मंदिरात आज मंगळवारी आलो…
विचित्र भोंग्यांच्या आवाजाने, भक्तांच्या अतिउत्साही आवाजाने कान किटले होते…
अशात पेशंट्स चेक करत होतो…
या लाईनमध्येच एक साधारण विशीची मुलगी असते… बघितल्यावर वाटतं, मतिमंद असावी… कपड्यांचे भान नाही, केस अस्ताव्यस्त! पावडर म्हणुन तोंडाला सतत माती लावत असते… एक पाय निकामी, म्हणुन उभी राहु शकत नाही, खुरडत चालते… तोंडाने सतत काहीतरी बडबड… लोक तीला वेडीच म्हणतात…
नेहमी गेल्यावर, बोलुन बोलुन बेजार करते मला. खुप काही काही सांगुन औषधं घेत असते.
ब-याच दिवसापासुन हिला वॉकर द्यायचा ठरवलं होतं… मला तो मिळालाही… आणि म्हणुन आजच्या मुहुर्तावर तो मी तीच्यासाठी मोटरसायकल वरुन कसरत करत आणला होता…
आता ही आजपासुन किमान खुरडत तरी चालणार नाही…
भिक्षेक-यांना चेक करत असतांना, लक्षात आलं, आज ही गप्प आहे…
मी गंमतीने छेडलं तीला, “काय गं… औषध नको का आज?”
तीने पाहुन न पाहिल्यासारखं केलं… मला गंमत वाटली…
पुन्हा तासाभराने विचारलं… तर ही गप्पच…
आज मला ही वेगळी वाटली… शांत… केस ब-यापैकी सावरलेले… नजर एकटक, आणि तोंडाला माती फासली नव्हती… मला विशेष वाटलं… म्हटलं, “औषध नकोय तुला आज?”
नेहमी धसमुसळेपणा करणारी ती, अत्यंत शांतपणे बोलली… “आईची वाट बघतीया, आई आल्यावर औशद द्या…”
आजचं तीचं हे शांत संयमित बोलणं ऐकुन मी थोडा विचारात पडलो…
तीच्यासाठी वॉकर आणला होता, आईसमोरच देवु वॉकर, या विचाराने मीही दुस-या कामाला लागलो…
खुप वेळाने परत गेलो… आता मलाही घाई होती… दुस-या मंदिरात जायची… तीला म्हटलं, “अजुन आई आली नाही ? किती वेळची वाट पाहतोय, मला जायचंय पुढे… हे आणलंय ते द्यायचंय तुला…! आई येणार तुझी म्हणुन थांबलोय मी…”
एरव्ही मिळेल त्यावर झडप घालणाऱ्या तीने वॉकर कडे ढुंकुनही पाहिलं नाही, त्याच संयमित शांत आवाजात म्हणाली, “जावा तुमी, ती येनार नाय आता…!”
मला राग आला थोडा, म्हटलं, “येणार नव्हती तर सांगितलं का नाहीस मघाशीच? मी वाट बघतोय कधीची तुझ्या आईची…”
ती काहीच बोलली नाही… नजर एकटक…
मी पुन्हा रागाने म्हटलं, “काय गं मघाशीच सांगितलं का नाहीस? तु सांगितलं असतं तर मी इथं ताटकळत नसतो राहिलो ना…!”
इतका वेळ शांत असलेली ती ताडकन् बोलली… “काय सांगु? ती कदीच येनार न्हाई… मी नुसती वाट बगत होते…”
मी बावचळलो… म्हटलं, “म्हणजे?”
“म्हंन्जे ती मरुन पाच वर्सं झाली… म्हाशिवरातीलाच या शंकराच्या घरी गेली… आज म्हाशिवरात… मला आटवन येतीया तीची…” असं म्हणुन जोरजोरात रडायला लागली…
मला गलबलुन आलं…
महाशिवरात्रीच्या गलबलाटात, भोंग्यांच्या आवाजात, जोरजोरात चाललेल्या मंत्रपठणात तीचा हंबरडा केव्हाच विरुन गेला…
भक्तांकडुन कोड कौतुक करुन घेणा-या शंकराला तरी हा हंबरडा ऐकायला वेळ कुठे होता? आणि मंत्रपठणाच्या अत्युच्च आवाजात हा एक क्षीण हंबरडा शंकरापर्यंत पोचेल तरी कसा?
मी माझ्या परीने तीची समजुत काढण्याचा प्रयत्न केला, पण रडु थांबत नव्हतं… माझ्या कुठल्याही समजावण्याने तीच्या चेह-यावर तो अवखळ भाव येईना… तीचं ते केविलवाणं रडु पाहुन मला पण रडु येइल असं वाटायला लागलं… तीला सावरतांना तीच्याकडुन कळलं ते असं…
ही आणि हीची आई एकत्र रहात होते… ही अपंग, वडिल सोडुन गेलेले… आई काम करुन दोघींचं पोट भरायची… मुलगी अपंग त्यात थोडी सावळी… मोठी झाल्यावर कोण लग्न करील म्हणुन आई तीला गोरं करण्यासाठी सारखी पावडर लावुन ठेवायची…
एका महाशिवरात्रीला कशाने तरी आई अचानक आई गेली… आता मामा सांभाळतो… सांभाळतो म्हणजे काय… हीच हातापाया पडुन त्याच्याकडे रहाते… भिकेतली रक्कम रोज त्याला देते… मामा काम करत नाही, हिच्या जीवावरच जगतो…
“डाक्टर, मला आयी पायजे… औशद नको!” इतक्या केविलवाणे पणे ती बोलते… कि पत्थराला पाझर फुटावा… आणि मी पुन्हा भानावर येतो…
भुकेल्या रडणा-या लेकराला आई पदराखाली घेते, लेकरु शांत होतं… हिला कोण पदराखाली घेईल? कोण शांत करेल?
मी आत्ता हिला काम देवु शकतो, अनाथाश्रमात सोय करुन देवु शकतो… दोन वेळचं जेवण देवु शकतो, लागेल ती औषधं देवु शकतो, सरकारी सुविधा मिळवुन देवु शकतो… पण… पण… आई नाही देवु शकत…!
किती विरोधाभास! जे कुणाला नको असतं, ते भरभरुन असतं आपल्या कडे… आणि जे दुस-यांना हवंय, ते आपल्याकडे नसतंच…!
विषय बदलायचा म्हणुन मग तेव्हढ्यातुनही मी तीला वॉकर दिला… उभं केलं… तीच्या चेह-यावरचे भाव थोडे बदलले…
वॉकर ला धरुन कसं चालायचं ते मी तीला शिकवत होतो… तीचा डाव पाय निकामी आहे… माझाही तसाच आहे असं समजुन त्या अवस्थेत कसं चालायचं हे तीला शिकवत होतो… साहजीकच लंगडत होतो…!
ती मला लंगडत चालताना पाहुन हसायला लागली,… “लंगडा डाक्टर, लंगडा डाक्टर” म्हणुन टाळ्या वाजवायला लागली… तीने तो वॉकर घेतला आणि इकडे तिकडे फिरायला लागली… चालतांना मध्येच माझ्याकडे पाहुन डोळे मिचकावत “लंगडा डॉक्टर” म्हणुन चिडवायची…
आता पुर्वीचे अवखळ भाव पुन्हा डोळ्यात आले… “मला हे औशद दे… ते नको… लाल गोळी पायजे…पांढरी नको…” आणि… तीची बडबड पुन्हा चालु झाली… थोड्या वेळासाठी का असेना ती आईच्या आठवणीतुन बाहेर आली…
मघापासुन मी तीला आईच्या आठवणीतुन बाहेर काढुन हसवण्याचा प्रयत्न करत होतो… ती हसली नाही…
मला लंगडताना पाहुन “लंगडा डॉक्टर” म्हणुन का होईना, पण ती हसली, थोडा वेळ दुःखातुन बाहेर आली…
जे काम माझ्यातल्या धडधाकट डॉक्टरला जमलं नाही ते माझ्यातल्या “लंगड्या माणसाला” जमलं…!
ती माझ्यापासुन थोडी दुर गेली… हळुच वाकुन माती घेतली, आणि तोंडाला लावली… तिकडुन पण ती माझ्याकडे बघुन हसत होती… हातवारे करुन काहीतरी बोलत होती… इतर गोंगाटात तीचा आवाज मला आला नाही… पण नक्कीच ती “लंगडा डॉक्टर, लंगडा डॉक्टर” असंच म्हणुन अजुनही हसत असावी…!
मी ही मग तीचा आनंद असाच टिकुन रहावा म्हणुन तिच्याकडे बघत बघत मुद्दाम खोटं खोटं लंगडतच माझ्या बाईक जवळ आलो… किक मारली…
सहज मागे पाहिलं… बीन आईचं ते निरागस लेकरु या “लंगड्या डॉक्टरला” पाहुन अजुनच हसत होतं….!!!
Congratulations !for the participation in swayam talks,saw ur interview with Dr. Uday Nirgundkar. This was ur first achievement. A standing ovation an a big round of a applause by the audience. Wish u all the very best in the near future.U will have a huge success an all ur dreams come true at the earliest. God Bless U an ur entire family.Once again congrats, an very happy for ur successful growth.