सफाई कामगार…

घटना क्रमांक 1

कसं कोण जाणे पण एका मुलीने दोन महिन्यांपुर्वी मला संपर्क केला… मला जे समजलं ते असं… साधारण पंचवीशीची ही नागपुरातली तरुण मुलगी – हिचं घरातल्यांशी पटत नाही – घर सोडुन कसातरी उदरनिर्वाह भागवते – सगळे असुनही कुणीच नाही.

हिने मला फोनवर सगळं सांगितलं आणि सुरक्षित राहण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी काम देण्याबद्दल विनवणी केली. खरंतर मी फक्त वृद्ध भिक्षेक-यांसाठीच काम करतो… आणि ही तर भिकारी नाही…

मी तीला तसं सांगितलं, परंतु बोलण्यात इतकी अगतिकता होती की मला जाणवलं… आत्ताच्या या वेळी जर तीला मदत मिळाली नाही तर भविष्यात ती भिक मागु शकते…

केवळ भविष्यात तयार होणारा एक भिक्षेकरी कमी व्हावा याच हेतुने मी तीला मदत करण्याचं ठरवलं…

खुप ठिकाणी प्रयत्न केले, पण काही कारणाने काहीच होवु शकलं नाही…

परवा तीचा फोन आला – बोलण्यातला हताशपणा आणि नकारात्मक, जीवन संपवण्याचे तीचे विचार खुप प्रकर्षाने जाणवले… आणि मी तीला काहिच मदत करु शकत नव्हतो…

शेवटी १५ फेब्रुवारी ला रामेश्वरी जाधव मॅडमना कळकळीची विनंती केली… तीला पदराखाली घेण्याची विनंती केली,… क्षणाचाही विचार न करता म्हणाल्या, “सर उद्याच द्या पाठवुन…”

सांगायला मनापासुन आनंद होतोय की ही मुलगी रामेश्वरी मॅडम कडे १६ फेब्रुवारी लाच रुजु झाली… त्यांच्या इतर मुलांत ती सामावुन गेली…

खरंतर रामेश्वरी मॅडम ने या मुलीला पाहिलंही नव्हतं (मी अजुनही पाहिलं नाही) तरी तीला सामावुन घेतलं…

आजार होवुन गोळ्या देण्यापेक्षा आजारच होवु नये… भिक्षेकरी झाल्यावर त्यांचं पुनर्वसन करण्यापेक्षा भिकारीच तयार होवु नयेत या विचाराने मी हे सर्व केलं…

रामेश्वरी मॅडमनी माझ्या या विचारांना प्रत्यक्ष कृतीने साथ दिली… मी ऋणी आहे त्यांचा!!!

या मुलीशी आज माझं बोलणं झालं फोनवर… हसता हसता रडत होती… बोलली काहिच नाही… पण मला समजलं सगळं…!

घटना क्रमांक 2

एक व्यक्ती तीन महिन्यांपुर्वी भेटली – एका नजरेत समजलं, हा सराईत भिकारी नाही – माझ्या परीने मी त्याच्याशी संवाद साधला… समजलं ते असं…

हा तीन टेम्पोंचा मालक होता एकेकाळी… ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय – हाताखाली 4 लोक होते – नशिबाबरोबरच भावांनी दगा दिला – एका रात्रीत रस्त्यावर आला – एकाकडे टेम्पो ड्रायव्हर म्हणुन नोकरी करायला लागला – दोन्ही डोळ्यांना अचानक दिसायचं बंद झालं – होती ती ही नोकरी गेली – खुप प्रयत्न करुनही नोकरी मिळेना तेव्हा बायकापोरांना जगवण्यासाठी भिक मागणं हा सोपा धंदा सुरु केला…

मला तो भेटला… म्हटलं, “साहेब काम देतो तुम्हाला, कराल?”

एका पायावर तयार झाला… पण डोळ्यांना दिसत नव्हतं… डॉ. वैभवी रावळ मॅडमच्या कौशल्याने दोन महिन्यांच्या प्रयत्नांना यश आलं… ऑपरेशन केलं… चष्मा दिला… ठसठशीत पुर्वीसारखं दिसायला लागलं… स्वारी जाम खुश… म्हटलं, “राजे आता काम करायचं…!”

म्हटला, “यस्स सर… करतो, मला फळं आणि भाजीचा स्टॉल टाकायला मदत करा…”

झालं, फळं आणि भाजीसाठी सर्वतोपरी मदत केली…

आजपासुन आणखी एक भिक्षेकरी आता गांवकरी झाला…

म्हटलं… “आता मला पुन्हा जर भीक मागताना दिसला, तर मी काय करायचं तुम्हाला?”

पायातली चप्पल काढुन म्हणाला, “पायताणानं हाणायचं मला, जीथं दिसेन तिथ्थं…”

त्याच्या पायात चप्पल पुन्हा सरकवली, मिठी मारली त्याला आणि म्हटलं… “अशी वेळ येणार नाही, माझा विश्वास आहे..!”

डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पण “हसत” गेला कामावर, आजच शनीवारपासुन…!!!

वरील घटना क्रमांक एक असो वा दोन किंवा आणखी कितीही… याचं श्रेय माझं एकट्याचं मुळीच नाही…

आपण देणगी देताय… शब्दरुपात मला आशिर्वाद देताय… उत्साह वाढवताय… न बघुनही एखाद्यावर असं अतोनात प्रेम करणं… बस्स तुमच्याकडनं शिकावं…!

आईवडिलांसमान श्री. व सौ. भुवड, बंधु सारखे लाभलेले मित्र पवन लोखंडे आणि राहुल सावंत ही मंडळी निरपेक्षपणे, संपुर्णतया निःस्वार्थपणे माझ्यामागे सावलीसारखे असतात… “निःस्वार्थ” या शब्दाचा अर्थ समजावुन घ्यायचा असेल,.. तर यांना भेटावं… !

रामेश्वरी मॅडम असोत की डॉ. रावळ मॅडम, आपापलं काम करत असतांनाही समाजसेवा कशी करावी…हे यांच्याकडुन शिकावं…

मी शिकतोय आपणांपासुन, काही चुका होत असतील तर बेशक सांगाव्यात, सांभाळुन घ्यावं मला…

आजचा लेखन प्रपंच बस्स एव्हढंच सांगण्यासाठी केला… की हे श्रेय तुमचं आहे… आणि मी तुमचा ऋणी आहे आणि त्या ऋणांतच राहु ईच्छितो…!

मी कोण…???

मी फक्त वायरमन… योग्य ती वायर योग्य त्या वायरीला जोडणारा…

किंवा पोस्टमन … योग्य ते पत्र योग्य पत्त्यावर पोचवणारा…

किंवा सफाई कामगार म्हणा… भंगी म्हणा… समाजाला ज्या गोष्टींची घृणा आहे, किळस आहे ती घाण साफ करणारा….!

1 Comment

  1. ज्याच्याकडून काहीही परतफेड होण्याची शक्यता नसते त्यांना केलेली मदत म्हणजे सर्वश्रेष्ठ काम! ते तुम्ही करताय डॉक्टर! तुम्हाला मनापासून सलाम!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*