लालपरी..!

आज २५ लोकांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्या… चष्मे दिले… गल्लोगल्ल्या फिरुन… भिक्षेकरी जमवुन… पण यात काही विशेष नाही…!

आज एक आज्जी कामाला लागली… वजनकाटा घेवुन… पण यातही काही विशेष नाही…!

विशेष हे की… एक गृहस्थ आहेत, वय वर्षे ६०… ट्रकने त्यांना काही वर्षापुर्वी उडवलं, डावा पाय कापुन टाकावा लागला… कृत्रिम पाय लावावा लागला… अपंग म्हणुन शिक्का बसला!

आता या वेड्या माणसानं घरी बसावं की नाही?

तर नाही, हा माणुस करतो काय, तर यांनी एक रिक्षा घेतलीय, अपंग चालवतात ती… या रिक्षाचा रंग लाल असतो… तीला ते लालपरी म्हणतात…

या लालपरीला घेवुन, स्वतःचा कृत्रिम पाय सांभाळत, ज्या अपंग व गरीब व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी वाहनाची सोय नाही अशांना घेवुन ते मोफत ने आण करतात…

ज्यांना पाय नाहीत अशा लोकांना कृत्रिम पाय बसवण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन तर करतातच, पण स्वतःच्या लालपरीसह दवाखान्यातही घेवुन जातात…

हे राहतात डोंबीवलीला, पण कुठंही ऍक्सिडेंट झाला की आपल्या लालपरीला घेवुन ते रुग्णांना घेवुन जातात…

रस्त्त्यात अपघात झाल्यावर तडफडणा-या जीवांचे व्हिडीओ काढुन व्हॉट्सऍप वर टाकुन मज्जा बघणारे अनेक नालायक असतात… हा बीनपायाचा माणुस मात्र तीथे जावुन रुग्णांना गाडीत टाकुन हॉस्पिटलला घेवुन जातो… रस्त्यात तडफडणा-या अशा कित्येक तरुण आणि तरुणींचे त्यांनी नुसते प्राणच वाचवले नाहीत, तर त्यांना Self-Dependant केलंय… जगण्याचा मंत्र दिलाय…

कुणी तरी विचारतं, हे कशासाठी सर्व? तर ते हसत सांगतात, “मला जर वेळेवर उपचार मिळाला असता, तर आज मी ही माझ्या पायावर उभा असतो… अपंग म्हणुन तरी शिक्का बसला नसता… असो, झालं ते झालं, आता जेव्हढं जमतंय तेव्हढा तरी प्रयत्न करेन, की माझ्यासारखंच इतरांना भोगावं लागु नये…!”

बरं या बदल्यात ते मागतात तरी काय माहिताय…?

तर, एक गोड स्माईल…!!!

Yesss…  या अवलियाची माझी ओळख झाली एक वर्षांपुर्वी… पहिल्या भेटीतच आमचं पिता -पुत्र अशा नात्याचं रिझर्व्हेशन झालं…

बोलतांना मी मात्र काका असं म्हणतो…

नेहमी ते कामाबद्दल विचारपुस करतात… आणि मी नेहमी त्यांना सहज बोलुन जातो, “बाकीचं काही नाही हो काका… या सगळ्या लोकांची ने आण करण्यातच माझी सगळी शक्ती जाते…” दरवेळी ते ऐकुन “हं.. हं.. असा हुंकार भरतात…”

परवा मीच आजारी पडलो… १०२ ताप, तशात काम चालु… त्यांच्याशी बोलताना सहज बोललो, “२० तारखेला डोळ्यांच्या तपासण्या आहेत, मी पण आजारी आहे, कसं जमणार कुणास ठावुक? तसे जीवाभावाचे पवन, राहुल, जयश्री माई भुवड, भुवड बाबा , रॉबिनहुड चे राठी आणि रहेजा साहेब आहेतच… पण…!”

त्यांनी पुन्हा हसत हुंकार भरला…

१९ च्या रात्री सर्वांना फोनवर बोलुन तशाच तापात झोपलो… आज २० उजाडली… कसाबसा उठलो… लागलो कामाला गोळ्या घेवुन… मनिषा म्हणाली, “मी आहे तु झोप… आज का काम मेरे नाम…”

तरी कसरत करत … पेंगत… कसाबसा पोचलो… दोनचार लोकांना गोळा केलं… आज्ज्या म्हणाल्या… “तुलाच बरं नसंल तर, पुना जावु कंदीतरी, तु झोप जा…” त्यांच्या या मायेच्या शब्दांनी उलट हुरुप आला…

म्हटलं… “असुदे, दोन चार लोकंच घेवुन जावु, इतरांना आज आणणं शक्य नाही… आजचं आपलं हे फेल होणार सर्व… इतकं कष्ट करुन वाया जाणार…”

अशा निराशेने दवाखान्याच्या पाय-या चढलो… अन् बघतो तो काय २५ च्या २५ भिक्षेकरी माझ्यासमोर हसत उभे…

मला वाटलं, तापाची ग्लानी असेल…

पण नाही… खरंच २५ लोक बाकड्यावर बसलेले… मला कळेना… हे कसं…? कुणी आणलं यांना…? शेजारी राहुल उभा होता… म्हटलं, “राव्हल्या, कसं काय?” तर हसत त्याने बाजुला बोट दाखवलं… तर बाजुलाच तो “वेडा” माणुस उभा होता… पिता म्हणुन माझ्या बरोबर ऍग्रिमेंट केलेला… लालपरीला घेवुन मिरवणारा… काका म्हणवुन घेणारा… अपंग पणा झुगारुन सर्वांना आधार देणारा… या डॉक्टर फॉर बेगर्स चा बाप…  त्यांचं नाव…  नवरे काका

म्हटलं “काका…, तुम्ही डोंबीवलीला असता… आज इथं कसे?” म्हटले… “पोरगं आजारी… मग तीथं काय जीव लागतोय काय? लालपरीला म्हटलं… चल, येती का पुण्याला…?” ती म्हटली…  “चला…” “आलो…  हाय काय आन् नाय काय?”

मी म्हटलं, “काका, तुम्ही या अशा पायानं, डोंबीवलीवरुन पुण्याला रिक्षा चालवत… केवळ या भिक्षेक-यांना दवाखान्यात सोडायला आलात? वेडे आहात का?”

“वेडाच म्हण की रे…!” हसत ते बोलले…

अशा या वेड्याचे पाय धरण्यासाठी मी वाकलो… पाय सुद्धा धरण्यासाठी एकच होता,.. दुसरा आस्तित्वात नव्हता… किती विसंगती..!

दुस-याला पायावर उभं करणा-याला, देवानं साधे दोन पाय देवु नये…? इतकं निष्ठुर होणं हे चांगलं नाही देवा… भेटलास कधी तर नक्कीच जाब विचारेन मी तुला…

त्या एकाच पायाला हात लावतांनाही त्यांनी मला उठवलं, छातीशी लावलं… म्हणाले… “ऐ…  तुझी जागा इथ्थं आहे…!”

खरंच माणसं किती मोठी असतात…? अशी येड्यासारखी ताडमाड उंच वाढतात तरी कशी?

कामं संपवुन खाली आलो चहाला, तर ही त्यांची लालपरी खाली रस्त्त्यात डोळे मिचकावत उभी होती…

हळुच म्हटलं, “काय गं काकाला कळत नाही, तुला तरी कळतंय की नाही? येती का पुण्याला म्हटल्यावर, लगेच कशाला हो म्हणायचं?”

तर… गोड हसली आणि म्हणाली… “काका कुणाचं ऐकतात? मी नाही म्हटलं असतं तरी पोरासाठी पळत आलेच असते ते कसेही… आणि त्यांच्यामागं माझाही जीव नसताच लागला मागे डोंबीवलीला… म्हणुन मग मीच आले…!”

मी म्हटलं, “एव्हढी गोड बोलतेस लालपरी…  पुन्हा तुझ्याशी मला बोलावसं वाटलं तर…?” लाजुन म्हणते कशी…? “८०८०२५४५५१ किंवा ९६१९४५४४५५१ यापैकी कुठल्याही नंबरवर मला फोन करा… आधी काकाच उचलतील… पण मागाहुन मी ही बोलेन…!”

मी पहात राहिलो एकटक दोघांकडे… या दोघांनाही एकमेकांशिवाय कुणीच नाहीत… जे कुणी आहेत ते असे “अपघाताने” मिळालेले…

दुरवर काका चहाचे घुटके घेत उभे असतात… भुरुक… भुरुक…
एका पायावर तोल सावरत… आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात…

आणि मी मात्र पहाडाएव्हढ्या उंच त्या माणसाकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात असतो… मनोमन नतमस्तक होवुन…!

1 Comment

  1. Hello Doctor! U are an always will be great. No words or comparison for ur work an ofcourse u as a good human being.Take care of ur health. There r people who need u for their support. A doctor on heels Get well soon. God Bless.

Leave a Reply

Your email address will not be published.


*