शुक्रवार… मस्जिद बाहेरचे पेशंटस् तपासुन निघतच होतो तेव्हढ्यात एक आज्जी आली… गोळ्या घेवुन म्हणाली, “एक विनंती हाय, पलीकडल्या फुटपाथ वर माझी मुलगी राहते, तीला रिक्षानं उडवलंय, बहुतेक खांदा मोडलाय, तीला बघता का?”
“चला…” म्हणत चालत तीच्याबरोबर निघालो… वाटेत ती सांगत होती, “ही माजी पोरगी, मेघा..!
दिनकर नावाच्या माणसाशी आमी लगीन लावुन दिलं… त्येज्यापासुन तीला 3 पोरं झाली अक्षय, सनी सारीका… दिनकर काही कारणानं गेला… मग गफुर खान नावाच्या माणसानं हिच्याशी लग्न केलं… याच्यापासुन पण तीला 3 मुलं आहेत… सलीम, सुलेमान आणि आयेशा…”
वाटेतल्या तीच्या बोलण्यावरुन बरंच काही कळलं… मला हे सगळं ऐकायलाच गंमत वाटत होती… एकाच आईची सहा मुलं… पहिले तीन वेगळा धर्म पाळतात… दुसरे तीन वेगळा धर्म पाळतात… तरीही एकमेकांचे बहिण भाऊ म्हणुन राहतात… कोणताही मत्सर एकमेकात नाही… सावत्र पणाचा दुजा भाव नाही… काही मुलं मेघाला आई म्हणतात… तर इतर मुलं अम्मी…!
समाजातही असंच घडलं तर किती छान होईल…? असो…!
मी पोचलो, त्यांच्या फुटपाथ वरच्या कुटुंबात…
मेघा.. ही पंचेचाळीशीची बाई… वाघ्या – मुरळीतली, मुरळी म्हणुन नाचायची. सहा पोरांसकट फुटपाथवरच सगळा संसार मांडलेला… फाटक्या मळलेल्या वाकळा आणि चादरींची भेंडोळी… फुटकी मोडकी अस्ताव्यस्त पसरलेली भांडी… आजुबाजुला पडलेल्या चींध्या… सांडलेलं पाणी आणि कुणी कुणी दिलेलं उष्टं खरकटं … यातच ती बसली होती… याच उघड्या कूटुंबात मी आज प्रवेश केला… मी डायरेक्ट खाली बसलो… ती ओशाळली… माझ्या बसण्याची जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायला लागली…
घाणीत बसु नका वो डाक्टर… म्हणत, आजीनं बसायला मला एक फाटकं पोतं अंथरलं…
ज्या पद्धतीने, अदबीने तीने ते अंथरलं ते पाहुन मला ती माझ्यासाठी जरीकाठाचं रेशमी मौल्यवान वस्त्र माझ्यासाठी टाकते आहे असं वाटत होतं…
ज्या आपुलकीने ही मेघा आणि तीची आई माझ्याशी वागत होत्या ते पाहुन मला मी एखाद्या राजवाड्यात पाहुणचाराला आलेला पाहुणा आहे असं वाटायला लागलं…
खरंच होतं ना…? ज्या घरात अक्षय, सनी, सारीका, सलीम, सुलेमान आणि आयेशा… आपल्या आई, अम्मी, दादी आणि आज्जी ही नाती सांभाळत राहताहेत… ते उघड्यावरचं घर राजवाड्यापेक्षाही छानच नाही का?
तपासुन औषध देता देता मी नेहमीप्रमाणेच मेघा आणि आज्जीशी गप्पा मारायला लागलो… दोघींचीही कर्मकहाणी वेगळी… त्यांचं जगणं, वागणं, भोगणं ऐकता ऐकता मीच गुंतत गेलो…
नाही म्हणायला एक खटकत होतं, आयेशा ही मुलगी खुपच लहान… आईच्या मांडीवर होती… पण ती सोडली तर इतर पाचही मुलं तीथंच अस्ताव्यस्त पसरली होती… लोळत पडली होती… कुणाचे डोळे अर्धवट उघडे… कुणी उठण्यासाठी धडपडतंय… तर कुणी उठता उठता पडतंय…
मला कळेना… मी म्हटलं, “मेघा हे काय?”
म्हणाली, “डाक्टर भाउ, समदी पोरं नशा करत्यात…” मी म्हटलं, “दारु?”
म्हणाली, “नाही, व्हाईटनर आणि व्हिक्सची नशा…” तीनं पुर्ण भरलेला एक डब्बा मला दाखवला, ते फेव्हिकॉल सारखं अत्यंत तीव्र वासाचं ऍड्हेजीव्ह होतं… मॅट, काचा चामडं चिटकवण्यासाठी वापरतात… कपड्यावर टाकुन याचा वास घेतला की जब्बरदस्त नशा येते…
मी कुतुहलाने एक एक फोटो काढायला लागलो… अस्ताव्यस्त पडलेल्या पोरांचे फोटो काढायला लागलो…आणि तेव्हढ्यात त्या पडलेल्या मुलांपैकी एकजण अत्यंत त्वेषाने उठुन दातओठ खात माझ्याकडे यायला लागला…
त्याच्या आज्जीकडे पाहुन म्हणाला… “ऐ दादी… ये किसको तु घरपे लायेली है…? ये हरामी पुलीस का खबरी है… अपनी सब बाते पुलीस को बताके…अंदर करवायेगा ये सबको… सारीका को इधर से लेके जाव… सालेकी नजर इसी पे होयेंगी…”
अस्सल मुंबईतली ही हिंदी आहे हे मला जाणवलं…
तो भयानक चिडला होता माझ्यावर…
साधारण 15-16 वर्षाचं काटकुळं पोरगं… अंगात काळं बनीयन, गुडघ्यापर्यंत दुमडलेली जीन्स, राजेश खन्ना स्टाईल कानावर असलेले केस, डोळ्यात सुरमा… आणि त्याच डोळ्यांतुन वाहणारा माझ्या बद्दलचा भयानक राग…
माझ्याकडं धडपडत येत म्हणाला…”ए xxx के… इधर से अब्बी के आब्बी कटनेका… तेरी माँ का xxxxx तु इधर कायकु आया… मालुम है मेरकु… डाक्टर बनके नाटक कर रयेला है …xxxxx”
मी आईवरुन मला दिलेल्या शिव्या ऐकुन सुन्न झालो… 15 वर्षाचं एक पोरगं, मला शिव्या देतंय, माझ्या अंगावर धावुन येतंय… मी विचार करायला लागलो…
त्याचा माझ्याविषयी गैरसमज झाला होता…
एव्हाना मेघा आणि ती आज्जी त्याला सावरत होत्या… दीनवाणेपणाने माझी पदर पसरुन माफी मागत होत्या… मी तिथंच बसुन होतो… वेड्यासारखा… डोकंच चालेना…
मला बसलेला बघुन तो अजुन चवताळला… म्हटला… “आब्बीबे बैटेलाच है कुत्ते? आरे कुत्तेके हाड बोलेंगे तो कुत्ता भागता हय… तु xxx की औलाद …मार खाके ही जायेगा क्या…?”
माझ्या मुलाच्या वयाच्या पोट्ट्याने मला रस्त्यात इतकं अपमानीत करावं? मी खरंतर शुन्य झालो होतो…
पण खरंच सांगायचं तर मला त्याचा राग येत नव्हता, शिव्या खाल्ल्याचं वाईटही वाटत नव्हतं, भिती तर अजीबात वाटत नव्हती…
कारण, त्याच्या जागी तो बरोबर होता… प्रेमाचं खोटं नाटक करुन फसवली गेलेली ही मंडळी असतात… मी ही त्यातलाच नसेन कशावरुन ? असं त्याला वाटणं साहजीकच आहे…
अशा लोकांपासुन आपल्या आईचं, सावत्र बहिणीचं आणि आज्जीचं रक्षण करणारा तो मला वाट चुकलेला परंतु एक समर्थ मुलगा, नातु आणि भाऊ वाटला…!
खरंतर त्याचा अभिमानच वाटला… आपल्या परीनं तो आपल्या रस्त्यावरच्या या कुटुंबाचा कर्ता पुरुष होवुन जबाबदारी घेत होता…
लक्षाधीश असुन आपल्या आईबापाला घराबाहेर काढणारी मुलं मी पाहिलीत… पण त्याही पेक्षा स्वतःकडे काहीच नसुन आपल्या कुटुंबाला आपल्या परीनं जपणारा हा सलीम मला मोठा वाटला… आवडला…
मी आता जागेवरुन उठलो… माझ्याबद्दलचा त्याचा अविश्वास कुठ्ठही कमी नव्हता झाला… त्याला वाटलं असावं मी आता त्याच्या अंगावर धावुन जाईन…
स्वतःच्याच छातीवर बुक्की मारत म्हणाला… “आ xxxx आ… मारेगा मेरकु? हात तो लगा xxxx इदरीच तेरे हात काट डालता हुं… मेरी माँकु और दादीको किस चीज के लीये फुसला रहा था तु? तेरे नेटवर्कमे आनेवाले लोग नही हम xxxx”
त्याच्यातला तो मुलगा आणि भाऊ पाहुन त्याही परिस्थितीत माझे डोळे पाणावले… मी त्याच्याजवळ चाललो…
मागुन मेघा म्हणाली… “नका जावु डाक्टर भाऊ फुडं… त्यो नशेत हाय काय बी करंल..!”
मनात म्हटलं, “मी ही नशेतच आहे… त्याची वेगळी आणि माझी वेगळी…”
माझ्या पोराच्या वयाचं पोरगं ते, प्रतिकारासाठी सावध उभं होतं… मी जवळ गेलो, हात जोडले, म्हटलं, “बेटा सलीम.. तेरी माँ मुझे भैय्या बोलती है… तेरी दादी मुझे बेटा बोलती है… इस हिसाब से मै तेरा मामा हो गया… अब तु मामा को भी गाली देगा? मामाके हात काटेगा बेटा?”
मै देख रहा हुँ, तु अपने माँकी बहन सारीका की और अपने दादी कि अपने तरीके से फिकर करता है… मै सचमें डॉक्टर हुँ… मै भी रस्ते में ऐसेही रिश्ते बनाता हुँ… और अपने तरीके से निभाता भी हुँ…”
मी आणखीही बोलत राहीलो, तो ऐकत राहिला…
माझ्या शब्दांनी तो विरघळत चालल्याचं जाणवलं मला…
मी त्याला जवळ घेतलं… मी काय करतो हे त्याला सांगीतलं… तो पुर्ण पणे शरण आला मला… माणुस म्हणुन… शस्त्राविना मी लढाई जिंकली होती…
आम्ही नंतर गोल बसुन चहा आणि क्रिमरोल मागवला…
चहा मागवतांना टपरीवाल्याला तो म्हणाला, “भाय जरा जादा क्रीमवाला क्रीमरोल दे दे…”
हजार वेळा क्रीमरोल खाल्ले असतील पण तेव्हाचा तो चहा आणि क्रिमरोल ची रंगतच न्यारी…
मी म्हटलं, “सलीम तु काय करतो रे बाळा? तुला माझा एवढा राग का आला?”
म्हणाला, “मामा मै बंबय मे रहता है… मै बारात मे नाचनेवाली घोडी को ट्रेनिंग देता है… आख्खी बंबय मे मेरे जीतना उमर मे छोटा ट्रेनर नय… पैसा मिलता है… काम होता हय तो… नय तो नय… फिर बाकी टायम पाकिट मारता हुँ… व्हि.टी. पे… कभी दादर… यहां भीड ज्यादा होती है… फिर थोडी गलत संगत लग गयी और ये व्हाईटनर का नशा लग गया…”
“हम रोड पे रहते है… मेरी माँको देखके लोग आते है कुच भी पुछते है… ये मेरी भैन है सारीका… उसके बारे मे पुछते है… मेरेको लगा तु भी उन्ही में से हय…”
मी शहारलो सर्व ऐकुन… माझा राग का आला असेल त्याला याचा मी केलेला अंदाज बरोबर होता तर…
मी पाकिटमार आहे… असं कुणी मला विश्वासाने सांगतंय… यावरच मला विश्वास बसेना…
पुढं म्हणाला, “मै उन लोगोंकाच पाकीट मारताय जो साले हरामी दिखते हय… गरीब आदमी का मै पाकीट नय मारता… हरामी आदमी को हम पयचानते लगीच…उसको पता बी नय चलेंगा,… साला कब और किसने पाकिट मारा…”
मी गंमतीनं म्हटलं, “चल माझं पाकीट मारुन दाखव… बघु कळतंय का मला…”
हसला, म्हणाला… “मामा, बापजनम मे तेरकु पता नही चलेगा… कब तेरा पाकीट मैने मारा… लेकीन नही मारुंगा… पँट फटेगी तेरी… और हमारा असुल है… मारा हुआ पाकीट हम कभी वापस नही करते… तो तेरा नुकसान होयेंगा, पैसा जायेंगा.. पँट भी फटेंगी तेरी…”
माझ्या पाकिटात खरंतर वडा पाव किंवा फारतर मिसळ खाण्याएवढेच पैसे असतात… बाकी पाकिटात सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या… कुणाला कुठलं काम… कोण देणार? कुठं? कुणाला कुबडी द्यायची? कधी? हेच सगळं…
मी त्याला हे सांगीतलं आणि हसत म्हटलं… “सलीम तेरा मामा है तो डॉक्टर, पर गरीब है… ये चिठ्ठी छोडके कुछ नही मिलेगा मेरे पाकिटमें…”
खुप विचार करुन म्हणाला… “इसीलीयेच मै तेरा पाकीट नय मारुंगा, बेचारे लोगोंका नाम लीखा है तुने पाकिटमे, किनको क्या देना है क्या नही… मै लेगा पाकिट तो उन गरीब लोगोंका नुकसान होयेंगा…”
मी काय म्हणु या मुलाला…
मी या मुलात खुप काही पहात होतो… भले पाकिटमार असेल… पण त्या ही कामावर त्याची श्रद्धा आहे…
मघाशी कुटुंबावर प्रेम करणारा सच्चा मुलगा आणि भाउ पाहीला…
गैरमार्गाच्या का असेना… पण कामावर निष्ठा असलेला तीथंही असुल पाळणारा एक माणुस पाहीला…
पाकिट मारतानाही गरीबाला त्रास न होवु देणारा एक अप्रत्यक्ष समाजसेवक पाहीला…
आपण डॉक्टरचं पाकीट मारल्यावर इतरांचं नुकसान होईल हा विचार धारण करणारा हा माणुस मी पाहीला…
कसं असतं… एकाच झाडाची फुलं… काही देव्हा-यात जातात… काही तिरडीवर तर काही वारांगनेच्या गज-यात…
पाउस पडतो… हे पाणी कधी गंगेच्या पात्रात पडतं… तर कधी गटारात… गंगेत पडणारं पाणी तीर्थ होतं …पण गटारात पडलेल्या पाण्याचं काय…?
गटारात पडलेल्या पाण्याचा तरी यात दोष काय?
पाणी तेच… फुलं तीच… पण आपण कुठं जावं हे त्यांच्या हातात नसतं… तसंच या सलीम सारख्या मुलांचं…
नशीबाचे भोग? समाजाची उदासीनता? की राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा?
सलीमसारखी लाखो मुलं आहेत, ज्यांना वळण लावलं तर भारत खरंच समृद्ध होईल…
कुटुंबावर प्रेम करणारा… जात धर्म न मानणारा, कामावर श्रद्धा ठेवणारा, पीडीतांसाठी मनात माया ठेवणारा… असाच भारतीय हवाय ना आपल्याला?
मी मुद्द्यांवर आलो, म्हटलं, “बाळा, काम करशील?”
म्हटला… “करेंगा ना… पन ये मेरी नशेकी लत छुडाव पयले… साला किसी के पास जायेंगा काम करनेको तो अपनी नशे की वजह से किसीका नुकसान होना नयी मांगता,..”
काय हा माणुस? इथंही दुस-यांचाच विचार…!
व्यसन सोडण्यासाठी औषधं आहेतच पण जर व्यसनाधीन माणसाच्या प्रेमाच्या व्यक्तीने त्याला व्यवस्थित समजावुन सांगीतलं तरच ते व्यसन तुटतं… नुसत्या औषधाने नाही… हे त्रिकालाबाधीत सत्य आहे…
सलीमच्या घरात प्रेमाची माणसं खुप आहेत पण व्यसन सोडण्याविषयी ते कितपत त्याला सांगतील याविषयी शंकाच आहे…
मी मनोमन ठरवलंय… झालोच आहे आता मामा तर याला वाटेत सोडायचं नाही…
मामा म्हणुनच मी याच्याशी आता नातं ठेवुन माझ्या पद्धतीने मी याचं व्यसन सोडवेन… कामाला लावेन…
माझ्यातल्या डॉक्टर पेक्षा माझ्यातल्या मामाला तो नक्की मान देईल याचा मला जास्त विश्वास आहे… !
खुप वेळ झाला, मी जायला उठलो… मेघा आणि आज्जीचा निरोप घेतला… पुढच्या शुक्रवार पासुन रोज घरी येणार असं सांगुन गाडीवर बसलो… किक मारणार… एवढ्यात सलीमने हातानं थांबायची खुण केली… म्हटलं, “काय रे?”
जवळ आला… हातात एक डब्बा ठेवला… म्हटला… “मामा… ये नशेका डब्बा है, लेके जाव… फेक दो…”
मी अविश्वासाने पहात राहीलो… मेघाचे डोळे पाण्यानं डबडबले…
निघताना सलीम खाली पायाकडे झुकला, म्हणाला, “मामा… नशेमे गाली दे दी मैने माफ कर दे… आज जुम्मे को तु मिला… शायद अल्लाह ने तेरकु भेजा… आजकी नमाझ सच मे कबुल हो गयी… बस तु एक बार बोल दे …माफ किया सलीम…!”
मी वाकलेल्या सलीमला छातीला लावलं… हळुच कानात म्हटलं… “माफ कर दिया बेटा…”
“सच???” म्हणत त्याने मला कडकडुन मिठी मारली… आणि माझ्या पाठीवरुन हात फिरवत राहिला….
माझा सगळा शर्ट त्याच्या अश्रुंनी भिजुन गेला होता… आणि मेघा दुरुन आपल्या पदरानं डोळे पुसत होती…
Leave a Reply