२६ फेब्रुवारी सोमवारी, शंकराच्या मंदिराबाहेर आमची आपली नेहमीप्रमाणे धांदल सुरु होती…
अशात माझा फोन वाजला… उचलेपर्यंत कट् झाला… पुन्हा वाजला… पुन्हा कट्… आता उचलायचाच नाही असा विचार करुन काम चालुच ठेवलं…
पुन्हा थोड्यावेळाने त्याच नंबरवरुन फोन… उचलला…
“हॅलो… सोनवने सायेब हायत का?”
“होय सर, बोलतोय, बोला…”
“नाय नाय… डाक्टर सोनवने सरान्ला द्या ना…”
“हो सर, मीच बोलतोय बोला ना…कोण बोलतंय…?”
“मला नाय वळकलं सर? वळका मंग आदी…” आता त्या बोलण्यात एक प्रकारचा लाडीकपणा आणि थट्टेचा सुर जाणवला…
आवाज माणसाचा होता… आवाज ऐकल्यासारखा वाटत होता, पण लक्षात येत नव्हतं…
समोर भिक्षेक-यांची गर्दी… मला कुठलाही फोन आला कि ते वैतागतात… आज त्यांच्या भेटीचा हक्काचा वार असतो आणि त्यात त्यांना कुणीही वाटेकरी नको असतो…
आणि इकडं ही व्यक्ती मला कोडी घालत होती…
“वळका ना वो सर…” पुन्हा तोच लाडीक आवाज…
मी म्हटलं, “आवाज ओळखीचा वाटतोय सर, पण इथल्या गोंगाटामुळे लक्षात येत नाहीये, मी रिकामा झाल्यावर फोन करु आपल्याला?”
“हां… बराब्बर, मला म्हायताय, आज सोमवार, डोंगरावरल्या शंकराच्या मंदिरात आसनार तुमी या टायमाला, तीकडं लय गर्दि आस्ती…”
मी चक्रावलो… याचा अर्थ ही व्यक्ती मला “चांगलंच” ओळखते…
मी म्हटलं, “सर बरोबर आहे, पण मी नंतर फोन करु का? तुम्ही नाव पण सांगत नाहीये… प्लीज हां…” म्हणत मी फोन कट् करणार, इतक्यात तो म्हणाला… “सर इसरला तुमी मला? आवो मी परश्या…!”
मला तरी लक्षात येईना… परश्या…? मी बुद्धीला ताण द्यायला लागलो… कोण हा परश्या?
एवढ्यात तोच म्हणाला, “आवो सर नाय का मागच्या म्हयन्यात तुमी म्हाबळेश्वरला मला हाटेलात काम दिलं… मला एसी कारमदी तुमीच बसवुन पाटवलं, कसं काय इसरला…?”
माझी ट्युब पेटली… हां परश्या… प्रशांत…!
टगेगीरी करत, गुटखा खात, तोंड वेंगाडत भिक मागायचा… एका फाईव्ह स्टार रेसॉर्टमध्ये याला कामासाठी तयार केलं होतं… फुकट मिळतंय ते सोडायचं, हेच त्याला पटत नव्हतं… थोडं गोंजारुन थोडं फटकारुन खुप दिवसांनी याला कामाला तयार केला…
जाण्याच्या आदल्या दिवशी म्हणाला होता… “चांगली कापडं न्हाईत माज्याकडं…” मी माझे न वापरलेले मग चांगले शर्ट त्याला दिले…
जाताना गळ्यात पडुन रडला होता… एसी गाडीत बसुन बावचळला होता, त्यापेक्षा जास्त घामानं थबथबलेला होता…
आणि ही मुलं गेल्यानंतर “दहा पोरांचा बाप” या शीर्षकाखाली मी एक ब्लॉग लिहीला होता…
झरझर मागचे प्रसंग डोळ्यासमोर तरळले…
हा कधी मला असा फोन करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं… म्हणुन नाव सांगुनही माझा गोंधळ उडाला होता…
मी म्हटलं, “प्रशांत, कुणाच्या फोनवरुन फोन केलायस?”
म्हणाला, “सर माजाच हाय, मी घेतलाय… पगारातुन!”
मी म्हटलं, “तु ठेव. तुझा बॅलन्स संपेल, मी करतो इकडुन…”
“नाय नाय, ठिवु नका… आनलिमिटेड कार्ड हाय आपलं… बोलत राव्हा… आयुष्यातला पयला फोन माजा हा… पयला फोन मी तुमालाच केलाय…” मी या वाक्याने शहारलो…
कुणाच्या तरी आयुष्यातल्या “पयल्या” फोनचा मी मानकरी ठरलो होतो… कुणाच्यातरी मनात “पयल्या” नंबरवर होतो… याचं अप्रुप किती वाटलं, शब्दांत कसं मांडु?
माझा गळा दाटुन आला, तशातही म्हटलं… “कसा आहेस रे?”
म्हटला, “सर सगळ्ळं मिळतंय म्हाबळेश्वरला…”
मी म्हटलं, “होय का? खरंच?” महाबळेश्वर कधी मी पाहिलंच नाही अशा आविर्भावात मी गंमतीनं बोललो…
“मज्जा आहे आता तुझी..!”
तर आवाज पाडत म्हणाला, “नाय वो सर… मज्जा कसली… सगळं हाय तरी पन…”
तो अडखळला…
मी सावरुन थोड्या साशंकतेने म्हटलं, “काय रे पण काय…? सांग की…!”
“सर सग्गळं हाय वो पन तुमी नाय ना हितं…! आटवड्याला आपली गाठ तरी पडत हुती…”
तिथल्या एव्हढ्या गोंधळातही त्याचा हुंदका मी ऐकला…
त्याच्या हुंदक्यानं इतका वेळ ताब्यात ठेवलेल्या माझ्या गळ्यानंही साथ सोडली… मला बोलताच येईना… कसं बोलणार? डोळे भरुन आले…
कोण मी, कुठला? हा माझ्या आयुष्यात येतो काय? मी सांगेल तसं, हिप्नोटाईझ झाल्यासारखं वागतो काय? माझी आठवण काढुन रडतो काय? “पयल्या” गोष्टीचे मान मला देतो काय?
खरंच माणसाकडे दोन मायेची माणसं नसली, तर पैसा अडका, गाडी बंगला, नोकरचाकर सगळं सगळं असुनही तो भिकारीच असतो…
आज कुठलंही नातं नसतांना कुणी माझी आठवण काढुन रडतंय… त्याच्या मायेच्या माणसाच्या यादीत मला स्थान देतंय…
मला पुन्हा आज जाणिव झाली, मी खरंच खुप खुप श्रीमंत आहे…!!!
हा भर ओसरल्यावर तो म्हणाला, “सर तुमच्या बुटाचं माप काय वो? सांगा फाटदिशी, मी मार्केटमदी आलोय…”
मी म्हटलं, “वेडा आहेस का? महाबळेश्वरला बुट वैगेरे आणि इतर सर्वच गोष्टी महाग मिळतात… काही आणु नकोस… पैसे साठव ते… तुझं बँकेत खातं उघडता येतंय का बघु आपण…”
“नाय वो सर, काय महाग नाय… तुमी माप सांगा, मी आन्ला आस्ता मनानं माज्या पन, बसला नाय तर पुना वांदे नको…”
मी म्हटलं… “बरं चल, तुला आणायचंच असेल तर फुटाणे आण आणि मला तोंडाला बांधण्यासाठी एक मोठा रुमाल आण… धुळीचा त्रास होतो मला… ओके?”
“नाय वो सर… काय बोलताय तुमी, बुटाचं माप सांगा ना…” कळवळुन तो म्हणाला…
अरेच्च्या… बुटासाठी काय हा मागं लागलाय कळेचना…
मग त्याच्याच स्टाइलनं त्याला गंमतीनं म्हटलं, “परशा आता ठेव, आपण लय वेळ बोल्तोय, आता तुजे हितले भाउबंद मारत्याल मला…”
“नाय नाय सर, माप सांगितल्याबिगर फोन ठिवु नका…”
मी थोडा बाजुला आलो, थोडं रागावण्याच्या सुरात म्हटलं… “बुटाचं काय रे सारखं,..? फुटाणे आण, रुमाल आण म्हणतोय ते आणत नाहीस… काय सारखं सारखं बुटाचं माप, बुटाचं माप करतोयस? एकदा नको म्हटल्यावर… पुन्हा पुन्हा तेच… चल ठेवतो मी…”
खुप नम्रपणे पण अत्यंत निश्चयी स्वरात तो म्हणाला… “सर मी तुमाला शर्ट पँटचं माप नाय विचारलं… गॉगल, कॅप नाय विचारलं… मी हे घेवु शकतो तुम्हाला माज्या पयल्या पगारात… पण मला बुटच घ्यायचाय तुमाला…”
“कसं हाय, मी काय रोज भेटत नाय तुमाला… रोज तुमच्या बुटाला हात लावुन नमस्कार नाय करु शकत… माजी आपली भावना हाय… तुमाला देताना माजं हात लागत्याल त्या बुटाला… तुमी त्यो रोज वापरणार माज्या हातचा बुट, म्हणजे माजा नमस्कार पोचलंच की सर रोज तुमाला… आसा पन तुमचा बुट लय खराब झालाय, टाकुन द्या आता त्यो…आता तरी द्या नंबर सर…!”
मी सुन्न…!!!
असंस्कृत वातावरणात राहुन इतका सुसंस्कृतपणा यानं आणला कुठुन…?
ओरबाडुन खाणा-यांत राहुनही दुस-याला द्यायचंय, हे तो शिकला कुठुन…?
कायम द्वेष आणि तिरस्कार करणा-यांच्या गर्दीत राहुनही हे असं प्रेम करायला शिकला कुठुन…?
तो आणखीही बरंच काही बोलला असावा… मला पुढचं काहीच ऐकु नाही आलं…
मंदिराचा कळस खरंच हलत होता की माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे हा भास होतोय…
मंदिरात अचानक हा घंटानाद सुरु झालाय की माझ्याच हृदयातली धडधड वाढलीये कळत नव्हतं…
नकळतपणे मी माझ्या बुटांकडे पाहिलं… मळलेले… रंग उडालेले… दोन ठिकाणी शिवण उसवलेले… टाचा झिजलेले… टाकुन देण्याच्या लायकीचे…
हो…असुदे…! पण हे त्याला कसं कळलं…? मी त्याचा पालक म्हणुन इथुन नकळतपणे त्याच्यावर लक्ष ठेवुन आहे… पण …पण तो ही माझ्यावर लक्ष ठेवुन आहे…???
घार उडते आकाशी, लक्ष तीचे पिलापाशी…
पण इथं घार कोण आणि पिल्लु कोण…?
कोण कुणाचा पिता होता…? मी त्याचा की तोच माझा…?
आत्ता भेटला असता ना तर… चांगला खडसावुन काढला असता…
कुणी रस्त्यावर असं रडेपर्यंत असलं प्रेम करायचं असतं का रे…
आणि हळुच मिठी मारुन कानात त्याला म्हटलं असतं…
परश्या… गधड्या… आज तुच माझा बाप झालास की रे…!!!
Leave a Reply