महिला दिनाच्या शुभेच्छा !!!

आज जागतिक महिला दिनानिमित्त १३ महिला भिक्षेक-यांची (आज्ज्यांची) डोळेतपासणी केली. १५ मार्चला यांच्या डोळ्यांची ऑपरेशन्स होतील..!

सहज गंमत म्हणुन सांगतो, मागच्या आठवड्यात एक आज्जी भेटली, मला बाजुला घेवुन म्हणाली, “मला, रंगीत चष्मा पायजे…” मी म्हटलं, “चष्मा कुठं रंगीत असतो…?”

“डोळ्याला जर दिसायला अडचण आली तर तपासुन चष्मा देतात… चल माझ्याबरोबर, तपासु आपण डोळे आणि नंबर असेल तर चष्मा करु…”

म्हणाली, “माज्या डोळ्याला काय धाड नाय भरली… मला तसला चष्मा पायजे…”

तीने एका ऍक्टिव्हा चालवणा-या गॉगल घातलेल्या मुलीकडे बोट दाखवलं,…

मला हसु आलं… मी म्हटलं, “तो गॉगल आहे… तु घालशील तो? तो उन्हात त्रास होवु नये म्हणुन वापरतात…”

ती म्हटली, “का रं बाबा, ती चांगल्या घरातली म्हणुन तीला उनाचा तरास हाय… आमी भीक मागतो आमाला गरीबाला उनाचा तरास होत नसंल?”

मी अंतर्मुख झालो… खरंच मी या गोष्टीचा विचार नव्हता केला..!

तरी मी म्हटलं, “मावशे, काही काम करशील तर तु पण असला गॉगल घेशील…”

म्हणाली, “ते तर करीनंच रं बाळा, पन ल्येक म्हणुन तु मला आदि घिवुन दे… तसला चष्मा… न्हायतर मी बोलनार न्हाय तुज्यासंगं..!”

आज तीच्यासाठी एक नविन गॉगल घेतला… माझ्या हाताने मी तीला लावला…

लहान पोरीप्रमाणे सगळ्यांना कौतुकानं दाखवत फिरत होती… माज्या लेकानं मला आनला असं सांगत…

तीचा आनंद मी शब्दांत मांडुच शकत नाही…

मी म्हटलं, “अगं हळु… पडेल, फुटेल तो चष्मा…” सहज बोलुन गेली… म्हटली… “फुटनार न्हाय, आनी फुटला तरी तु काम देनार हायेस त्या पैशानं मी नवा इकत घीन…आज तु दिलास उद्या तुला बी इकत आनुन देइन…”

वाक्यं साधीच आहेत… पण या वाक्यांत खुप रंग आहेत…

एकतर ती काम करायला मानसिक दृष्ट्या तरी तयार आहे… दुसरं… मी विकत घेवुन तुला देवु शकते, हा आत्मविश्वास आहे… आणि तिसरं, “मला” मिळाल्यावर, मी “तुला” पण देईन हे म्हणण्याची दानत आहे…

का कोण जाणे पण आजच्या महिला दिनादिवशी मला असं वाटलं… चला हे महिला सबलीकरणाच्या ध्येयाकडे एक छोटं का होईना पण तीनं पाउल तरी टाकलं…

हळुहळु “मी” पासुन “तु” कडे प्रवास तरी चालु झाला…

आणखी काय बोलु…?

आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांना नविन दृष्टी मिळो…

भिकेची कुबडी सुटुन स्वकष्टाने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहोत…

घेता घेता भविष्यकाळात या दाता होवोत…

सुरकुतलेल्या या हातांना उबदार मायेचा हात मिळो…

फाटक्या त्यांच्या पदरातुन लाचारी गळुन पडो…

झोळीत यांना कधी तरी स्वाभिमानाचे दान मिळो…

एक मुलगा आणि नातु म्हणुन काय काय मागु आजच्या दिवशी..! यातली एक जरी ईच्छा माझी पुरी झाली तरी कुठलीही महिला दीन होणार नाही…

 

1 Comment

  1. Tumche blogach tumchya samajsevebadal sarv kahi sangun jatat. Apratim karya ahe tumch ani tumchya teamch.best luck for u and best luck for the golden feature of the people you work for.

Leave a Reply

Your email address will not be published.


*