धायरी फाटा, पुणे… अभिरुची मॉलसमोर… एक म्हातारा जीव फुटपाथवर पडुन आहे… ब-याच वर्षांपासुन… लोक त्याला वेडा म्हणतात… कुणी मतिमंद… कुणी काय… कुणी काय..!
कुणी हाकलुन देतं… कधी कुणी खायला देतं… आपल्याला भुक लागलेय किंवा आपण काय खातोय हे या बाबांना कळत नाही…
पुर्ण परावलंबी…
आमच्या पवन लोखंडे ला हे बाबा दिसायचे रोज… घाणीत पडलेले… कधी भर उन्हात भुकेनं तडफडणारे… केस वाढलेले… डोक्यात अक्षरशः अळ्या पडलेल्या…
पवन एकदा म्हणाला, “सर याचं काहितरी करुया ना..!”
शेवटी शुक्रवारी ९ मार्च ला यांना पाहुन आलो… अत्यंत वाईट अवस्था… मतिमंद असल्यामुळे… आणि फिट्स चा त्रास होत असल्यामुळे, आपण स्वतःच्याच मल मुत्र विष्ठेत झोपतो याची या बिचाऱ्याला जाणिव नाही…
बरं जाणीव करुन तरी कशी द्यावी..? हे बाबा पुर्ण बहिरे आहेत…
आम्ही ठरवलंय… यांना इथुन फुटपाथ वरुन उचलायचं, आणि माणसांत नेवुन ठेवायचं…
पोलीस वैगेरे सर्व सोपस्कार करुन मंगळवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता यांना माझ्या मित्राच्या वृद्धाश्रमात दाखल करणार आहोत…! (अशा व्यक्तीला ते दाखल करुन घेणार हा त्यांचा मोठेपणा)
या सर्वाआधी त्यांना स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे… याचसाठी १३ तारखेस त्यांना नेण्याअगोदर त्यांची पुर्ण स्वच्छता केली आहे…
त्यांची स्वच्छता करण्यांत आम्हाला मदत करणा-या रस्त्यावरच्या लोकांचे ऋणी आहोत…
सन्मानाने यांना रस्त्यावरच्या जगातुन माणसांत आणण्याचा माझा हा छोटा प्रयत्न!!!
हे बाबा कुणाचे तरी वडिल असतील, कुणाचे तरी भाउ – बहिण… पण यांना अशा मतिमंद अवस्थेत का बरं सोडलं असेल या जवळच्या नातेवाईकांनी? सध्या तरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे..!
रस्त्यावरची जनावरं… एकमेकांची काळजी घेतात… आपण माणसं असुन…?
खरंच आपण माकडापासुन माणुस झालो,… की… आता हा आपला उलटा प्रवास आहे..? सध्या हा ही प्रश्न अनुत्तरीत आहे..!
९ तारखेला… या बाबांना चेक करायला गेलो असता पहायला आलेल्या लोकांनी मला नी पवनला विचारलं… “तुम्ही या बाबांचे कोण?” आम्ही हसत म्हटलं… “मुलंच आहोत आम्ही यांची…”
म्हणाले… “क्काय? इतके दिवस कुठे होतात? आत्ता आलाय… किती उशीर?”
तितक्याच शांतपणे त्यांना सांगितलं… “अहो आधी कसं येणार… आम्हीही हल्ली हल्लीच माणसात आलोय..!”
Leave a Reply