तुकाराम सोनवणे !

धायरीच्या या बाबांना वृद्धाश्रमात आज घेवुन जायचं… आदल्या दिवशी आमची लगीनघाई… गाड्या सांगा, बाबांना कपडे, साबण, रस्त्यावरच आंघोळ घालण्याचे सर्व साहित्य… त्यांना पोळीभाजीचा डबा… ज्या वृद्धाश्रमात नेणार आहोत त्यांना विनंती आणि आठवण, पोलीसांना द्यायची कागदपत्रं आणि इतर पत्र… हुश्श्श्… पण झालं एकदाचं…

आज १३ तारीख… आम्ही सगळे ९ वाजता जागेवर हजर… चलो, बाबांना पुन्हा आंघोळ घालायची, पुन्हा दाढी कटींग, की बसलो गाडीत, आणि पोचायचं वृद्धाश्रमात…

पण नाही… आज असं होणार नव्हतं…

१० वाजले, सांगीतलेली एकही गाडी आली नाही… त्यांना फोन लावले… दोघांनाही काहीतरी अडचण, ते येवु शकणार नव्हते…

वृद्धाश्रमात फोन लावले… सर्व फोन स्विच ऑफ आणि नेमका पत्ता मला माहित नाही… मी स्वतःवर चरफडलो… आपण नीट पत्ता का नाही घेतला? बरं डायरेक्ट विचारत जावं तर हे ठिकाण पुण्यापासुन ६० किमी वर… तीथं जावुन कुणी भेटलंच नाही तर हसं होणार…

काय करावं कळेना… ११ वाजले कशाचाही पत्ता नाही…

फोन सतत त्या वृद्धाश्रमात… पण नो रिप्लाय… असेल त्यांचीही बिचा-यांची काही अडचण..!

मी पुणे जिल्ह्यातल्या माझ्या ओळखीतल्या सर्व वृद्धाश्रमात फोन लावले… पण त्यांनाही असं ऐनवेळी फोन करुन, माझ्या या माणसाला घेणं सोपं नव्हतं… त्यांच्याही काही प्रोसेस असतात… त्या पाळाव्याच लागतात, आणि माझ्यासाठी त्या मोडा असं सांगणं माझ्या जीवावर आलं…

तसा अगदी हक्काचा माझा मित्र आहे रवी बोडके साता-यात… यांनी काहीही करुन मदत केलीच असती पण काही कारणाने मला या बाबांना पुण्यातच ठेवायचं होतं…

१२ वाजले… मी पुर्ण ब्लँक… नुसते फोन आणि सगळीकडुन नकार…

आज असं कसं झालं..? गाडी नाही… कुणी या बाबांना घेवुन या म्हणणारं नाही…

वाटलं उगीच आपण या बाबांच्या आणि मला मदत करणा-या लोकांच्या भावनेशी खेळतोय..!

मी सगळ्यांकडे पाहिलं… सगळे एका जागेवर खिळुन खिन्नतेने बसले होते…

एखादा फोन लावला की आशेनं माझ्याकडे बघायचे… माझ्या चेह-यावरची निराशा बघुन दुसरीकडं तोंड फिरवायचे…

एव्हढ्या सगळ्यातुन भुवड बाबा म्हणाले, “चला चहा घेवु… तोवर काहीतरी सुचेल…”

अनिच्छेनेच चहाला गेलो…

चहाच्या टपरीच्या बाजुला… निराश होवु नका अशा अर्थाचा तुकाराम महाराजांचा एक अभंग लिहीला होता… तो वाचुन खरंच उभारी आली… पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती…

पण तुकोबांच्या या अभंगाने खरंच काही प्रमाणात निराशा कमी झाली…

१२:३० झाले…काहीही झालं नव्हतं…

माझ्याबरोबर आलेले लोक वडिलकीच्या नात्याने म्हणायला लागले… “जावु द्या डॉक्टर … असतो एखादा दिवस वाईट… पुन्हा चार दिवसांनी येवु… चला…!”

एव्हढ्यात भुवड ताई बोलल्या, “विनोद शहा सरांना एक फोन करुन बघा बरं सर…”

विनोद शहा…!

हिमालयाएव्हढं उत्तुंग व्यक्तीमत्व… सामाजीक कार्यात माणसानं किती उंच असावं तर विनोद शहा सरांसारखं…

२००० भिक्षेकरी आणि गरीब मुलांना शिक्षण…
शेकडो भिक्षेक-यांचं पुनर्वसन…
तेव्हढ्याच भिक्षेक-यांचा सांभाळ…
आपल्या विविध प्रकल्पातुन हजारो गोर गरीबांना यांनी पोटाला लावलंय…

काय आणि किती सांगु..?

बरं, सरांचं कौतुक करायला जावं, तर ताड्कन म्हणतात… “अजुन कुठं काय केलंय रे मी… अजुन खुप राहिलंय… जेव्हा ते करीन तेव्हा बोल..!”

सरांना घाबरत फोन लावला… कारण ऐनवेळेला मी त्यांना अडचणीत आणत होतो…

चाचरत सर्व परिस्थिती सांगीतली… सगळं ऐकुन झट्कन म्हणाले… “ये रे ऑफिसवर घेवुन त्या बाबांना… मी बघतो पुढचं..!”

माझा विश्वासच बसेना…

माझा आनंदी चेहरा पाहुन पेंगुळलेल्या सगळ्याच मंडळीत उत्साह पसरला… दिवाळी असल्यागत…

हि माणसं पण बघा कशी…

बाबांची सोय होत नव्हती तर सुतक आल्यासारखे चेहरे करुन सगळे तोंड पाडुन बसलेले… जसं काही यांचं काही सर्वस्व बुडालंय …आणि बाबांची सोय होत्येय म्हटल्यावर आनंद असा की लॉटरी लागली आहे… यांनाच काहीतरी मिळणार आहे…!

यांच्या मोठेपणाची उंची आभाळाएव्हढी आणी मायेची खोली समुद्राएव्हढी…

आणि मी किती नशीबवान की समुद्र आणि आभाळ या दोघांनीही मला एकाचवेळी पदराखाली घेतलंय…

हे लोक आणि तुम्ही सर्वचजण… तुमच्याशिवाय मी अपुर्ण आहे… अव्यक्त आहे..!

असो… तर आता कुठं जायचं ते ठरलं… चला पोलीसांना कळवुन निघु, म्हणत पोलीस स्टेशनला सर्व कागदपत्रं दिली…

पोलीसांनी प्रश्न विचारला, “बाबांचं नाव?”

मी म्हटलं… “अहो, अपरिचित इसम असं लिहा ना…”

वर्तमानपत्रात मी असं ब-याचवेळा वाचलं होतं म्हणुन बोलुन गेलो…

“ते नका वो सांगु..? हितं नाव लिहायला लागतंय… ते सांगा…”

आता मला पुन्हा टेन्शन आलं… पुन्हा तुकोबांचा तोच निराशेतुन बाहेर येण्याचा अभंग आठवला… आणि… आणि मी झट्कन बोललो… तुकाराम… बाबांचं नाव तुकाराम..!

पोलीसांनी… बोलत बोलत कागदावर लिहीलं… तु – का – रा- म…

मी भुवड ताईकडे डोळे मिचकावत हसत पाहीलं…

तेव्हढ्यात पुढचा प्रश्न… “आणि आडनाव?”

मी विचारात पडलो… काय सांगु आडनाव?

खरं सांगायचं, तर या बाबांसाठी आम्ही त्यांची मुलं आहोत हे समजुनच सर्व मी करतोय… एका अर्थाने मीच त्यांचं पालकत्व स्विकारलंय… यांचं काहीही भलं बुरं झालं तर ते मला कळवले जाईल आणि मीच जबाबदार असेन अशी सर्वत्र नोंद होणारच आहे…

म्हणजे मी नात्याने त्यांचा कुणीच नसुनही, त्यांचं सर्वस्व होणारच आहे… ते या क्षणापासुन माझ्याच घरातले होणार… माझ्याच घरातले असते तर त्यांचं आडनाव काय असतं..? सोनवणे हेच ना..?

मग????

मी न घाबरता दिमाखात सांगितलं… “त्यांचं आडनाव सोनवणेच आहे..!”

पोलीसांना म्हटलं… “पुर्ण नाव लिहा सर, तुकाराम सोनवणे..!”

पोलीसांनी तेच लिहिलं…

बापानं पोराचं बारसं करुन आपलं नाव देणं… ही झाली “रीत” .. आज पोरानं बापाचं बारसं करुन त्याला आपलं नाव द्यावं हे मात्र जरा “विपरीत

कागदावर त्यांचं नाव वाचुन मला खुप भरुन आलं..!

ज्याला लोक निनावी समजायचे त्याला आज नाव मिळालं…

रस्त्यावर कुत्र्यासारखं जगणाऱ्याला एक घर मिळालं…

ज्याला बेवारस समजायचे त्याला एक पोर मिळालं…

माझे डोळे पाणावले… एका नावाने किती जादु झाली होती..!

परत आलो… बाबांना मस्त नवे कपडे घातले… इन शर्ट केला… बाबा मस्त दिसत होते… प्रत्येकाने हौसेनं त्यांच्याबरोबर फोटो काढले…

आणि आमची वरात… डॉ. विनोद शहा सरांच्या ऑफिसात आली…

सर वाट बघत होते, म्हणाले “अरे, मी त्रिवेंद्रमला चाललोय… तुझ्याचसाठी थांबलोय… यांना घेवुन तु आपल्या कात्रजच्या वृद्धाश्रमात घेवुन जा, मी बोलुन ठेवलंय…”

हिमालयाएव्हढा माणुस… आमच्यासाठी थांबतो काय… एव्हढ्या व्यस्ततेतुन आम्ही येण्याआधीच बीनबोभाट आमची सोय करतो काय…

माझं त्यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे… हिमालयापुढं एक मातीचा ढिगारा..!

मी त्यांना तसं बोलुनही दाखवलं… या उपर हा मोठा माणुस मला काय म्हणाला, हे सांगणं म्हणजे आत्मस्तुती ठरेल..!

मी त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हटलं… “सर, तुमच्या पंखाखाली… सावलीखाली फक्त ठेवा…”

सरांनी मायेनं जवळ घेतलं…

अंगात वीज चमकावी तसं झालं… साहजीकच आहे, इतक्या तेजःपुंज सुर्याच्या, इतक्या जवळ गेल्यावर असं होणारच की…!!!

आता पुण्यातुन कात्रजच्या घाटातुन आडवळणाने वृद्धाश्रम गाठणे आले…

आमच्याकडे वाहन नाही… रिक्षा / ओला / उबेर च्या कोणत्याही गाड्या इतक्या आडबाजुला जात नाहीत…

सहा लोकांनी जायचं ठरलं…

नाही म्हणायला नवरे काकांची लालपरी होतीच… पण सहा जणं एका रिक्षात? कात्रजचा घाट चढेल कशी ही बिचारी इतक्या जणांना घेवुन?

तरी पर्याय नव्हताच… मागे चार लोक “कसेबसे” बसले, नवरे काका ड्रायव्हिंग सीटवर… मी एकटाच खाली उरलो… मी मग बसलो नवरे काकांशेजारी, ड्रायव्हिंग सीटवर … मस्त पाय बाहेर काढुन…

कात्रजच्या घाटात… भर रहदारीत पाय बाहेर, देह रिक्षात आणि निम्मं डोकं रिक्षाबाहेर… रिक्षाची एक दांडी उजव्या मुठीत… दुसरी दांडी डाव्या मुठीत…

“जीव मुठीत धरणे” ही म्हण असाच प्रवास केलेल्या माझ्यासारख्यानेच रचली असावी अशी खात्री पटली..!

कसरती करत शेवटी पोचलो जनसेवा फाउंडेशन च्या प्रांगणात… ती भव्य इमारत आणि त्याहुन दिव्य निसर्ग पाहुन भारावुन गेलो…

इथं आम्हाला भेटले सर्व जाती धर्मातले आजी आजोबा…

हे वयानं थकले नव्हते… ते थकले होते… आम्ही काय पाप केलंय म्हणुन बेवारस ठरलोय हा विचार करुन…

इथं भेटली, स्वप्नं डोळ्यातच विझलेली अंध लहान मुलं… डोळ्याच्या खोबणीत अंधार भरलाय… कुणी उजेड देईल का यांना..?

तारुण्य जळुन गेलेल्या… तरुण (?) मुली… गेलेलं तारुण्य कोण देईल यांचं?

बालपणीच म्हातारी झालेली, अकाली प्रौढत्व आलेली लहान मुलं… यांना पुन्हा लहान करुन देणारं मशीन असेल तर मला हवंय,… किंमत कितीही असो… मला वैयक्तिक किंमत नसली तरी मी विकुन घेईन स्वतःला… हे मशीन विकत घेण्यासाठी…

बोन्साय करुन ठेवलंय या पोरांना… समाजानं…

धावतांना एक १० वर्षाचा मुलगा मला हलकेच धडकला… परत येवुन म्हणाला… “मला माफ करा… आपल्याला लागलं तर नाही ना माझ्यामुळे सर? माझ्यामुळे त्रास सर..!”

मनात म्हटलं, “कशाचा सर रे येड्या… तु लहान बाळ रे माझं…. काका म्हण… मामा म्हण… काहिच नाही तर गड्या गुपचुप पळुन जा… माजी गंमत दुरुन बघ… तुझ्या वयाला तेच शोभतंय रे… सर बीर भाषा बोलाय येवडा तु मोटा नाय झाला…”

“मला मामा म्हण… सर नको म्हणु…” त्याचे डोळे चमकले… मला म्हटला… “मामा खाली वाक… तुला कायतरी सांगायचंय” … मी वाकलो… कानात कुर्र् केलं… आणि पळुन गेला… जातांना म्हणाला… “मामा तुला कसं फसवलं…” मी म्हटलं… “येड्या… मला सगळ्यांनी फसवलंय… तु एकटाच आहेस फक्त ज्याने कबुल केलंय..!”

असो…

नाही म्हणायला… दुःखात सुखाची गोष्ट इतकीच की सरांच्या ऑफिसला भेटलेले गायकवाड सर, मनिषा मॅडम आणि रेक्टर प्रदिप सर ही मायेनं ओथंबलेली माणसं भेटली…

शेवटी माझ्या या बाबांना रुम मिळाली , हक्काची कॉट मिळाली…

मी हातात हात घेवुन त्यांना जाताना म्हटलं… “बाबा माझं नाव अभिजीत सोनवणे… आणि तुमचं नाव तुकाराम सोनवणे… हेच तुमचं नाव आणि हेच घर आजपासुन तुमचं… नीट रहा… मी येईन परत भेटायला…”

त्यांना नक्कीच काही ऐकायला गेलं नसेल… कारण ते बहिरे आहेत…

तरी त्यांनी माझा हात घट्ट धरुन ठेवला… ते मुके आहेत… तोंड उघडण्याचा, काहीतरी बोलण्याचा, सांगण्याचा प्रयत्न ते करत होते… त्यांना काहितरी बोलायचं होतं… पण ते बोलु शकले नाहीत…

आणि मी जे बोलत होतो ते ऐकु शकले नाहीत…

परमेश्वर किती क्रुर आहे… ते बोलु शकत नाहीत… आणि मी जे बोलतोय ते ऐकु पण शकत नाहीत..!

पण नाही, परमेश्वर दयाळु पण आहे… त्याने आम्हाला डोळे दिले आहेत… स्पर्श संवेदना दिल्या आहेत…

बाबा माझा हात धरुन माझ्याकडे पहात होते… माझा हात कुरवाळत होते… त्या डोळ्यात अश्रु होते… आणि स्पर्शात प्रेम…

जातांना मी हात जोडले… भरलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला… म्हटलं, “जावु बाबा आता?”

बोलण्याची धडपड करणारं …जीवाच्या आकांतानं ….बोलायला धडपडणारं, वेडंवाकडं होणारं त्यांचं तोंड मी पाहु शकलो नाही… बघुच शकत नव्हतो मी ती धडपड,.. ती तडफड…

मी निघालो तिथुन… डोळ्यातलं पाणी लपवत..!

मी विचार करत होतो… या बाबांना जाताना काय सांगायचं असेल मला?

“नीट जा बाळा घरी…” असं? , की

“पुन्हा ये मला भेटायला..” असं? , की

“सगळेच सोडुन गेले रे… तु तरी नको ना रे जावुस सोडुन मला अभिजीत…” अस्सं…?

नेमकं काय? नेमकं काय?

आयुष्यभर मला हा प्रश्न छळत राहील…

देवा, एकदाच मला त्यांच्या तोंडुन ऐकु दे, मी सोडुन जातांना त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते…?

प्लीज… प्लीज…!!!

कसं सांगु रे तुला..?

1 Comment

 1. आज अपघाताने ….हो अपघाताने च आपला व्हाट्स ॲपवर फिरणारा मेसेज वाचला
  मन हेलावले आपला अनुभव वाचून
  आपल्या सारखी मानसं या जगात आहेत यामुळे उर भरून आला
  तुम्ही करित असलेले कार्य फार महान आहे
  आपले कार्य पाहिले की स्वत: ची लाज स्वत: लाच वाचली
  आणि आपला अभिमान सुध्दा…..
  You are really a great man

Leave a Reply

Your email address will not be published.


*