माहितीसाठी…

माझ्या कामाचा मुळ हेतु आहे, भिक्षेक-यांचा शारीरीक आर्थिक मानसीक विकास व्हावा. हे भिक्षेकरी काम करुन पायावर उभे आहेत… पण अनंत आजार मागे आहेत, मला असं नकोय…

किंवा…

शरीरानं तंदुरुस्त आहेत… काही आजार नाही… पण भिक मागताहेत, असं पण नकोय…

या दोन्ही बाबींची सांगड घालत जे धडधाकट आहेत त्यांना कामासाठी विनवतोय आणि ज्यांना काही त्रास असेल त्यांच्या रक्त तपासण्या, वेगवेगळी ऑपरेशन्स करुन देतोय…

हेतु हा की काम करणे टाळण्याचा त्यांना कोणताच बहाणा मिळु नये…!

काल १५ मार्च अखेर एकुण ८६ लोकांची नेत्रतपासणी केली आहे.

या पैकि ४५ लोकांचे मोतिबिंदु ऑपरेशन आजपर्यंत पार पडली आहेत. उर्वरीत ४१ लोकांना त्यांना आवडतील ते चष्मे घेवुन दिले आहेत.

या सर्वांचे श्रेय आपलेच आहे, या न् त्या रुपात आपण बरोबर होतातच…!

शिवाय प्रत्यक्ष मदत करणारे भुवड बाबा, भुवड ताई, रॉबिनहुड आर्मीचे श्री. राठी, श्री. रहेजा, श्री. सुनील पवार, पवन लोखंडे, राहुल सावंत, श्री. नवरे, डॉ. वैभवी रावळ, श्री. बोबडे, सौ. अश्वीनी सोनार, सौ. सुरेखा व इतर सर्वच लेले हॉस्पिटल स्टाफ!

यांच्याशिवाय हे आव्हान मला एकट्याला पेलता आले नसते…!!!

आव्हानच… कारण यातील प्रत्येक ऑपरेशनच्या रुग्णाला किमान चार वेळा दवाखान्यात नेवुन परत जागेवर सोडावे लागते… रेग्युलर, इतर सर्व कामं सांभाळुन… जे अत्यंत जिकिरीचं आहे!

डॉ. मनिषा सोनवणे, माझी पत्नी… हिच्याबद्दल काय लिहु? ती माझ्या संस्थेची अध्यक्षा आहे… ती पाठीशी आणि बरोबर नसती तर, जे काही करतोय त्यातला अ… सुद्धा मला गिरवता आला नसता…

मी तुम्हां सर्वांचा ऋणी आहे…!

या कामानिमित्त एक एक मोती मला मिळाला आहे… त्यांना जोडुन माळ बनवणारा मी फक्त धागा… इतकंच माझं अस्तित्व…!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*