नेहमीसारखा… नेहमीच्या वेळी… नेहमीच्या ठिकाणी… शनिवारी.. १७ तारखेला…
भिक्षेक-यांची गर्दी… आज शनीला तेल वाहुन… पुण्य मिळवायचं म्हणुन पाचशेवर भक्त लायनीत… शंभरावर भिक्षेकरी…!
या भिक्षेक-यांतही दोन प्रकार असतात… एक गट… परिस्थितीने गांजलेली… काहीच काम करता येत नाही, म्हणुन झक्क मारत नाइलाजाने लाजत घाबरत भिक मागणारी मंडळी… मी यांच्यासाठी काम करतो…
दुसरा गट… ऐतखाउ, ऐदी… भीक मागणे हाच यांचा धंदा… ही शक्यतो २० – ५० या वयोगटातील मंडळी… गुन्हेगारी प्रवृत्तीची… दादागीरी करणारी…
मी यांच्या वा-यालाही उभा रहात नाही… यांना काहीच देत नाही… असो…
शनीला तेल वाहुन… पिंडीवर लाखो लीटर दुधाचा अभिषेक करुन पुण्य खरंच मिळतं..?
मी भक्तांना विचारतो… तेल का वहायचं..? तर शनीला शांत करायचं असतं…
हेच तेल गरीबाच्या स्वयंपाकात आलं तर? त्यांचा पोटातला अग्नी शांत नाही होणार नाही का?
तडफडणा-या पोराच्या तोंडात हेच दुध पडलं तर शंकर रागावतील का?
असो…!
या ठिकाणी… एक धनिक ऍक्टिव्हा वरुन येतात… पायात भला मोठ्ठा डब्बा… मी पहात होतो… यांत तुपातले मोतिचुर लाडु होते… डब्बा उघडायच्या आत या दुस-या गटातल्या तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दांडगटांनी दादागीरी करत, तोडांत दोन आणि दोन्ही हातात चार चार लाडु कोंबले…एक मिनीटाच्या आत सर्व लाडु संपले…
ज्यांना मिळाले लाडु ते खुष… पण ज्यांना नाही मिळाले त्यांनी… हातात लाडु असणा-यांवर हल्ला चढवला… दुस-या मिनीटाला खेचाखेचीत/ मारामारीत सर्व लाडवांचा चुराडा रस्त्यावर…
खुप जणांनी ही सांडलेली बुंदी रस्त्यावर रांगत रांगत, हाताने गोळा करत तोंडात घातली… कुणी खराटा आणला… खराट्याने रस्त्यावरची ही बुंदी एकत्र गोळा केली… ती मिळवण्यासाठी पुन्हा मारामारी..!
मी हतबल होवुन हे चित्र पहात होतो… निराश झालो… ज्यांना पायावर उभं करायचा विचार करतोय ते रस्त्त्यात रांगताहेत… बुंदीचे चार तुकडे तोंडात पडावेत म्हणुन…!
ज्यांनी लाडु वाटले… मी त्यांच्याकडे पाहिलं… ते मस्त हा नजारा पहात होते, ऍक्टिव्हा वर बसुन… चेह-यावर समाधान होतं… “मी” तुपातले लाडु खावु घातले याचं…
मला यांच्यातही देव दिसला… पण तो होता दगडाचा,.. भावनाशुन्य… मी चेह-यावर त्यांच्या माणुस शोधण्याचा प्रयत्न केला… पण छे… दगडाचा निर्जीव देव… “माणुस” कसा होईल…?
दुसरे एक धनाढ्य इसम आले… गळ्यातल्या सोन्याच्या चेनने आणि इतर दागिन्यांनी ते सजले होते… इतक्या दागिन्यांच्या आड कुणी “माणुस” असेल असं वाटलं मला… पण दागिने सोडुन माणुस कुठं दिसलाच नाही मला…
यांनी ७ – ८ उत्तम क्वालीटीचे किंमती शर्टस् आणले होते,..
तोंडाची बुंदी पुसत, हा गुन्हेगारी वृत्तीचा भिक्षेकरी समाज त्या शर्टांवर असा काही तुटुन पडला, की एखादा लांडगा शेळीवर तुटुन पडावा…
दोन मिनीटाच्या आंत… सर्व शर्टची लक्तरं… कुणाच्या हातात “बाही”… तर कुणाच्या हातात “काही”…
शर्ट मिळवण्यासाठी तीथं जे युद्ध झालं… त्या युद्धात सगळ्या नव्या को-या शर्टांच्या चिंध्या साचल्या रस्त्यावर…
का कोण जाणे… रस्त्त्यात पडलेल्या या चिंध्या मला भेसुर रक्तासारख्या दिसायला लागल्या…
आणि मी युद्ध जिंकुनही… तिथंच उभा… सर्वस्व हरलेल्या विजेत्यासारखा…
एका बाईने तर मला अंग झाकायला काहीच नाही हो… हे दाखवण्यासाठी… सहानुभुती मिळवण्यासाठी… आहेत ती अंगावरची कपडे काढुन फेकुन दिली…
मी त्या दागिन्यांच्या मालकाला शोधायला लागलो… दागिन्यांचा मालक… दागिन्यांसह केव्हाच पसार झाला होता… त्याच्या मते त्याने दान केलं होतं…! त्यांना माहितही नसावं की आपण दिलेल्या वस्त्रामुळं (?) इथं किती लोक नागडे झाले…
७ – ८ शर्टस् मिळवण्यासाठी ७० – ८०लोक इथं लढले… एकमेकांशी भांडले… एकमेकांशी लढले… एका शर्टपायी ३० – ४० जण जखमी झाले…
हे आले होते उघडे… आणि राहीलेही उघडेच… आणि किंमती शर्ट पडले होते रस्त्यात लोळागोळा होवुन… भिका-यांसारखेच…!
इतका वेळ, भीकेसाठी का होइना, पण एकत्र गुण्यागोविंदाने बसले होते… दान देवुन पुण्य मिळवण्याच्या नादात कुणीतरी येवुन त्यांच्यात फुट पाडुन निघुन गेलं… त्यांना जखमी करुन गेलं…
आणखी एक कर्णाचा अवतार पोहे वाटायला आला… पोहे कमी पडले… पुन्हा भांडणं… पुन्हा मारामारी… रस्त्यावर पोह्यांचा खच… कुणी तुडवतंय हे पोहे पायाखाली… कुणी तंबाखुच्या पिचका-या मारतंय याच सांडलेल्या पोह्यांवर…
हेच पोहे लोकांनी ओंजळीत भरुभरुन खाल्ले… ज्या लहान मुलांच्या ओंजळीत पोहे येत नव्हते… ती बारकी पोरं… रस्त्यावरच पालथी झोपुन तोंडानं हेच पोहे चाटुन खात होती…
पोहे देणारा… आला तसा निघुन गेला… त्याच्यामते त्याने दान दिलं… पालथी पडलेली तरुण पोरं त्याच्या पाठमो-या नजरेला दिसलीच नाहीत… एक प्लेट पोह्यांनी आख्खी पिढी पालथी झोपवली रस्त्यावर…!
खरंच हे दान आहे…?
तुमचं दान जर फुट पाडत असेल… एकमेकांत भांडणं लावत असेल… रस्त्यावर नागवं व्हायला भाग पाडत असेल… मारामा-या करायला लावत असेल… पालथं पडुन रस्ता चाटायला लावत असेल ते हे खरंच दान आहे का?
खरं सांगु… ही जी मंडळी येतात दान देण्याच्या नावाखाली… हे ढोंगी आहेत…
हे काहीही देण्यासाठी येत नाहीत… ते घेण्यासाठीच येतात… यांना काही द्यायचं नसतंच मुळी… त्यांना देवाच्या दारात देण्याचं नाटक करायचं असतं… चार लोकांनी दानशुर म्हणावं हा यांचा हेतु असतो… दोन पैसे खर्च करुन हे येतात स्वतःसाठी हजारोंचं पुण्य कमवायला…
इथं देण्याच्या नावाखाली… विचार असतो फक्त घेण्याचा…
दगडाचा देव म्हणता म्हणता… माणसंच दगडाची व्हायला लागलीत…
राम राम म्हणणारेही आता मरा मरा म्हणायला लागलेत…
माझ्या कामात मला असे खुप दगडाचे देव भेटले… आणि मी बसलोय माणुस शोधत…!
मी डॉक्टर आहे…माझं नातं स्टेथोस्कोपशी… पण मला हे जाणवतंय… हृदयाचे ठोके ऐकायला… स्टेथोस्कोप नाही… अजुन एक हृदयच लागतं…!
माणसाची मनं जोडायला… सर्जरी नाही प्रेमाची हळुवार फुंकर लागते…
मनाचे रोग ऍलोपॅथी किंवा होमिओपॅथी ने ही बरेच वेळा बरे होत नाहीत… इथं लागते सिम्पथी किंवा एम्पथी…
आज गुढी पाडवा… मला तुमच्याकडुन शुभेच्छा मिळाल्या…
पण, खरं सांगु, माझ्यासाठी माझी गुढी वेगळी आहे…
गुढीतलं हे जे वस्त्र आहे.. मला वाटतं हे नविन वस्त्र माझ्या या भिक्षेक-यांना विकत घेण्याची ऐपत यावी…
अडकवलेला तांब्या हा त्यांच्या समृद्धीचं प्रतिक असावं… भरभरुन त्यांनी धनधान्य विकत घ्यावं… इतके ते “पात्र” व्हावेत…
साखरेच्या या गाठी त्यांच्या आयुष्यात गोडवा घेवुन याव्यात…
कडुनिंबाचा कडवटपणा आयुष्यातुन कायमचा गळुन पडावा…
आणि… पोकळ बांबु हा पोकळ न राहता… त्यांच्यासाठी एक दणकट आधार व्हावा…
जेव्हा हे असं होईल… तोच माझा गुढीपाडवा…
हे होईल तेव्हा होईल… तोपर्यत आपणांसही माझ्याकडुन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!
Leave a Reply