श्वास…

नमस्कार!

सोहम ट्रस्ट या संस्थेची स्थापना माझी पत्नी डॉ. मनिषा सोनवणे हिच्या संकल्पनेतुन झाली.

सोहम आमच्या मुलाचं नाव…

संस्थेला हे नाव ठेवतांनाही उगीचंच त्याचं नाव नाही ठेवलं… त्याचं नाव संस्थेला देण्यात हेतु हा, की त्याने आमच्या माघारी आमच्या कामाचं उत्तराधिकारी व्हावं… ज्या लोकांचे प्रेम, माया आणि आशिर्वाद आम्ही आमच्या बँकेत Fixed Deposit म्हणुन ठेवलंय…या सर्व ठेवींचा त्याने Nominee व्हावं..!

आमच्या या ट्रस्ट मार्फत आम्ही दोघेही “भिक्षेक-यांचे डॉक्टर” किंवा “Doctor For Beggars” या एका वेगळ्या उपक्रमावर काम करीत आहोत.

आज अखेर या उपक्रमांतर्गत ७६१ वृद्ध भिक्षेकरी आमच्याकडे रजीस्टर्ड आहेत. आणि या सर्वांना आम्ही रस्त्यावरच न चुकता सर्व आजारांची औषधे पुरवतो.

बी.पी. / डायबेटीस / हृदयरोग यावरील आयुष्यभर लागणारी औषधे, खंड न पडु देता, प्रत्येकाला वेळच्यावेळी देणे हे आमच्यासाठी रोजचंच आव्हान आहे…

आणि हे एक – दोन दिवस नाही तर जोपर्यंत आम्ही जीवंत आहोत तोपर्यत करायचं असं आम्ही ठरवलं आहे…

रोज ही औषधं देण्याबरोबरच त्यांचे विविध ऑपरेशन, डोळे तपासणी, डोळ्यांची ऑपरेशन्स, अपंगांना पाय बसवणे, वेगवेगळ्या रक्त लघवी तपासण्या करणे, त्यांनी काम करावं यासाठी त्यांचं counseling, काम करायला तयार झाल्यावर, त्यांना झेपेल असं काम शोधुन ते त्यांना करायला लावणे… इत्यादी इत्यादी गोष्टी रोजच कराव्या लागतात…

याचसोबत, रस्त्यावर कुणी निराधार अवस्थेत सापडलं तर आमच्याकडे त्यांना सांभाळण्याची कोणतीही सोय नसतांना, ओळखीचे सहृद, जे अशा वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचे पुण्यकर्म करतात, त्यांच्या माध्यमातुन या निराधार लोकांची सोय करणे अशा ही बाबी आमच्याकडुन “निसर्ग” करवुन घेत आहे… आमच्याही नकळतपणे…

हे सर्व करताना अनंत त्रास आणि यातना होतात… पण त्या कमी करण्यासाठीच जणु याच निसर्गाने तुमची आणि आमची भेट घडवुन आणली आहे…

आमच्या कामात आपण प्रत्येकजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आहातच…

रंगमंचावर एखादं नाटक चालु असेल तर, त्या नाटकातील चार पाच पात्रंच रंगमंचावर दिसतात… लोक त्यांनाच लक्षात ठेवतात… पण रंगमंचावरचा हा खेळ घडवुन आणायला, रंगमंचामागे खुप मोठी शक्ती पणाला लागलेली असते… यांच्याशिवाय हा खेळ करणं केवळ अशक्य… पण रंगमंचामागे काम करणारी ही शक्ती कधीच कुणाला दिसत नाही…

आमचंही तसंच… आम्हीही खेळ मांडलाय… रंगमंचावर आम्ही आहोत… पण आम्हाला जाण आहे… आमचा हा खेळ चाललाय तुमच्यामुळे…कारण…या खेळामागची अदृश्य शक्ती तुम्हीच आहात… तुम्हीच आहात…!!! आम्ही दोघेही फक्त पात्रं..!

आजपावेतो ७६१ लोक तुमच्या आणि आमच्या मार्फत रस्त्यावरच सेवा घेत आहेत… आणि रोजचा आकडा वाढतच आहे…

हे वाचुन तुम्हाला आमचा अभिमान वाटेल, तुम्ही खुप कौतुक कराल, पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवुन आशिर्वाद द्याल याची खात्री आहे मला…

पण… पण हे कौतुक, शुभेच्छा आणि आशिर्वाद स्विकारतांना काही वेळा कसंसंच होतं…

का…? कारण…

वेगळ्या अर्थानं पाहिलं तर जे ७६१ लोक आज रस्त्यावर आहेत… ते आले कुठुन? तर ७६१ कुटुंबातुन… म्हणजे ७६१ कुटुंबांनी यांना सोडुन दिलंय… या सर्व कुटुंबांनी मन आणि हृदय गहाण ठेवुन, आपला स्वतःचा आधारवड कापुन टाकलाय. या म्हाता-या माणसांना बाहेर काढुन आणि आता सावली शोधताहेत… मिळेल कशी?

हे ७६१ लोक आम्हाला दोघांना भेटलेले… पुण्यात इतर किती असतील? उर्वरीत महाराष्ट्रात किती ? (२४००० भिक्षेकरी महाराष्ट्रात – एका सर्व्हेत छापलेला… हा आकडा मला चुकीचा वाटतो… असो…)

जे या क्षेत्रात काम करताहेत त्यांना किती भेटले असतील?

आम्हाला रस्त्यात सापडतात, त्यांना केवळ माणुस म्हणुन नाही तर… एका तुटलेल्या कुटुंबाचा एक एक अवयव समजतो आम्ही..

येणा-या काळात आणखी किती कुटुंबं अशी उध्वस्त होणार आहेत… आणि किती दिवस आपण गप्प रहायचं?

एखादा भुकंप व्हावा… घर कोसळुन पडावं… आत्ता असणारी माणसं थोड्यावेळानं कुठ्ठही नसावीत… सगळ्या वस्तु विखरुन पडाव्यात… काही जमिनीत गाडल्या जाव्यात… होत्याचं नव्हतं व्हावं… आणि सगळं शांत झाल्यावर कुणीतरी यावं आणि आपल्याच घरातल्या तुटक्या अन् मोडक्या वस्तु मातीच्या ढिगा-यात शोधत फिरावं… जे सापडेल त्याला जपुन ठेवावं… आणि ज्याला इतके दिवस घर म्हणत होतो… त्या घराला मातीत गेलेलं पहावं… आणि भरलेल्या डोळ्यांनी आपली माणसं कुठं मातीत सापडताहेत का हे पहावं… पण कुणीच सापडत नसावं…

घरातुन आपल्या माणसाला बाहेर काढल्यावर त्या घराची अशीच अवस्था होते…

आणि आम्ही येतो मग… भुकंप शांत झाल्यावर… खचलेल्या मातीच्या ढिगा-यात हात घालायला… तुटक्या मोडक्या वस्तु गोळा करायला… तुटक्या मोडक्या या वस्तुंसह आम्हाला ही सर्वस्व हरवलेली, वेदनेनं तळमळणारी माणसं इथंच रस्त्त्यात भेटतात, मातीच्या ढिगा-यात सापडतात…

आम्ही त्यांच्या वेदना आमच्याकडे घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो… फुंकर मारतो… फुटलेला त्यांचा हौद, वाटी वाटीनं भरतो…

पण, समुद्रातुन एक वाटी पाणी घेतलं तर समुद्र आटणार थोडाच आहे त्यांच्या वेदनांचा..?

आणि आमच्या या वाटीभर मदतीला आपण तांब्या भरभरुन आशिर्वाद आणि शुभेच्छांची उधळण करता आहात…

एका वाटिच्या बदल्यात तांब्याभरुन मिळतंय तुमच्याकडुन, आणि म्हणुनच काही वेळा लाज वाटते स्वतःचीच…!!!

आजार होवुन बरा करण्यापेक्षा… आजारच होवु नये असं काही करता आलं तर?

भुकंप होणं न होणं आपल्या हातात नाही… पण कुठल्याही भुकंपाने “कुटुंब” दुभंगणार नाही असं काही करता आलं तर..?

पत्त्यांची तकलादु घरं मांडण्यापेक्षा नात्यांच्या जोडावर टिकावु कुटुंब बनवलं तर?

अशी न दुभंगणारी कुटुंबं जर निर्माण झाली तर…? एकही जण रस्त्यावर येणार नाही…

आमचे रोजचे आकडे वाढतच चाललेत… वाढत चाललेल्या आजारासारखे… एक दिवस यावा न् हे आकडे रोज थोडे थोडे करत कमी व्हावेत…

असं कधी होईल का? वेदना घेवुन, झोळीत टाकुन… आम्हीही चाललोय ,त्या वेदनांचे वाटेकरी म्हणुन…आमची ही वेदनांची झोळी कधी कमी होईल का?

होईल… नक्कीच..!

एव्हढंच करा…

कुटुंबातुन कुणाला बाहेर जावु देवु नका… कुटुंब फुटु देवु नका… रस्त्यावर कुणाला येवु देवु नका…

दुसरं… सापडलाच कुणी भिक मागतांना तर त्याला सावरायला “मदत” करा पण “भीक” नका देवु…

मदत करणे आणि भिक देणे यांत सुक्ष्म फरक आहे…

ज्या तुमच्या कृतीमुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहुन सक्षम होईल ती “मदत” आणि ज्या तुमच्या कृतीमुळे एखादी व्यक्ती परावलंबी होईल, शारिरीक आणि मानसिक दुबळी होईल ती “भीक”..!!!

मदत” जरुर करा… “भीक” नको हो…

आपणांपेक्षा लहान असेन मी सर्वच बाबतीत… पण आजवरच्या आयुष्यानं जे शिकवलं त्याचं सार सांगतो…

आपले श्वास चालु असतात तोपर्यंत सगळेच जण आपल्याला मागं टाकुन पुढं सटकण्याचा प्रयत्न करतात… पण ज्यावेळी आपले श्वास थांबतात ना, तेव्हा हीच माणसं आपल्याला पुढं करुन गपगुमान आपल्या मागनं चालत असतात..!

मागेच चालणार…

स्मशानात जाळुन घ्यायला किंवा गाडुन घ्यायला कोण पुढं जाण्यास तयार होईल..? तीथे फक्त असतो… आपणच..! फरक एकच त्यांचे श्वास चालु असतात आणि आपले बंद…

आणि हा सोहळा पहायला नेमके आपणंच नसतो..!!!

त्यापेक्षा, श्वास चालु आहेत तेव्हाच, एकमेकांना मदत करत… कुणी कुणाच्या पुढं जाणार नाही आणि कुणी कुणाच्या मागं राहणार नाही… अशा पद्धतीने सगळेच आपण एकमेकांबरोबर सोबतीनं चाललो तर..? एकमेकांच्या श्वासात श्वास मिळवुन जगलो तर?

प्रयत्न करुन तरी बघु…!!! नक्कीच जमेल…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*