पुनवडी नावाचं एक गाव होतं… म्हणजेच आत्ताचं पुणं…
या गावात एक षट्कोनी म्हणजेच सहा लोकांचं कुटुंब रहायचं…
तरुण जोडपं अन् चार लहान मुली…
यातला माणुस भारतीय सैन्यात… खावुन पिवुन सुखी कुटुंब..
जोडप्याने मुलींना शिकवलं… स्वतःच्या पायावर उभं केलं… चारही जणींची लग्न केली…
कुटुंब हसत खेळत मजेत जगत होतं… चारही जावई… सासु सास-यांना ते आईबाबाच म्हणायचे… दोघंही खुप सुखावुन जायचे…
पण एक दिवस कसं कोण जाणे, या व्यक्तीकडुन सैन्यात काम करत असतांना कुठलीतरी भयंकर चुक झाली… खुप मोठा आळ आला… आणि शिक्षा म्हणुन तडकाफडकी नोकरीवरुन काढुन टाकलं…
पेन्शन नाही, कोणत्याही सोयी नाहीत… तुरुंगवास नाही घडला हेच नशीब…
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं… माणसाने हाय खाल्ली… दुःख पचवायला दारु प्यायला सुरुवात केली… साठवलेले सर्व पैसे दारु घेवुन गेली…
मध्यंतरीच्या काळात एक मुलगी मानसिक आजाराने पछाडली… “येडी” म्हणुन नव-यानं सोडलं… आपली 5 वर्षाची मुलगी या “आईबाबांकडे” सोडुन स्वतः गायब झाला…
मुलीला वेड लागलं हे ऐकुन आईबाप घायाळ झाले… षट्कोनातला एक कोन त्यांच्यासाठी गळुन पडला…
नातीला घेवुन इतर तीनही मुली आणि जावयांकडे ते गेले… मदत करण्याची विनंती केली… जावयांचे पाय धरले… काल आईबाबा म्हणणारे जावई आज अंगावर आले… “आम्ही जगायचं का तुम्हाला जगवायचं? कामावर असतांना चुका तुम्ही केल्या… आणि आम्ही त्या का निस्तरायच्या?” वर हे ही सुनावले…
आईबाबांनी मुलींकडे आशेनं पाहिलं… “ह्यांच्या” पुढे आम्ही काय बोलणार? या मुलींच्या “उत्तरावर” आईबाबांना कुठलाच “प्रश्न” आता उरला नव्हता…
चला… षट्कोनातले इतर तीन कोनही गळुन पडले…
आता उरले हे म्हातारे दोन कोन…
हे “आईबाबा” आता पडेल ते काम करु लागले… मिळेल ते खावु लागले… सोबत नातीचं तोंडही वाढलं होतं… स्वतःबरोबरच तीलाही जगवु लागले…
दारुपायी आणि नैराश्यापायी यातले बाबा ही अचानक एका रात्री देवाघरी गेले…
षट्कोनातला उरलासुरला पाचवा कोनही गळुन पडला..!
आता उरला एक निर्जीव कोन…
म्हातारपणात नातीला घेवुन, धुणंभांडी करत, कण्हत कुंथत जगायला सुरुवात केली…
नातीचं कसं होईल या विचारांनी तीनं आत्तापर्यंत जीव तगवुन ठेवला होता… नाहीतर, केव्हाच उरलेला हा एकुलता एक कोन सुद्धा कोसळुन “भु मातीत” मिसळला असता..!
खरंतर… खुप प्रश्नांची उत्तरं मी शोधतोय… पण अजुन मिळत नाहीत…
आपलं नशीब हे आपला मित्र नसतं… मग तरी ते आपल्यावर का बरं रुसतं?
बुद्धी ही लोखंडाची नाही… तरी तीला गंज का बरं चढतो..?
आपले अहंकार सजीव नाहीत… तरी का बरं ते दुखावतात..?
माणुस निसर्ग ही नाही आणि सरडाही नाही… तरी तो का सारखा बदलतो..?
नाही उत्तरं नाहीतच…
पुर्वी भरलेल्या घरात दिवसभराची कामं करुन मंडळी संध्याकाळी गप्पा मारत खिदळत असायच्या… ती संध्याकाळ हसरी असायची…
संध्याकाळी डोंगराआडुन सुर्य खुदुखुदु हसत हसत निघुन जायचा… ती संध्याकाळ रम्य असायची…
पक्षी ओळीनं आपापल्या घरट्याकडे निघुन जायचे… ती संध्याकाळ पिलांना भेटणा-या आईची असायची…
पण खरं सांगु..? हल्ली ती संध्याकाळ हरवलीय… आता दिवसानंतर डायरेक्ट रात्र होते… आपली हसरी संध्याकाळ घेवुन गेलंय कुणीतरी… आपल्याही नकळत…
आता उरल्येय फक्त करुण संध्याकाळ ती अशा प्राण कंठाशी आलेल्या म्हाता-या माणसांची..!
अशाच आयुष्याची संध्याकाळ झालेल्या, अस्ताला चाललेल्या या उरलेल्या एका “कोनाबद्दल” माहिती मिळाली मला, माझ्या स्नेह्यांकडुन… मला विनंती केली… तुम्ही आजीला पदरात घ्या आम्ही नातीची सोय करु…
मी व्यथीत झालो… आजीची सोय करायला माझ्याकडे कुठं काय सोय होती..?
तरीही आज आजीला आणि तीच्या नातीला भेटलो… भरभरुन… भडभडुन तिघंही बोललो… आजीनं सगळं आयुष्य माझ्यापुढं रीतं केलं…
११ – १२ वर्षाची ही नात मला सांगत होती… “डॉक्टर काका… माझ्या आजीची काहीतरी सोय बघा… खुप थकल्येय हो ती… माझं सगळं करुन करुन… शेवटचे दिवस तरी चांगले जावेत तीचे…मी बघेन माझं कसंही…”
हळुच ती आज्जी माझ्या कानात सांगुन गेली, “डॉक्टर, माझ्या नातीची काहीतरी सोय करा आधी… लहान आहे हो ती… तीला वा-यावर सोडुन जीवपण जाणार नाही माझा… तीचं आधी बघा कायतरी… मी बघेन माझं कसंही…”
याक्षणी तिघंही आम्ही एकमेकांपासुन नजरा चोरत होतो… तिसरीकडेच पहात होतो शुन्यात…
नाहीतरी डोळ्यातलं पाणी लपवण्याचा दुसरा कुठला मार्ग होता आमच्याकडं..?
मी दोघींना जवळ घेतलं…
आजीच्या कानात सांगितलं, “तुझी सोय तर करतोच पण तुझ्याअगोदर तुझ्या नातीची…”
नातीलाही तेच सांगितलं, “तुझी सोय तर करतोच पण तुझ्याअगोदर तुझ्या आजीची…”
सोमवारी २६ मार्चला याच ठिकाणी सकाळी १० वाजता आपण भेटायचं… येतांना असेल नसेल ते पिशवीत भरुन आणायचं… आणि पुढं गाडीतुन जायचं..!
नगरसेवक श्री. भापकर यांचे ऑफिससमोर, खडकी बाजार, पुणे या ठिकाणी आम्ही सोमवारी सकाळी भेटणार आहोत…
यातली नात जाईल एका सुरक्षित बाल आश्रमात आणि आजी जाईल एका प्रेमळ वृद्धाश्रमात..!
दोघींच्या चेह-यावरला आनंद लपता लपेना… आणि माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना…
मी गाडीला किक मारुन जायला निघालो… काही आठवल्यागत करुन आज्जी माझ्या मोटरसायकलकडे लगबगीने आली, म्हणाली, “आपण इतकं बोललो.. पण तुमचं नाव पण नाही विचारलं… तुम्ही कोण..?”
मनात विचार आला… खरंच मी कोण..?
आजीला म्हटलं…आज्जी तुझे तुटलेले “कोन” सांधण्याचा प्रयत्न करणारा मी ही एक “कोन…”
डॉक्टर साहेब, खूप छान काम करत आहात आपण.
आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा