एक लाकडी पाट असतो, त्याला खाली चाकं लावलेली असतात, जी पायाने चालु / उभी राहु शकत नाही अशी व्यक्ती या चाकाच्या पाटावर बसते आणि हाताने जोर देत इकडुन तिकडे हालचाल करु शकते…
याला आमच्याकडे पांगुळगाडा म्हणतात…!
खुप लहानपणी मला वाटायचं, आपण पण मस्त या पांगुळगाड्यावर बसायचं… आपला स्वतःचा एक आपण पांगुळगाडा घ्यायचा… आणि मस्त सरपटत जायचं कित्ती मज्जा..!
जसजसा मोठा होत गेलो, तेव्हा कळलं… या गाड्यावर फक्त अपंग लोकच बसतात… जे पायाने अधु असतात… आणि शक्यतो भीक मागण्यासाठीच या पांगुळगाड्याचा उपयोग करतात… तेव्हा मात्र या पांगुळगाड्याची घृणा आली…
पायानं अधु आहे म्हणुन पांगुळगाड्यावर बसणं हा भाग मी समजु शकतो…
पण तरुण पोरांनी त्यावर बसुन भीक मागणं… म्हणजे मनानंही अधु होणं…
शरीरानं अपंग होणं न होणं आपल्या हातात नाही, पण मनानंही अपंग व्हायचं की नाही ते आपल्या हातात असतं…
केवळ अपंगत्वाचं भांडवल करुन, कामाचा कंटाळा करुन भीक मागणा-या अशा तरुण मंडळींविषयी मला चीड आहे…
पण माझ्या कामात चीड आणि राग जरी आला तरी उपयोग नसतो, कारण त्यामुळं काम होण्यापेक्षा बिघडण्याचाच संभव जास्त…
कुठंतरी मी वाक्य ऐकलंय… “अपने गुस्से को संभाल के रख्खो… वक्त आनेपर उसका सही इस्तेमाल करो..!!”
याच वचनाला प्रमाण मानुन, मला येणा-या रागाला मी विध्वंसक होवु न देता, उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करतोय… तोडण्यापेक्षा रागाचा वापर जोडण्यासाठी करतोय…
आधी भीक मागणारी तरुण पोरं पाहुन मला राग यायचा.. वाटायचं एकेकाला पकडुन लाथा घालुन हाकलुन द्यावं…
पण याच रागाचा उपयोग मी पॉझिटीव्हली करायचं ठरवलं…
रागानं लाथ मारुन त्यांना “पाडण्यापेक्षा” प्रेमानं हात देवुन “उठुन उभं करण्यांत” जास्त शहाणपण आहे हे मला जाणवलं…
आणि याच विचारांचा परिणाम म्हणुन तरुण भिक्षेकरी पोरांचंही पुनर्वसनाचं काम करतोय…
असो, अशाच एका पायाने अपंग आणि मनानंही अधु असणा-या तरुण मुलाबद्दल काल मी लिहिलं होतं. गडबडीत असल्यामुळे अतिशय त्रोटक माहिती दिली होती, त्याला काम बघण्यासाठी आवाहन केलं होतं…
हा ही असाच, चीड येणा-या त्या पांगुळगाड्यावर बसुन भीक मागतो… पर्वती पायथ्याशी राहतो… शिक्षण पाचवी, वय अंदाजे २५ – ३० वर्षे… लिहीता वाचता येतं… बहिण आणि मेहुणे आहेत पण ते त्यांच्या संसारात…
हरत-हेने याला समजावल्यानंतर आता तो कामाला तयार झालाय… हुश्श्श्..!
कामाचं आवाहन करणारी ही पोस्ट मी काल साधारण दुपारी ०३:३० ला टाकली… सायंकाळी ०५:३० पर्यंत या मुलाला काम देवु करणा-या किमान ७५० ऑफर्स मला आल्या…
आपल्याकडे पगारावर काम करणा-या माणसाने बाकी काही नाही, पण किमान धडधाकट तरी असावं हि माफक इच्छा असते… पैसे देवुन अपंग माणसाला कोण नोकरी देईल…? पण तरीही या ७५० भल्या माणसांनी या तरुणाला चांगल्या पगाराची नोकरी देवु केली… या सर्वांनाच माझा साष्टांग नमस्कार…!
याला काय म्हणु…?
माझ्यावरचं प्रेम म्हणु की त्यांचे उच्च विचार म्हणु? काहीही असो, माणुसकी अजुनही जीवंत आहे..!
दुसरे माझे गुरुतुल्य, बंधु समान श्री. राज राठी सर (९४२२९८७५०८) (रॉबिनहुड आर्मी) म्हणाले, “हा काम करायला तयार आहे ना? ओके… मी याच्यासाठी सेपरेटली एक व्हिलचेअर करायला टाकतो… पांगुळगाडा वापरायची गरज नाही, जर तो कामाला तयार असेल तर…”
राठी सरांना काय म्हणु… ?
लोकांच्या नजरेत मला भिकार “डोहाळे” लागलेत… “येडा” डॉक्टर आहे मी…
पण राठी सरांनाही विकतचं हे दुखणं हवंय… मी नतमस्तक आहे त्यांच्यापुढे…
दुसरे माझे मित्र… श्री. सचीन भोईटे (९८६०७०२०२६) कृत्रिम हात पाय तयार करणे… अपंगांना जगायला मदत करतील असे कृत्रिम अवयव तयार करणे आणि विकणे हा व्यवसाय आहे यांचा…
हा “माणुस” धंद्यात “कच्चा” निघाला…
मला म्हणाला, “पोरगं काम करणाराय ना? मी याला सर्व साधनं देतो… व्हिलचेअर नको आणि पांगुळगाडाही नको… चालु दे स्वतःच्या पायावर…”
मी फोनवरुन चाचरत विचारलं… “सचीन, खर्च किती येईल पण?”
“सर रेंजमध्ये नाही… काही ऐकु येत नाही…” म्हणत याने फोन कट् केला…
अर्धा तास या माणसाशी मी बोललो… सगळं व्यवस्थित ऐकु जात होतं… नेमकं स्वतःच्या फायद्याचं आल्यावर रेंज कशी गेली…? मी विचार करतोय अजुनही…
फायद्यासाठी वेडे होणारे खुप पाहिलेत… पण तोटा घेवुन वेडे ठरणारे सचीन सारखे किती..?
तिसऱ्या प्रिती ताई वैद्य. (९३७३३०१६५५)… यांना मी माझी बहिण मानतो…
सामाजीक कार्यात त्या माझ्याही “बाप” आहेत…
रस्त्त्यात सापडलेल्या विकलांग आजी आजोबांना त्या आयुष्यभर मोफत सांभाळतात…
या सर्व “वेड्या लोकांत” आणखी एकीची भर…!
त्या म्हणाल्या, “माझ्याकडे या! मुलाची मी राहणे, खाणे, पिणे याची सोय करुन वर चांगला पगारही देईन…”
“तुझा एक भिक्षेकरी कमी होतोय ना? चल तर मग… होवु दे… ये घेवुन त्याला..!”
आता या ताईला तरी काय म्हणु? त्यांचं काय माझं काय… आमचंही काम चाललंय ओम भिक्षामदेहि वरती… तरी अजुन एक ओझं वाढवुन घ्यायचं… यात कुठलं शहाणपण आहे कोण जाणे..!
पण म्हटलं ना… एका अपंगाला ७५० जॉब्स देणारे प्रेमळ हितचिंतक… मॉडिफाईड व्हिलचेअर देणारे राठी सर, पायावर उभा करणारा सचीन, निवासी व्यवस्था करुन पगार देणा-या प्रिती ताई…
यांना आजच्या जगात कोण शहाणं म्हणेल? वेडी आहेत ही माणसं…!
त्यांचं हे वेड असंच टिकुन राहो हीच प्रार्थना…
कुणीतरी म्हटलंय…
उजालो में मिल ही जायेंगे लाखों कई…
तलाश उनकी रखो, जो अन्धेरों में भी साथ दे..!!
ही माणसंही तशीच..!
या माझ्या मुलाला मी शुक्रवारी २० एप्रिल २०१८ ला प्रिती ताईकडे घेवुन जाणार आहे…
चला, एक पांगुळगाडा कमी होईल… आणखी एक भिक्षेकरी कमी होईल…!!!
Leave a Reply