जवळपास ३ एप्रिल पासुन मी कामाचा किंवा इतर कोणताही आढावा न दिल्यामुळे… कित्येक सहृदांचा मेसेज आला… “काय झालं अभिजीत? बरं आहे ना? काम चालु आहे ना? तुला बरं आहे ना?” आणखीही बरेच…
मला खुप छान वाटलं, सगळे एव्हढ्या आपुलकीने विचारताहेत… प्रेमानं… मलाच भरुन आलं…!
तसं लिहिण्यासारखं होतं बरंच, पण सध्या फक्त “आभारांचा स्विकार व्हावा” या ब्लॉग मध्ये लिहिलेल्या वाईच्या मुलाचाच ऑपरेशनचा विचार आणि तयारी, यामुळे काहीच लिहीता आलं नाही…
सांगितल्याप्रमाणे ७ एप्रिल ला याला ऍडमिट केलं… आता 9 तारखेला ऑपरेशन होईल, मग झालं आपलं काम असं वाटलं होतं…
कोणत्याही ऑपरेशन पुर्वी दवाखान्यात डॉक्टरांची आणि घरात नातेवाईकांची धांदल असते… तशी ऑपरेशन पुर्वी नातेवाईक म्हणुन, पालक म्हणुन आमचीही तयारी चालुच होती… त्यात हे ऑपरेशन मोठं… मग बघायलाच नको…
लेटरहेड वर लिहुन दिलेले प्रतिज्ञापत्र, इतर अनेक फॉर्म भरणं, हॉस्पिटलला आवश्यक असणा-या सर्व गोष्टिंची पुर्तता… वैगेरे वैगेरे आटपलं ९ तारखेच्या आधी… आणि बसलो वाट बघत…
हॉस्पिटलची एक अट आहे, पेशंटबरोबर कुणीतरी २४ तास नातेवाईक हवं… नसेल तर ऑपरेशन कॅन्सल, शिवाय बेवारस पेशंट अशी पोलीस दप्तरी नोंद…!
आता २४ तास इतके दिवस कोण राहणार? हा तिढा सुटेना…
पगारी माणुस पगार घेईल, पण जबाबदारी घेणार नाही, याची खात्री होती… आणि इतक्या परक्या माणसावर माझ्या या पोराला हवाली करणं मला बरं वाटेना…
शेवटी माझ्याबरोबर असणारी मंडळी मोजली आणि आम्ही “नातेवाईकांनी” आपापसांत तीन -चार तासांच्या ड्युट्या वाटुन घेतल्या…
सगळी तयारी करुन आम्ही ९ तारखेला ऑपरेशनची वाट पहात बसलो… शेवटी कळलं काही तांत्रिक अडचणींमुळे आज ऑपरेशन होणार नाही… ११ तारखेला होईल…
झालं… ११ ला पुन्हा हीच पुनरावृत्ती … आम्ही नातेवाईक हजर… पण ११ तारखेलाही कुठंतरी माशी शिंकली,… आता १३ तारीख ठरली…
आम्ही १३ ची वाट पाहत बसलो… १३ ला समजलं, १६ तारीख दिलीय…
अंधश्रद्धांवर विश्वास ठेवु नका असं म्हणतात, तरीही १६ एप्रिल ला ऑपरेशन होईल अशी मनात आम्ही अंध श्रद्धा ठेवलीच होती…
तर ७ – १६ एप्रिल पर्यंत टक्के टोणपे खात, आशा निराशेच्या झुल्यावर आम्ही झुलत राहिलो… हे करता करता प्रत्येकजण आपापलं काम सांभाळण्याची कसरत करत होते… माझं ही भिक्षेकरी तपासण्या, डोळे ऑपरेशन, पुनर्वसन वैगेरे वैगेरे चालुच होतं… या सर्वांतुन लिहायला वेळ काही मिळालाच नाही…!
असो, तर इतके दिवस कळ सोसली, पण सांगायला आनंद होतोय की या मुलाचं ऑपरेशन आज १६ एप्रिलला झालं एकदाचं… हुश्श्श्…!
हे ऑपरेशन दोन भागांत होणार आहे… पैकी आज एक टप्पा झाला, आता पुढील टप्प्यातील ऑपरेशन बुधवारी, १८ तारखेला ठरले आहे…!
यानंतर हा मुलगा भीक मागणार नाही, काही दिवसांत लग्न करेल… एक कुटुंब तयार होईल… कधीकाळी हा भीक मागत होता, हा इतिहास होईल… आणि त्याच्या घराचा तो कर्ता पुरुष होईल… एक भिकारी गांवकरी होईल… एक भिकारी कष्टकरी होईल… पालक म्हणुन अजुन मला काय हवं…?
७ – १६ एप्रिल दरम्यान मनाला उभारी देणारे, हात देणारे, साथ देणारे अनेक नातेवाईक या मुलाला आणि पर्यायाने मला मिळाले…
साद प्रतिष्ठान चे श्रीकांत खटके, बाबा भातंब्रेकर, सुनील पाटील, धनंजय शेडबाळे, त्यांचे सहकारी मनोज शिंदे, गणेश बनकर… याशिवाय कायम बरोबर असणारे भुवड ताई व बाबा, पवन लोखंडे, राहुल सावंत…
वर नावं घेतलेली ही मंडळी खरंतर सांगुनही पटणार नाही एव्हढ्या मोठ्या पोस्टवर आहेत…
कुणी सेल्स टॅक्स ईन्स्पेक्टर आहेत, कुणी एअर फोर्स क्लास वन ऑफिसर्स आहेत, कुणी सेंट्रल बिल्डिंग ला क्लास वन ऑफिसर्स आहेत, कुणी मोठ्या कंपनीचे मालक आहेत, कुणी सरकारी नोकरीतुन निवृत्त झालेले सुपर क्लास वन ऑफिसर्स आहेत…
हॉस्पिटलमध्ये या भिक्षेक-यांसाठी चटई टाकुन झोपतात… कुठल्या जन्मात मी यांचे उपकार फेडेन…? आणि खरंच फिटतील का…?
हि सगळी ऋषीतुल्य माणसं आणि अप्रत्यक्षरीत्या आशिर्वादाचे हात देणारे तुम्ही या मुळे हे शक्य झालं… या सर्वांत मी फक्त Coordinator ची भुमिका बजावत होतो… या मुलाला उभं करण्यात खरं श्रेय या सर्वांचं आणि तुमचं…!!!
ऑपरेशन झाल्यावर, त्याच्याकडे मी पाहिलं… भुलीत असुनही माझ्याकडं पाहुन तो इतकं गोड हसला की… ते हसु मी कधीच विसरु शकत नाही…
ते हसु होतं समाधानाचं… कृतज्ञतेचं… आपणांस दिलेल्या आभाराचं…
या भुलीतही, ऑपरेशन थिएटर बाहेर मला पाहुन त्याने नमस्कारासाठी जोडतात तसे कसेबसे हात जोडण्याचा प्रयत्न केला… हा नमस्कारही आपणांसाठीच बरं का… मी फक्त पोस्टमन… त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोचवणारा…!
यांत आणखी एक मला हेलावणारा प्रसंग… श्री. चिंतामणी कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ… आयुष्यभर शिक्षकी केली… मुलांना घडवता घडवता… समाजकार्य सुरु केलं… हे गृहस्थ रिटायर झाले… पेन्शन चालु झाली… रिटायरमेंटनंतर संन्यासी झाले… आपली सारी पेन्शन समाजासाठी देतात… दोन वेळच्या जेवणाला पुरतील एव्हढे पैसे ठेवुन बाकी सर्व दान करतात… कपड्याला पैसे खर्च होतील म्हणुन उघडेबंब राहतात… गांधीजींप्रमाणे एका पंचावर राहतात…
यांच्या कार्याचा गौरव म्हणुन खुद्द मा. पंतप्रधान घरी येवुन त्यांचा सत्कारही करतात… सगळंच अतर्क्य…!
आज हे मला भेटायला आले… मिठी मारली… मी साहजीकच पाया पडलो… म्हणाले, म्हण, “भारत माता की जय” मी म्हणालोही…
आणि साक्षात गांधी बाबा समोर असल्याचा अनुभव घेतला…!
वाढलेली दाढी, उघडंबंब शरीर, पायात चप्पल, डोळे तेजस्वी, वाणी ओजस्वी… आख्ख्या आयुष्यात खरा साधु पाहिला नव्हता… फक्त पुस्तकात वाचला होता…पण आज पाहिला…!
चालतांना माझा हात हातात धरुन तर कधी माझ्या खांद्यावर हात टाकुन ते चालत होते… आख्खा हॉस्पिटल स्टाफ त्यांना लवुन मुजरा करत होता…
वाटेत मला म्हणाले, “मी तुझ्या खांद्यावर दाब देवुन चालतोय, तुला काही त्रास नाही न् बेटा?”
मी सहज बोलुन गेलो, “बापाचा हात जड होईल इतकाही हलका खांदा नाही तुमच्या मुलाचा…”
“भारतमाता की जय”, असंच काहीसे ते बोलले…!
पुन्हा त्या मुलाकडे आलो, शांत पहुडला होता… म्हटलं, “चला जावु आता राजे…?”
पुन्हा तो हसला… डोळ्यांत तीच कृतज्ञता…
मनात म्हटलं, “वेड्या मीच कृतज्ञ आहे तुझा… इतके नातेवाईक दिलेस… गांधीबाबा ला भेटवलंस…”
“मीच नतमस्तक आहे तुझ्यासमोर… आता तुच माझा हा नमस्कार स्विकार कर…!!!”
Leave a Reply