अक्षय तृतीया…!
असं म्हणतात साडेतीन मुहुर्तांपैकी एक… अत्यंत पवित्र दिवस…
मी खरंतर असं काहीच मानत नाही… ज्या क्षणी काही काम करु तोच माझा मुहुर्त…!
तर वाईच्या या मुलाचं शेवटी दुसरंही ऑपरेशन आजच्या दिवशी १०० टक्के यशस्वी झालं…
इतक्या दिवसांची आमची प्रतिक्षा संपली आणि त्याची वेदना…!
या यशात डॉक्टरांचा वाटा तर आहेच, पण मला वाटतं, या अनोळखी मुलासाठी तुम्ही सर्वांनी दुर राहुन ज्या भरभरुन शुभेच्छा दिल्यात, त्याचे श्रेय जास्त आहे… अक्षय आहे…!
त्याच्या वतीनं या न् त्या रुपात मदत करणा-या आपणां सर्वांचा मी ऋणी आहे…!
मिळालेल्या यशाच्या धुंदीत मी संध्याकाळी घरी आलो…
ऑपरेशन च्या नादात दिवसभरात पाणी, आणि सुनील पाटिल सरांनी दिलेली नीरा याव्यतिरीक्त काहीच खाल्लं नव्हतं…
संध्याकाळी भुकेची जाणिव झाली… घरी गोडधोड होतं… आता संध्याकाळी ६.१५ वाजता जेवायला बसणार इतक्यात फोन आला…
“हॅलो, डॉक्टर सोनवणे… तुमचा तुकाराम सोनवणे गेला!”
मला संदर्भ लागेना…
हो… हेच ते तुकाराम सोनवणे… ज्यांना बोलता येत नव्हतं…
१३ मार्चला आम्ही धायरी फाट्याहुन फुटपाथवरुन यांना उचललं होतं…
नाव नव्हतं म्हणुन यांना मी माझं आडनाव दिलं होतं, कागदोपत्री यांचा मुलगा झालो होतो…
जेव्हा यांना एका वृद्धाश्रमात ठेवलं होतं, तेव्हा सोडुन जाताना हात हातात घट्ट धरुन ठेवला होता माझा त्यांनी… तोंडावरती भाव असे की सोडुन जावु नको रे… स्वतःच असं सांगणारे हे बाबा मला आज सोडुन गेले…!
आजारपणामुळे त्यांना पुना हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं होतं… त्याच हॉस्पिटलमध्ये आज ते शेवटी गेले…! अक्षय तृतीयेच्या दिवशी…!
“बॉडी ताब्यात कधी घेताय…?” पलीकडल्या आवाजानं भानावर आलो…
“बॉडी…?”
पायातलं अवसान गेलं माझ्या… लागलेली भुक मेली… मी तसाच निघालो…
दुपारी असणारं “शरीर” लगेच “बॉडी” झालं…!
याच शरीराला आम्ही रस्त्यावर आंघोळ घातली होती, याच शरीराला आम्ही नवीन कपडे घातले होते, जेवु खावु घातलं होतं… याच चेह-यावर हसु पाहिलं होतं…
पुना हॉस्पिटलला दर चार दिवसांनी यांना पहायला जायचो… आज “बॉडी” ताब्यात घ्यायला चाललो…
हताशपणे पवन लोखंडे, राहुल सावंत, भुवड ताई आणि बाबा यांना फोन लावले… खरंतर आज ससुनला ऑपरेशन साठी हे सुद्धा हॉस्पिटलमध्ये दिवसभर होते… न खाता पीता… पण पर्याय नव्हता…
ऐकुन सर्वांचेच डोळे पाणावले… हे फोनवरुनही जाणवलं…
आम्ही पाचही जणांनी हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार करुन “बॉडी” ताब्यात घेतली…
हो ते हेच होते… जे आमचे नात्याने कुणीच नव्हते… तरीही कुणीतरी होते… हे गेले… जातांना माझं नाव लावुन गेले…
पवन, राहुल, भुवड बाबा आणि मी, आम्ही चौघे खांदेकरी, आणि भुवड ताई… निघालो अंतिम संस्कारासाठी…
खरंतर यांना “हात” द्यायचा होता आम्हाला… “खांदा” नाही… दुर्दैवी कोण…?
शेवटी अंतिम संस्कार करुन त्यांना अग्नीच्या स्वाधीन करुन निघालो…
मी या बाबांना कळत नसतांनाही आणि ऐकु येत नसतांनाही पुर्वी कानात सांगीतल्याचं मला आठवतंय, मी म्हटलं होतं, “तुमाला कोन नाय असं समजु नका… आजपास्नं मीच तुमचा मुलगा… बरं का…!”
माझ्याबरोबरीचे लोक हसत तेव्हा मला म्हणाले होते, “काय हे… तु असं सांगतोय जसं त्यांना कळतंय सगळ्ळं…”
हो… त्यांना कळलं होतं… त्यांनी त्यांचाही शब्द पाळला… अंतिम संस्कार मुलगा म्हणुन माझ्याचकडुन करवुन घेतले शेवटी त्यांनी…!
वृद्धाश्रमातुन सोडुन जाताना बोलता येत नसतांनाही, “सोडुन जावु नकोस रे” असं हातवारे करुन आणि चेह-यावरच्या रेषांनी ते मला सांगण्याचा प्रयत्न करत होते…
आज ते हातवारे आणि चेह-यावरच्या रेषा विझुन गेल्या… कायमच्या…!
आम्ही पाचहीजण थिजुन तीथंच उभे होतो… ख-या अर्थानं त्यांना सोडुन निघालो होतो…!
ते तीथुनही हेच सांगत असावेत, “सोडुन जावु नकोस रे…” पण ऐकण्याच्या पलीकडे आम्ही उभे होतो…
पवन लोखंडे, राहुल सावंत, भुवड ताई आणि बाबा यांच्याबद्दल काय बोलु मी?
घरातलं कुणी असल्याप्रमाणेच त्यांनी सगळं केलं तुकाराम सोनवणे यांचं…
स्त्रिया कधी जात नाहीत अंतिम संस्काराला असं ऐकलं होतं… आज भुवड ताईंनी ही परंपरा मोडली… अक्षय तृतीयेला…!
पवन आणि राहुल दरवेळी एखादं काम अंगावर आलं की पापणी लवायच्या आत काम सुरु करतात… बोलायला सुरुवात करुन, वाक्य पुर्ण होईपर्यत यांनी कामाला सुरुवात केलेली असते… खांद्यावर “बॉडी” असतांना आज मात्र का बरं हे जागचे हलत नव्हते… यांची पावलं आज का बरं जड झाली होती…?
भुवड बाबा… इतरवेळी मी करत असलेलं काम डोळे भरुन पहात असतात… आज मात्र सगळ्यांपासुन ते डोळे का लपवत होते?
अक्षय तृतीया…! लोकं आज नवनवीन गोष्टी खरेदी करतात…
आम्हीही आज ब-याच नवीन गोष्टी खरेदी केल्या…
आम्ही पांढरं कापड, अगरबत्ती आणि हार खरेदी केले…
लोक आज म्हणे दान करतात… मी आपलं नाव त्यांना दान केलं…
गोडधोड खावुन हा सण साजरा करतात आज… आम्ही कडकडीत उपास पाळुन सण साजरा केला…
आजच्या दिवशी हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात घरोघरी… आम्हीही हळदी कुंकु वाहुनच निघालो होतो…
सक्काळी लवकर उठुन आंघोळी करुन शुचीर्भुत व्हायचं असतं आज… आम्ही मध्यरात्री आंघोळी करणार…
अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही…!
मी आज काय अर्थ लावु?
शरीर तर गेलं… पण तुकाराम बाबांचा आणि आमचा स्नेह अक्षय राहील…
हातात घेतलेल्या त्या हातांचा स्पर्श अक्षय राहील…
बोलता येत नसतांनाही त्यांनी आमच्याप्रती डोळ्यांतुन दाखवलेलं प्रेम अक्षय राहील…
पण…
गरीब – श्रीमंत, भिकार – सावकार यातील भेद मात्र जरुर नष्ट व्हावा…
भिका-यांकडे बघण्याच्या नकारात्मक दृष्टीकोनाचा “क्षय” व्हावा…
पडलेल्याला हात देवुन… त्याच्या डोळ्यातला आनंद वेचावा…आणि हा आनंद मात्र अक्षय रहावा…
मिळेल का हे आजच्या दिवशी दान मला…?
Leave a Reply