या मुलाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी काल त्याच्या नोकरी व निवा-यासाठी आवाहन केलं होतं… मदत मागीतली होती…
अक्षरशः साठाव्या मिनीटांपर्यंत मदत देवु करणारे १८० हात पुढे आले…
रात्री ९ पर्यंत हा आकडा ६३० हातांपर्यंत गेला…
मला कळत नाही, मी समाजाचं, मला मदत करणा-यांचं ऋण कसं फेडणार आहे?
कधी काळी भिक्षेक-यांनी केलेल्या मदतीला जागुन आज भिक्षेक-यांचा डॉक्टर होवुन त्यांचं कर्ज फेडण्याचा अंशतः प्रयत्न करतोय…
पण समाजाचं हे ऋण फेडायला मला किती जन्म घ्यावे लागतील? आणि तरी ते फिटतील का?
या प्रत्येक सहृदय व्यक्तीचे, संस्थांचे मी व्यक्तीशः आभार मानले आहेत… व्हॉट्सऍप च्या माध्यमातुन… पण एव्हढंच पुरेसं नाही याची मला जाण आहे… मी नतमस्तक आहे या सर्वांसमोर…!
या मुलाची अन्न वस्त्र निवारा व नोकरी या सर्वच बाबींची सोय आपण करु असं या सर्व सहृदय व्यक्ती व संस्थांनी मला सांगीतले.
परंतु या मुलाचा ऑपरेशन नंतरचा फॉलोअप आणि इतर ब-याच गोष्टींचा विचार करुन डॉ. अपर्णा देशमुख मॅडम संचलीत “आभाळमाया”, सिंहगड रोड, पुणे (फोन : ९२८४६५४९३१) या ठिकाणी त्याची सोय करणार आहोत.
मॅडमशी प्रत्यक्ष बोलतांना जाणवतं की संस्थेचं नाव “आभाळमाया” का आहे ते…!
या आभाळाखाली कित्येक असे जीव राहतात, ज्यांना कुणीच नाही… किंवा सगळे असुनही ते एकाकी आहेत… आणि अशांना माया, प्रेम देण्याचं काम डॉ. अपर्णा मॅडम करतात…
हे काम ही समाजाच्या मदतीनेच सुरु आहे… आणि जो पर्यंत समाजातला सहृदय वर्ग जागा आहे… तोपर्यत आमच्यासारखे लोक काम करतच राहतील… आपल्या जीवावर…!
आमच्या या मुलालाही आम्ही त्यांच्या सुपुर्त करणार आहोत सोमवारी दुपारी…! इथे तो पुर्ण बरा होईपर्यत राहील, त्यानंतरही संस्था त्याचा सांभाळ करेल व या बदल्यात संस्थेसाठी हा मुलगा काम करेल…!
लहानपणी चांदोबाच्या गोष्टीच्या पुस्तकातला शेवट “…आणि ते सुखाने नांदु लागले…” असा असायचा…
माझी आणि या मुलाची, आमची गोष्टही ब-याच महिन्यांपासुन चालु होती… चांदोबातल्या गोष्टीसारखी…
पण आता त्याच्या बाबतीतील सर्व वेदना सोमवारपासुन संपतील…
त्याचं भिकारी असणं सोमवारपासुन संपेल…
या धरतीवरचं सन्माननीय नागरीकत्व सोमवारपासुन त्याला मिळेल…
सोमवारपासुन तो भिकारी नाही “गांवकरी” होईल…
भुतकाळातली वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आता सोमवारी संपेल….!
आणि सोमवारी त्याला सोडुन परत येताना मी म्हणेन ….आणि तो सुखाने नांदु लागला….!!!
Leave a Reply