लहानपण देगा देवा…

एक आज्जी, तीच्या मैत्रीणीबरोबर एका मंदिराबाहेर भीक मागायची… दोघी साधारण ७० च्या आसपास वयानं…

दोघींना डोळ्याने नीटसं दिसत नव्हतं… दोघींनाही मी, “काहीतरी काम करा, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात रहा पण भीक मागु नका”, असं भेटलो की नेहमी विनवायचो…

शेवटी त्यातली एक आजी वजनकाटा घेवुन बसायला तयार झाली…

मी दोघींचे डोळे हॉस्पिटलमध्ये तपासुन घेतले… दोघींनाही मोतिबिंदु… दोघींचंही मोतिबिंदुचं त्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करवुन घेतलं…

शेवटच्या फॉलोअपला डॉक्टरांनी एकीला चष्म्याचा नंबर दिला, दुसरीला गरज नाही असं सांगीतलं…

जीला चष्मा लागला होता, तीच्या पसंतीचा चष्मा घेवुन दिला… दुसरी आज्जी, जी वजनकाटा घेवुन बसायला तयार होती, तीला चष्मा लागलाच नव्हता म्हणुन तीला चष्मा देण्याचा प्रश्नच नव्हता…

पुढच्यावेळी भेटल्यावर जीला चष्मा मिळाला होता ती छान बोलली, पण दुसरी आज्जी जी वजनकाटा घेवुन बसायला तयार होती ती मात्र तुटक बोलली…

मी तीला म्हटलं, “ऑपरेशन झालंय आता, आणु का वजनकाटा? घेवुन बसशील ना?”

तशी तुसड्यासारखी बोलायची, “मला नको काटा, तुच घीवुन बस… नायतर दे तीला, तुज्या आवडत्या आज्जीला… चष्मा लावलेल्या आजीकडं ती बोट दाखवुन म्हणायची…”

मला कळतंच नव्हतं… इतके दिवस ऑपरेशन नंतर काम करते म्हणणारी आज्जी का बदलली असावी? नीट बोलत पण नाही…!

एकदा लाडीगोडी लावत तीला विचारलं, “आज्जी झालंय काय तुला? काय चुकलंय माझं?”

यावर ती म्हणाली, “जा, जीला चष्मा दिलाय तु तीलाच लाडीगोडी लावुन बोल… ती तुजी आवडती आज्जी हाय, म्हणुन तीला चष्मा दिलास… मी कोन न्हाय तुजी? म्हणुन मला चष्मा नाय दिलास त्वा…”

ओह, आत्ता सगळा प्रकार लक्षात आला माझ्या…

हिला चष्मा नाही दिला म्हणुन राग…?

मी पुन्हा लाडीगोडी लावतच म्हटलं, “आगं तुला नाय लागला चष्मा, म्हणुन नाय दिला…लागला आसता तर दिलाच आसता की तुला बी…!”

यावर तीचं समाधान होत नसायचं… पदर सावरुन ती तीकडं तोंड करुन बसायची… बोलायची नाही…

काम करायला तयार झालेल्या आज्जीनं असं माझ्याशी बोलणं बंद करावं हे मलाच कसंसं व्हायचं… मी प्रयत्न करायचो पण तीनं तुसड्यासारखं वागणं सोडलं नाही…

मध्ये काही दिवस गेले…

सोहम आणि मी एके दिवशी बाहेर होतो, अचानक एका गॉगलच्या दुकानातुन चष्म्यासारखा दिसणारा गॉगल त्याने घेतला आणि म्हणाला, “पप्पा हा मला घेवुन दे…”

मी म्हटलं, “चष्मा आहे तो नंबरचा,… तुला काय करायचा? तुला काय चष्मा लागलाय का…? चल, काढ तो…!”

तर माझ्या बावळटपणाची कीव करत म्हणाला, “अरे हा चष्मा नाही, याला झिरो नंबर असतो…”

“मग घालायचा कशाला…?” मी अजुन बावळटासारखं विचारलं… तर चिरंजीव म्हणाले, “अरे यार लुक बदलायला हा चष्मा वापरतात… भारी वाटतं…!”

मी ही तो झीरो नंबरचा चष्मा लावुन बघीतला… काही विशेष फरक जाणवला नाही…

माझा लुक किती बदलला ते माहीत नाही, पण डोक्यात एक आयडिया आली…

त्याच दुकानातनं एक तो झीरो नंबरचा चष्मा घेतला… आणि मागच्या आठवड्यात आज्जीला परत भेटलो…
अत्यंत गंभीर चेहरा करुन, तीचा हात हातात घेवुन म्हणालो, आज्जी, आगं चुकलं माजं… तुज्या चष्म्याच्या नंबरचा कागद मी पुन्हा नीट पाहीला, त्यात तुला बारीक नंबराचा चष्मा आहे बरं का…! माजं चुकलंच जरा… मी नीट पाह्यलंच नाही गं…

आजीचे डोळे चमकले… म्हटली, “मग? मी तुला म्हणलं व्हतं, तीला लागलाय तर मलाबी लागंल चष्मा…”

“आता कदी देणार मला चष्मा?” ती अधीरतेने म्हणाली…!

मी माझ्या बॅगेतुन “तो” जादुचा चष्मा काढला… तीच्या डोळ्यांवर चढवला…

“आणलांस तु मला चष्मा?” तीनं आश्चर्याने विचारलं…

डोळ्यांवर चढवल्यावर मी चाचरत विचारलं, “आज्जी आता कसं दिसतंय…?”

ती आनंदुन म्हणाली, “आरं लय भारी दिसतंय… किल्लेर (clear) दिसतंय मला आता…”

“बग, मी म्हणलं हुतं ना, मलाबी चष्मा लागलाय पण तु फकस्त तीलाच दिलास…ती तुज्या आवडीची ना…” मानेला झटका देत हे वाक्य बोलतांना तीनं ओठांची अशी काही हालचाल केली की… इथे ती वर्णन करायला माझे शब्द असमर्थ आहेत…!

मी पुन्हा दिलगीरी व्यक्त करत म्हटलं, “सॉरी ना गं म्हातारे… आता राग सोड की… दिला की मी तुला चष्मा…!”

एव्हढं ऐकुन ती झट्कन उठली… आणि एक चक्कर मारुन आली चष्मा घालुनच…

मी म्हटलं, “कुटं गेली व्हतीस गं म्हातारे एव्हढ्यात…?”

तर म्हणाली… “तुज्या “दुस-या” आज्जीला दाकवुन आले… माजा चष्मा…!”

मला दोन्ही आज्ज्यांची गंमत वाटत होती… खरंतर या मैत्रीणी… तरीही एक स्त्री सुलभ स्पर्धा… आणि त्यांहुन त्यांच्यात दडलेलं एक लहान बाळ…!

मी हसत म्हटलं, “आता वजनकाटा कदी आणु?”

म्हटली, “आण की फुडल्या गूरवारी… मी काटा घीवुन बशीन, आता न्हाय भीक मागायची… मला चष्म्यानं येवस्तीशीर दिसतंय… वजनकाट्यावर मिळंल ते घेइन…”

मी गालात हसत सोहमचे आभार मानले… झीरो नंबराच्या चष्म्यानं मी आज हिरो झालो होतो…!

ही फक्त मानवी सायकॉलॉजी असते… आणि ही शिकायला कुठलंही पुस्तक लागत नाही हे विशेष…!

मी फक्त या सायकॉलॉजी ला अनुसरुन वागलो… खोटं बोललो… पण यात माझा काही फायदा नव्हता…

तो “फुडला” गुरुवार म्हणजे आजचाच… आज २६ तारखेचाच… आज याच आजीला वजनकाटा दिला…

तीनं गालावरनं हात फिरवला… म्हणाली, “वजनकाट्यावरचं आकडं बी दिसत्यात… मी आता भीक नाय मागायची,… वजनकाट्यावर पैसं मिळवीन… मला लय भारी दिसतंय रं बाळा आता…”

मी म्हटलं, “आगं दिसणारच, कारण त्या आज्जी पेक्षा भारीतला चष्मा मी तुला दिलाय…”

कानाजवळ येवुन तीनं पुन्हा साशंकतेने विचारलं, “खरंच तीज्यापेक्शा माजा चष्मा भारी हाय?”

मी म्हटलं, “आगं हो, तु काटा घीवुन बसणार म्हणुन तुला भारीतला घेतला… आन् तीला जरा हलकाच घेतलाय मी…!” ठोकुन दिलं मी…

“माजं सोनं गं…” म्हणंत, माझी दृष्ट काढावी तसं तीनं केलं…

आजपासुन हिनं भीक मागणं सोडलं…!

म्हातारी माणसं कशी लहान मुलांसारखं वागतात… निरागस…!

मी गालात हसत होतो… आणि आज्जी वजनकाटा घेवुन बसली होती… भीक मागण्याऐवजी…

मी आज्जी कडं पाहिलं… ती डोळे मिचकावत हसत होती, कौतुकानं माझ्याकडं पाहुन… तीचा “नंबराचा” चष्मा घालुन…!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*