सांगलीतला एक जिद्दी लहान मुलगा – लहानपणापासुनच उत्कृष्ट चित्रकार – मोठे कलाकार भारावुन जातील अशी त्याची कला – थोडा मोठा झाल्यावर देवाने या मुलाची आणि आईची परिक्षा घेतली – मुलाला अपंगत्वाचं दान देवुन – मुलगा हरला नाही, त्याहुन त्याची आई हरली नाही – अशा अपंग अवस्थेत तो अजुनही चित्रं काढतो – एकापेक्षा एक सरस…
हे फक्त एव्हढंच असतं तरी ठीक होतं…
पण या मुलाचं मोठेपण असं, की त्याने आणि त्याच्या आईने मिळुन काही समविचारी मित्रांच्या मदतीने सांगलीत पेंटीग्जचं एक प्रदर्शन भरवलंय – या चित्रांची विक्री करुन जो पैसा येईल तो समाजातल्या वंचीत घटकांसाठी त्याला द्यायचा आहे…
तो म्हणतो आज मी अपंग झालो तरीही माझ्यासारखी अनेक मुलं आहेत जी शरीरानं धडधाकट आहेत परंतु केवळ कुणाचा आधार नसल्यामुळे त्यांची अवस्था अपंगासारखीच झाली आहे… आणि आता मला त्यांना आधार द्यायचाय…!
जेमतेम पंचवीशी न गाठलेल्या या मुलाचे इतके प्रगल्भ विचार…?
या मुलाचं नाव आहे, आदित्य निकम
हे विचार त्याच्यात रुजले गेलेत ते त्याच्या आजोबांपासुन, ज्येष्ठ समाजसेवक मा. पी. बी. पाटील सर यांच्यापासुन …
या विचारांना खतपाणी घातलंय त्याच्या आईने, सौ. नंदिनी निकम यांनी… आणि सांगलीतील बहुआयामी व्यक्तीमत्व नंदिनी ताईंचे भाउ श्री. शिवाजी पाटील सर यांनी…
मी या सर्वांना मनापासुन अभिवादन करतो…
स्वतः चालु फिरु न शकणारं, स्वतःच्या हातानं स्वतःचा घासही स्वतः खावु न शकणारं एक लहान पोरगं खुर्चीत बसुन दुस-याला आधार देतंय…
दुस-याला जगवायला धडपडतंय…!
याला अपंग कसं म्हणावं…? माझ्यादृष्टीनं जगातला सर्व शक्तीमान असा हा महान योद्धा आहे… जो झगडतोय आपल्या आजाराशी आणि सावरतोय आपल्या इतर बांधवांना…!
अशा माणसाची ओळख आपणांस व्हावी, त्याचं आपण जमेल त्या पद्धतीनं कौतुक करावं, त्याच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या हेतुला मदत करावी, इतकाच माझा हेतु…!
एक ज्योत त्यानं पेटवली आहे… फुंकर मारुन आता तीची मशाल करणं आपल्या हातात आहे…
त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्या आईचा, सौ. नंदिनी निकम यांचा नंबर देत आहे… ९८५०५५७३७४
बघु जमेल तसा वाटा आपण उचलु…!
मी या आदित्य ला भेटलो, निघतांना मला म्हणाला, “मामा तुम्ही खुप मोठं काम करताय…!”
मी त्याचा हात हातात घेवुन म्हणालो, “मी फक्त वयानं मोठा आहे रे तुझ्यापेक्षा… तुझ्याएवढं मोठं व्हायला मला आणखी एक जन्म घ्यावा लागेल…!!”
Leave a Reply