शिवधनुष्य

नमस्कार !

भिक्षेक-यांना औषधी, त्यांचे ऑपरेशन, त्यांना झेपतील अशी कामं देवुन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न या गोष्टी बरोबरच, माझेच आजीआजोबा समजुन त्यांचे “बालहट्ट” पुरवणे हे रोजचंच काम माझं सुरु आहे… अर्थात तुमच्याच मदतीने…!

हे काम मी करतोच आहे, आणि पुढंही करतच राहणार आहे…

पण हे सर्व करत असतानाही मला हे जाणवतं कि नुसती हाता तोंडाची गाठ पडणं म्हणजे पुनर्वसन नव्हे…

रोजच्या आयुष्यात यांना कितीतरी सरकारी कागदपत्रांची गरज पडते…

आधारकार्ड, रेशनकार्ड, झालंच तर मतदान ओळखपत्र…

जे यांच्याकडे नाही… आणि म्हणुन कितीतरी गोष्टींपासुन यांना वंचीत रहावं लागतं…

या अशा बाबी आहेत, जर या नसतील तर त्यांच्या “असण्याचा” काहीच उपयोगच नाही…

आधारकार्ड नसेल तर कितीतरी सरकारी योजना यांना मिळत नाहीत, रेशनकार्ड नसेल तर यांना साखर, रॉकेल आणि इतर सुविधा मिळत नाहीत! मतदान ओळखपत्र असेल तर हे सन्माननीय मतदार होतील… नागरीक होतील,… आणि किमान व्होट बँक म्हणुन का होइना, पण लोकप्रतिनिधींचे यांच्याकडे लक्ष तरी जाईल… नाहीतर यांच्या जगण्याला सोडा, मरण्यालाही काही किंमत नाही…

आणि म्हणुनच, पुढच्या आठवड्यापासुन मी एक सर्व्हे सुरु करणार आहे…

ज्यांच्याकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि रेशनकार्ड नाही अशा लोकांची लिस्ट करुन, यांना या गोष्टी मिळवुन देण्याचा माझा प्रयत्न राहील…

ही सरकारी कागदपत्रं मिळाल्यावर, या आजीआजोबांची बँकेत खाती उघडुन देण्याचा माझा पुढचा प्रयत्न असेल… जेणेकरुन मिळालेले पैसे ते बँकेत जमा करतील…

या सर्व बाबी मी करु शकलो तर यांचा सर्वांगीण विकास होवु शकेल…

बघु हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न तरी करतोय, तुम्ही माझ्यासोबत आहातच हे हक्कानं गृहित धरुन…

उचललं गेलं हे शिवधनुष्य, तर माझ्या या लोकांचा फायदा होईल. अंगावर पडलं हेच शिवधनुष्य माझ्या, तर गुदमरून जीव माझा जाईल… हरकत नाही…

बघु प्रयत्न तरी करतो…!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*